Pune : राज्यात पोलिस भरतीला स्थगिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस

Pune : राज्यात पोलिस भरतीला स्थगिती

पुणे : राज्य सरकारने पुन्हा एकदा उमेदवारांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावला असून, दोनच दिवसांपूर्वी घोषित केलेली सुमारे १५ हजार पदांची पोलिस भरती स्थगित केली आहे. प्रशिक्षण व विशेष पथकाचे पोलिस महासंचालक संजय कुमार यांनी यासंबंधीचे परिपत्रक काढले असून, पुढील तारीख यथावकाश कळविणार असल्याचे म्हटले आहे.

२०२१ पोलिस शिपाई संवर्गातील १४ हजार ९५६ पदांच्या भरतीची प्रक्रिया एक नोव्हेंबरपासून सुरू होणार होती. तथापि, प्रशासकीय कारणास्तव ती तूर्त स्थगित करण्यात आली आहे. जाहिरात देण्यासंबंधीची पुढील कार्यवाहीची तारीख यथावकाश कळविण्यात येईल, असे कुमार यांनी परिपत्रकात म्हटले आहे. मागील तीन वर्ष कोणतीच सरळसेवा भरती प्रक्रिया सुरळीत झाली नाही. त्यात पोलिस शिपाई भरतीही झाली नव्हती.

त्यामुळे शासनाच्या पोलिस भरतीच्या घोषणेमुळे उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मात्र, स्थगितीच्या या परिपत्रकानंतर इच्छुकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ग्रामविकास आणि जिल्हा परिषदेच्या भरती प्रक्रियेतील अनिश्चिततेमुळे उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यात अशा परिपत्रकामुळे अधिकच भर पडली आहे.

कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक पोलिस भरतीला स्थगिती देणे धक्कादायक आहे. हातातोडांशी आलेला घास असा अचानक हिरावून घेणे दुर्दैवी बाब आहे.

- कुलदीप आंबेकर,

अध्यक्ष, स्टुडंट हेल्पींग हँड्स

जिल्हा परिषदेची भरती रद्द झाल्याच्या जखमा ताज्या असतानाच, पोलिस भरती रद्द करून तरुणांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सरकार करत आहे. ७५ हजार जागांची ‘भरती’ घोषित करून जाहीर झालेल्या परीक्षांना ‘ओहोटी’ लावणाऱ्या सरकारचा निषेध.

- सुभाष शेळके, उमेदवार

वयोमर्यादेचे कारण

कोविडच्या काळातील वयोमर्यादेची शिथीलता, तसेच मागील तीन वर्षांत भरती न झाल्यामुळे अनेक उमेदवार वयोमर्यादा संपल्यामुळे पोलिस भरतीसाठी पात्र नाहीत. अशा तरुणांना संधी मिळावी, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये. त्यामुळे ही पोलिस भरती थोड्या कालावधीसाठी स्थगित केल्याचे समिती आणि सरकारकडून कळते. त्यामुळे पुढील आठवड्यात पोलिस भरतीची जाहिरात निघाल्यानंतर वयोमर्यादा शिथिल करण्यात येऊ शकते.