राज्य सरकारच्या आदेशानुसार गणेशोत्सवावर कुठलेही निर्बंध नाही

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून स्पष्टीकरण
Ganesh Chaturthi 2022
Ganesh Chaturthi 2022esakal

पुणे : राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार यंदाच्या गणेशोत्सवाला कुठल्याही प्रकारचे निर्बंध नसणार आहेत, विसर्जन मिरवणुकीमध्ये मंडळांना ढोल-ताशा पथके लावण्यावरही बंधन नसणार आहे, असे पुणे पोलिसांनी सोमवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. तर आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई करु, अशी सावध भुमिकाही पोलिसांनी घेतली. दरम्यान, कुठलेही निर्बंध नाही आणि ढोल - ताशा पथकांचा अमर्याद वापर, यामुळे यंदाच्या गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणुकीसाठी विक्रमी वेळ लागण्याची शक्‍यता आहे.

अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या तयारीची माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे, अतिरिक्त आयुक्त नामदेव चव्हाण, परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्त डॉ.प्रियांका नारनवरे, विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त आर.राजा, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे उपस्थित होते.

गुप्ता म्हणाले, ""कोरोनामुळे दोन वर्षे गणेशोत्सवावर निर्बंध होते. त्यामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. यंदाचा उत्सव निर्बंधमुक्त होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. पुण्यातील गणेशोत्सवासाठी राज्य, परराज्य तसेच परदेशातून भाविक येतात. त्यामुळे उत्सव चांगल्या पद्धतीने व्हावा, भाविकांना चांगल्या सेवा मिळाव्यात, उत्सवात कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटना घडू नये, यादृष्टीने उपाययोजना केल्या आहे. वाहतुक कोंडी, गर्दीवर नियंत्रण, दर्शनासाठी चांगली सुविधा, गुन्हेगारी कृत्यांवर बारकाईने लक्ष्य देण्यात येणार आहे. यंदाचा उत्सव निर्बंधमुक्त असेल, मात्र ध्वनीप्रदूषण केल्यास कारवाई केली जाईल.''

विसर्जन मिरवणूक वेळेत पुर्ण व्हावी, यासाठी दरवर्षी मंडळांना ढोल - ताशा पथके मर्यादीत ठेवण्याबाबत पोलिसांकडून सुचना दिल्या जातात. याविषयी गुप्ता म्हणाले, ""मंडळांनी ढोल - ताशा पथके किती लावावीत, याबाबत त्यांना बंधन घातलेले नाही. परंतु, ध्वनी प्रदूषणाबाबत होऊ नये, यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या नियमांचे पालन करावे लागेल. ढोल - ताशा पथके किंवा स्पीकरने आवाजाची मर्यादा ओलांडल्यास त्यांच्यावर कारवाई होईल. कोणत्याही वादनावरही बंधन नसेल. गर्दी वाढण्याची शक्‍यता लक्षात घेऊन बंदोबस्त, वाहतुक बदलाचे नियोजन केले आहे.'

अनुचित घटना टाळण्यासाठी बारकाईने लक्ष

लहान मुले हरवु नयेत, महिला तरुणींची छेडछाड टाळण्यासाठी पोलिस कार्यरत असतील. याबरोबरच चोरट्यांच्या टोळ्या, सराईत गुन्हेगारांवरही गुन्हे शाखेचे पोलिस लक्ष ठेवतील. प्रमुख मंडळांना सीसीटीव्ही लावण्याच्या सुचना दिल्या आहेत, असेही गुप्ता यांनी स्पष्ट केले.

गणेशोत्सवात असा असेल पोलिस बंदोबस्त

- पोलिस अधिकारी कर्मचारी - 7 हजार 500

- गणेशोत्सवावर लक्ष ठेवणारे अधिकारी - 700

- आवश्‍यक सुरक्षेसाठी मदत - शीघ्र कृती दल, गुन्हे शाखेची पथके, बीडीडीएस पथके, एसआरपीएफ, होमगार्ड

अतिरीक्त पोलिस आयुक्त - 4

- पोलिस उपायुक्त - 10

- सहाय्यक पोलिस आयुक्त - 30

- पोलिस निरीक्षक - 95

- सहाय्यक पोलिस निरीक्षक/उपनिरीक्षक - 488

- पोलिस कर्मचारी - 3834

- होमगार्ड 600

- एसआरपीएफ कंपनी - 02

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com