एखतपूर च्या माळावर स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग ; दहा गुंठ्यात घेतले दोन लाख रुपयांचे उत्पन्न
MHD26B05055
एखतपूर (ता. सांगोला) : येथील माळावर फुललेली स्ट्रॉबेरीची शेती.
एखतपूरच्या माळावर स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग
दहा गुंठ्यात घेतले दोन लाखांचे उत्पन्न; इतर शेतकऱ्यांसाठी आदर्शवत
महूद, ता. २० : दुष्काळाशी व निसर्गाशी सातत्याने लढणारा सांगोला तालुक्यातील शेतकरी शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत आहे. एखतपूर येथील महिला शेतकरी अर्पणा उत्तम नवले या महिला शेतकऱ्याने महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग करत दहा गुंठ्यात दोन लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांसाठी हा आदर्शवत प्रयोग असल्याचे बोलले जात आहे.
सांगोला तालुक्यातील बहाद्दर शेतकऱ्यांचे डाळिंब हे मुख्य फळपीक होते. मात्र डाळिंबावर येणाऱ्या विविध रोगांमुळे डाळिंबाचे क्षेत्र कमालीचे घटले आहे. शेतकरी नवनवीन फळ पिकांकडे वळलेला आहे. त्यातूनच शेतकऱ्यांनी पेरू, सीताफळ, ड्रॅगन फ्रूट या फळ पिकांसह ढोबळी मिरची, काकडी, खरबूज, कलिंगडे यांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली आहे. नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता महाबळेश्वर सारख्या थंड हवेत येणाऱ्या लालबुंद स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड सांगोला तालुक्यात केली आहे.
सांगोला तालुक्यातील एखतपूर येथील महिला शेतकरी अर्पणा उत्तम नवले या गेल्या चार वर्षांपासून स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड करत आहेत. अवघ्या दहा गुंठे क्षेत्रामध्ये त्यांनी ऑगस्ट महिन्यात गादीवाफ्यावर मल्चिंग पेपर अंथरूण ठिबक सिंचनद्वारे स्ट्रॉबेरीच्या विंटर डॉन या वाणाची लागवड केली. त्यासाठी लागणारी तीन हजार रोपे त्यांनी सांगली येथून आणली होती. प्रतिरोप आठ रुपये दराने त्यांना ही रोपे मिळाली. दहा गुंठ्यासाठी लागवडीपासून तोड्यापर्यंत सुमारे पन्नास हजार रुपये खर्च आला आहे. सुमारे ५० दिवसानंतर ही स्ट्रॉबेरीची फळे विक्रीस उपलब्ध झाली. महाबळेश्वरच्या थंड हवामानात येणाऱ्या लालबुंद स्ट्रॉबेरीच्या व सांगोल्यातील माळरानावर आलेल्या स्ट्रॉबेरीच्या चवीमध्ये कोणताही फरक नाही.
उष्ण हवामान असणाऱ्या सांगोला परिसरात या स्ट्रॉबेरीच्या फळावर उन्हाच्या चटक्यामुळे पिवळा डाग येण्याची शक्यता असते. त्यासाठी नवले यांनी या संपूर्ण पिकास सावली केली आहे. तसेच दर आठवड्यातून एकदा त्यावर चिकटा येऊ नये यासाठी फवारा घेतला जातो. गेल्या चार वर्षांपासून सलग अर्पणा नवले या महिला शेतकरी सातत्याने स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड करून उत्पन्न घेत आहेत.
सांगोला मार्केटमध्ये होते विक्री
नोव्हेंबरच्या मध्यावर सुरू झालेले स्ट्रॉबेरीचे उत्पादन फेब्रुवारीअखेरपर्यंत सुरू राहते. पुढे या भागात उन्हाळा तीव्र होत असल्याने फेब्रुवारीपर्यंत याचा तोडा संपवावा लागतो. सध्या या स्ट्रॉबेरीची विक्री स्थानिक सांगोला मार्केटमध्ये केली जात आहे. दोनशे ग्रॅमच्या पनेटला वीस रुपये दर मिळतो आहे. व्यापारी, फळ विक्रेते पुढे हेच पनेट ग्राहकांना पन्नास ते साठ ते रुपयांना विकत आहेत.
चौकट
MHD26B05055
कुटुंबीयांसमवेत महाबळेश्वरला फिरायला गेलो असताना त्या ठिकाणी स्ट्रॉबेरीची शेती पाहिली. शेती हा आपल्या कुटुंबाचा पिंड आहे. त्यामुळे आपणही आपल्या शेतात स्ट्रॉबेरी लागवड करावी असा विचार आला. गेल्या चार वर्षांपासून थोड्या क्षेत्रावर त्याची यशस्वी लागवड केली आहे. कमी कालावधी, कमी खर्च व कमी फवारणी यामुळे हे फळपीक भुसार मालाच्या तुलनेत चांगले उत्पन्न देऊन जाते.
- अर्पणा नवले, महिला शेतकरी, एखतपूर (ता. सांगोला)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

