आंबिल ओढा परिसरात घरांसाठी नागरिकांचा आक्रोश; कारवाईला स्थगिती

आंबिल ओढा परिसरात घरांसाठी नागरिकांचा आक्रोश; कारवाईला स्थगिती

सिंहगड रस्ता/सहकार नगर : आंबिल ओढा येथे अतिक्रमण केलेल्या झोपड्यांवर आज महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली. या अतिक्रमण कारवाई वर स्थानिक नागरिकांचा विरोध झुगारून पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यात आली. यावेळी काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईला स्थानिक नागरिकांनी विरोध करत निदर्शने करत एका कार्यकर्त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. दरम्यान, आंबिल ओढा प्रकरणी कोर्टाकडून स्थगिती आदेश जारी करण्यात आले असून पुढील आदेश येईपर्यंत कारवाई करण्यास मनाई केली आहे. आंबिल ओढा वसाहतीतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असता तरी तोपर्यंत जवळपास १५ ते २५ घरे प्रशासनाने पाडली.

''आंबिल ओढ्याच्या दोन्ही बाजूस नागरिकांचे वास्तव्य आहे. यापूर्वीच महापालिकेच्यावतीने झोपड्या सोडण्याचे आवाहन करण्यात आले होते; मात्र, नागरिकांनी त्यास विरोध केला. गेल्यावर्षी झालेल्या पावसात या ओढ्याला पूर आला होता. अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. याच पार्श्वभूमीवर आंबिल ओढ्याच्या कडेने महापालिका हद्दीलगतील भागात दोन्ही बाजूस नऊ मीटर रुंदीचा ग्रीन बेल्ट अर्थात हरितपट्टा ठेवणे बंधनकारक केले आहे. प्रत्यक्षात हा नऊ मीटरचा ग्रीन बेल्ट उपलब्ध नसून थेट ओढ्यातच भर टाकून अनेक ठिकाणी बांधकाम करण्यात आले आहे. यामुळे ओढ्याची वहन क्षमता 60 टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे. परिणामी या भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याचे प्रमाण वाढले होते.''असे असताना देखील, येथील नागरिकांचा अतिक्रमणे हटविण्यास विरोध कायम आहे.

सगळ्यांचे पुनर्वसन होणार : राजेंद्र निंबाळकर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प प्रमुख

दरम्यान, आंबिल ओढा प्रकल्पातील सर्व नागरिकांचे पुनर्वसन होणार असल्याचे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे प्रमुख राजेंद्र निंबाळकर यांनी सांगितले. महापालिकेच्यावतीने अतिक्रमण कारवाई करण्यात येत असली तरी नागरिकांचे पुनर्वसन करूनच कारवाई केली असल्याचे त्यांनी सांगितले. ओढ्याचा प्रवाह पूर्ववत करण्यासाठी आंबिल ओढ्याची खोली आणि रुंदी वाढवून त्याच्या कडेला भिंत बांधण्याचे काम महापालिकेकडून केले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर दांडेकर पूल लगत असलेल्या या भागातील झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच 134 घरे असून या सगळ्यांचे स्थलांतर संक्रमण शिबिर (ट्रान्झिट कॅम्प) मध्ये करण्यात आले आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून ही प्रक्रिया सुरू असून 134 पैकी 40 ते 50 जणांना यापूर्वीच स्थलांतरित करण्यात आले आहे. यानंतर येथे घरे बांधण्याचे नियोजन केले आहे.

दरम्यान महापालिकेच्यावतीने अतिक्रमण कारवाईची नोटीस मिळाली नसून ही नोटीस स्थानिक विकसकाच्या नावाने मिळाली त्यामुळे नागरिकांमध्ये याबाबत रोष निर्माण झालेला आहे. तसेच हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून पावसाळ्यापूर्वी कारवाई करू नये, असे आदेश न्यायालयाने दिले असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. आंबिल ओढ्या लगत असणाऱ्या घरांवर महापालिकेने नोटीस न देता अतिक्रमण कारवाई केल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत कारवाईला विरोध केला. यावेळी काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

''महापालिकेने नोटीस न देता अतिक्रमण कारवाई केल्याने आम्ही विरोध केला. तर आमच्या न्याय हक्कासाठी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला म्हणून दत्तवाडी पोलिसांनी आम्हाला मारहाण करून ताब्यात घेतले. तसेच सकाळी तळजाई पठार येथील सभागृहात ठेवले.''

- किशोर कांबळे (अध्यक्ष,बहुजन एकता परिषद)

''आंबिल ओढ्याची रुंदीकरण करून नाला वाढवण्यासाठी काही बांधकाम व्यावसायिक हस्तक्षेप करत आहे. मनपाच्या अतिक्रमण विभागाने घरावर कारवाई केली आहे.आमच्या हक्काचे घर आम्हाला हवे आहे. मात्र महापालिकेने नोटीस न देता आमच्या घरावर कारवाई केल्याने आम्ही बेघर झालो आहोत.''

चंद्रकांत भिसे (आंबिलओढा, दांडेकरपूल)

''महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आंबिल ओढ्याच्या लगत असल्याने झोपडपट्टीमधील घरावर कारवाई केली. म्हणून याठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. चार वरीष्ठ पोलीस निरीक्षक ,150 पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांच्यावर  प्रतिबंधात्मक कारवाई  करून नागरिकांना ताब्यात घेऊन सोडण्यात आले.''

कृष्णा इंदरकर (वरीष्ठ पोलीस निरीक्षक, दत्तवाडी पोलीस ठाणे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com