कौशल्यावर स्वतःची ओळख (व्हिडिओ)

प्रवीण खुंटे
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

पुणे - तुमच्यातील कौशल्याला कष्ट करण्याची तयारी आणि जिद्दीची साथ मिळाल्यास कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला कोणी रोखू शकत नाही, असा आदर्श पुण्यातल्या अप्पर इंदिरानगर झोपडपट्टी भागातील तरुणांनी घालून दिला आहे. कौशल्य आणि जिद्दीच्या जोरावर आज ते देशभर नाव कमवीत आहेत.

पुणे - तुमच्यातील कौशल्याला कष्ट करण्याची तयारी आणि जिद्दीची साथ मिळाल्यास कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला कोणी रोखू शकत नाही, असा आदर्श पुण्यातल्या अप्पर इंदिरानगर झोपडपट्टी भागातील तरुणांनी घालून दिला आहे. कौशल्य आणि जिद्दीच्या जोरावर आज ते देशभर नाव कमवीत आहेत.

आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक पार्श्‍वभूमी नसलेल्या या १५ ते २० तरुणांनी ‘स्ट्रीट फोर्स’ या डान्स ग्रुपच्या माध्यमातून स्वतःसाठी व्यासपीठ निर्माण केले. यूट्यूब, सिनेमातील नृत्य पाहून पाश्‍चिमात्य देशांतील अनेक नृत्य प्रकारांवर प्रभुत्व मिळवले आहे. यामध्ये रॅपिंग, ब्रेक डान्स, लॉकिंग पॉपिंग, बीबोइंग (ब्रेकिंक), बीट बॉक्‍स, फुटबॉल फ्री स्टाइल आदी नृत्याचा समावेश आहे. सहा वर्षांपासून अप्पर इंदिरानगर भागातील सार्वजनिक सभागृहात ते सराव करतात. दिल्ली, मुंबई, बंगळुरू आदी शहरांमध्ये स्पर्धांमध्ये ते भाग घेतात. आता हेच त्यांच्या उत्पन्नाचेही साधन झाले आहे.

याविषयी धनंजय रोकडे म्हणाला, की ‘स्ट्रीट फोर्स’ म्हणजे रस्त्यावरील ताकद. आमची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, त्यात आम्ही वस्ती भागात राहतो, त्यामुळे आमच्यापर्यंत कोणी पोचत नाही. पण, आता आम्हाला दिशा सापडली आहे.

शुभम केंदळे म्हणाला, ‘‘पाच वर्षांपासून मी नृत्य शिकत आहे. वस्ती भागात गुन्हेगारी खूप आहे. पण, या नृत्यामुळे अनेक तरुण गुन्हेगारीकडे वळत नाहीत. सायंकाळी ४ ते ८ या वेळेत आम्ही सराव करतो.’’

आशुतोष म्हणाला, ‘‘आम्ही जे करतो त्याला अजूनही फारशी मान्यता नाही; पण दिवसेंदिवस याची क्रेज वाढत चालली आहे. .’’

शिक्षण घेतले नसले तरी तंत्रज्ञान वापरायचे ज्ञान या तरुणांनी आत्मसात केले आहे. सर्व समाज माध्यमांचा वापर करून ते लोकांपर्यंत पोचत आहेत.

Web Title: Street Force Dance Group Identity Slum Area Youth