राज्य १० वर्षांत ‘कार्बन न्यूट्रल’

राज्य १० वर्षांत ‘कार्बन न्यूट्रल’

पुणे - ‘‘प्रदूषण नियंत्रण अत्यावश्‍यक आहेच. त्यासाठी जगातील आधुनिक आणि उत्तम तंत्रज्ञानाचा अंगीकार राज्य सरकार करणार आहे. केवळ पुणे विभागच नव्हे; तर अवघे राज्यच येत्या १० वर्षांत ‘कार्बन न्यूट्रल’ (शून्य कार्बन उत्सर्जन) करण्याचा प्रयत्न असेल. त्यासाठीच्या उपाययोजनांचा प्रस्ताव लोकसहभागातून तयार करून पर्यावरण मंत्रालय तो मुख्यमंत्र्यांना तातडीने सादर करेल,’’ अशी ग्वाही पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवारी येथे दिली. 

पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे (पीआयसी) मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रिज अँड ॲग्रीकल्चरच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात ठाकरे यांच्या हस्ते ‘मेकिंग पुणे मेट्रोपॉलिटन रिजन कार्बन न्यूट्रल बाय २०३०’ या धोरणात्मक मार्गदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. पुणे विभाग कार्बन न्यूट्रल करण्यासाठी येत्या दहा वर्षांत कसा कृती कार्यक्रम हाती घ्यावा लागेल, याबाबतच्या शिफारशींचा समावेश त्यात आहे. ‘पीआयसी’चे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर, मानद संचालक प्रशांत गिरबने, कार्यक्रम समितीचे अध्यक्ष व ‘पीआयसी’चे विश्वस्त प्रा. अमिताव मलिक, ‘पीएमआरडीए’चे आयुक्त विक्रम कुमार आणि विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या प्रसंगी उपस्थित होते. 

ठाकरे म्हणाले, ‘‘मुंबईत रोज १० हजार टन कचरा गोळा होत असे. त्यासाठी वर्गीकरण करून जागरूकता केल्यावर हे प्रमाण आता ६५०० टनांवर आले आहे. याच सकारात्मक दृष्टिकोनातून वाढत्या शहरांचे वाहतूक नियोजन, घनकचरा विघटन व व्यवस्थापन करावे लागणार आहे; तसेच स्थानिक जातींच्या झाडांचे रोपण करून जंगल वाढविणे, वाहतुकीसाठी ई-वाहनांची संख्या वाढविणे यावर भर द्यावा लागेल.’’ जगभरात आज ‘कार्बन न्यूट्रल’ शहरांचा ट्रेंड आहे. आज भूतानने त्यासाठी पावले उचलली आहेत. पुणेही लवकरच या दिशेने पावले उचलेल, असा माझा विश्वास आहे. पुण्यातून ‘कार्बन न्यूट्रल’ शहरांचा पॅटर्न आता सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले.  

माशेलकर म्हणाले, ‘‘कार्बन न्यूट्रल शहरासाठी आपण २०३०चे ध्येय ठेवले आहे. इतर काही देश २०५० साल उजाडेल, असे म्हणतात. बऱ्याच गोष्टींवर आपल्याकडे आधीच काम सुरू झाले आहे आणि तरुणांनी यात पुढाकार घेत काम केले, तर आपले उद्दिष्ट आपण नक्कीच साध्य करू.’’ प्रा. मलिक यांनी ‘कार्बन न्यूट्रल’चे महत्त्व, भविष्यातील गरज आणि कार्यक्रमाचा उद्देश; तसेच पुढची वाटचाल, याबाबत प्रास्ताविकात मार्गदर्शन केले. डॉ. नितांत माटे, डॉ. प्रियदर्शिनी कर्वे, डॉ. गुरुदास नूलकर यांनी सादरीकरण केले. लिसा पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले. 

...म्हणून निवडले पर्यावरण मंत्रालय 
शहरीकरण वेगाने वाढत आहे. पर्यावरण सर्वसमावेशक आहे, विविध खात्यांवरही त्याचा परिणाम होतो. पर्यावरणाचा पर्यटनाशी थेट संबंध आहे. या दोन्ही विभागांना भविष्यात महत्त्वाचे स्थान मिळणार आहे. पर्यावरणाला तर जागतिक स्तरावरही अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे, हे लक्षात घेऊनच मी पर्यावरण आणि पर्यटन मंत्री म्हणून काम करायचे ठरवल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले, असे ठाकरे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com