आता तरी भटक्या कुत्र्यांना आवरा!

मंगला गोडबोले
शुक्रवार, 18 मे 2018

भटक्या कुत्र्यांबाबत सूचना पाठवा..
फेसबुक आणि ट्विटरवर 
#StreetDogs
ई-मेल करा 
webeditor@esakal.com वर 

नेहमीच्या प्रभातफेरीला बाहेर पडले असताना बुधवारी (ता. १६) सकाळी ६ वाजता मला एक अनुभव आला. बलभीम मंदिराकडून उजवीकडे वळून कमला नेहरू उद्यानाकडे जात असताना तीन मोठ्या मोकाट कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला. माझ्या डाव्या हाताचा पंजा एका कुत्र्याने फाडला. दुसऱ्याने उजव्या हाताची करंगळी चावली आणि तिसऱ्याने माझ्या दोन्ही मांड्या अन पायांवर अनेक चावे घेतले. यामध्ये मला गंभीर जखमा झाल्या. 

त्यानंतर एका सहृदय परिचिताने मला तातडीने जोशी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. तेथे सुमारे चार तास माझ्या सर्व जखमांवर उपचार करून ११ वाजता घरी सोडण्यात आले.

या काळात सर्व डॉक्‍टरांनी उत्तम साह्य केले; पण सुमारे ४० हजार रुपये खर्च आणि पुढच्या आठवडाभराच्या वेदना ही किंमत मोजावी लागली. जरा सावरल्यावर मी आमच्या भागातल्या नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांना हा प्रकार फोनवर सांगितला. तासाभरानंतर त्या स्वतः, महापालिकेचे दोन वैद्यकीय अधिकारी व एक सहाय्यिका यांना घेऊन घरी आल्या. त्या सर्वांनी मला धीर देत मदतीचे आश्‍वासन दिले, याबद्दल मी त्यांची आभारी आहे.

तरीही नागरी सुरक्षिततेचा प्रश्‍न उरतोच. सर्वसाधारण स्त्रियांपेक्षा माझं वजन व उंची पुष्कळ जास्त असल्याने त्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमध्ये मी रस्त्यावर पडले नाही. जर मी रस्त्यावर आडवी पडले असते, तर त्या कुत्र्यांनी माझा चेहरा, डोळ्यांनाही इजा केली असती. माझ्याजागी लहान मूल, लहान चणीची एखादी बाई असती तर अघटित घडले असते. दैववशात मी वाचले.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी यावर बोलले असता ते म्हणाले की, प्राणिमित्र म्हणविणारे लोक आमच्या कामात अडथळा आणतात. थेट दिल्लीला तक्रार करून कुत्रेनिवारणाबद्दल आमच्या नोकऱ्या धोक्‍यात आणतात. प्राणिमित्रांना सामान्य नागरिकांबद्दल काहीच प्रेम नसावे का ? दुसरा मुद्दा रॅबिजच्या इंजेक्‍शनांचा. ती मिळविण्यासाठी माझ्या पतींना खूप वणवणावे लागले. जवळच्या अनेक मोठ्या हॉस्पिटलांच्या औषधविक्री विभागात ती ठेवत नाहीत. कुत्रा चावल्यावर तातडीने देण्याची इंजेक्‍शने मिळणार नसतील, कुठून दोन-कुठून चार अशी गोळा करावी लागणार असतील, तर काय अर्थ आहे? या खोळंब्याने एखाद्याला प्राणाला मुकावं लागलं तर?

दिवसेंदिवस पुण्यात राहणे अवघड, अशक्‍य आणि धोकादायक होऊ लागले आहे. रस्त्यांवर वाहने चालवली तर अनागोंदी वाहतुकीने प्राणभय ओढवतो. रस्त्यांवर पायी चालले तर मोकाट कुत्र्यांमुळे प्राणभय ओढवतो. माणसांनी या शहरात जगावे कसे? महापालिकेने याची गंभीर दखल घ्यावी. कुत्रे आवरता येत नसतील तर श्‍वानदंशविरोधी लस तरी सर्वत्र, मुबलक उपलब्ध करावी. नाहीतर सर्व नागरिकांना सर्व नागरी करांमधून मुक्त करावे. असा प्रसंग पुन्हा कोणावर येऊ नये ही इच्छा !

Web Title: street dogs issue in pune