
Pune News : पेन्शन बंद करण्यासाठीही करावा लागतोय संघर्ष !
पुणे : सेवानिवृत्ती वेतन (पेन्शन) मिळावे, ते वेळेवर खात्यात जमा व्हावे यासाठी ज्येष्ठ नागरिकांना सातत्याने संघर्ष करावा लागतो. मात्र, मृत व्यक्तिच्या नावावर जमा होणारे सेवानिवृत्त वेतन बंद करावे, यासाठी एका ज्येष्ठ महिलेला हेलपाटे घालावे लागत आहेत.
या निमित्ताने महापालिकेच्या शिक्षण मंडळाचा कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. विशेष म्हणजे एका स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नीबाबत हा प्रकार घडला आहे. मीराबाई काळूराम लोखंडे या शिक्षण मंडळातून ३१ वर्षांच्या सेवेनंतर १९९१ मध्ये शिपाई या पदावरून निवृत्त झाल्या.
गेल्यावर्षी ४ फेब्रुवारी रोजी त्यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांच्या कन्या सुनंदा प्रकाश साळवी यांनी बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये जावून लोखंडे यांच्या निधनाची माहिती दिली. तेथील अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार साळवी या शिक्षण मंडळात गेल्या.
तेथे लोखंडे यांच्या निधनाचे प्रमाणपत्र सादर करून सेवानिवृत्ती वेतन बंद करण्याचा अर्ज भरून दिला. तसेच मार्चमध्ये लोखंडे यांच्या नावावर जमा झालेल्या १३ हजार ८१९ रुपयांचे सेवानिवृत्ती वेतन डिमांड ड्राफ्टद्वारे महापालिकेत गेल्यावर्षी २४ मार्च रोजी जमाही केले. त्यानंतर लोखंडे यांच्या नावावर सेवानिवृत्ती वेतन जमा होणार नाही, असा निर्वाळा त्यांना शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांनी दिला.
मात्र, त्यानंतरही या वर्षी मार्चपर्यंत सेवानिवृत्ती वेतन लोखंडे यांच्या नावावरील बॅंक खात्यात जमाच होत आहे. बॅंक खात्यातील सेवानिवृत्ती वेतनाची रक्कम आता दोन लाख ६४ हजार २९८ रुपये झाली आहे.
साळवी यांनी पुन्हा शिक्षण मंडळ, बॅक ऑफ महाराष्ट्रमध्ये संपर्क साधला. त्यांना पुन्हा अर्ज भरून देणे, खात्यातील जमा रकमेचा डिमांड ड्राफ्ट देणे हे सोपस्कार पुन्हा करण्यास सांगितले. साळवी या ज्येष्ठ नागरिक आहेत.
त्या म्हणाल्या, ‘‘आईचे निधन झाल्यावर आम्ही तातडीने शिक्षण मंडळात संपर्क साधून जमा झालेले सेवानिवृत्ती वेतन त्यांना परत केले. त्यावेळी अर्जही भरून दिला. सर्व प्रक्रिया केली तरी सेवानिवृत्ती वेतन सुरूच राहिले. आता पुन्हा ती सगळी प्रक्रिया करायची म्हणजे हेलपाटे मारावे लागतात. हा अनुभव विदारक आहे.’’
या बाबत शिक्षणाधिकारी मीनाक्षी राऊत म्हणाल्या, ‘‘सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून दरवर्षी हयात प्रमाणपत्र घेतले जाते. त्यानंतरच त्यांचे सेवा निवृत्तीवेतन जमा केले जाते. लोखंडे यांच्या प्रकरणाबाबत चौकशी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल.’’
मीराबाई यांचे पती का. दौ. लोखंडे हे स्वातंत्र्य सैनिक होते. आझाद हिंद सेनेत ते होते. त्यांचे निधन १९५८ मध्ये झाले. त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात कळविल्यावर त्यांनी तत्परतेने सेवानिवृत्ती वेतन बंद केले होते. मात्र, शिक्षण मंडळाचा अनुभव विपरित असल्याचा अनुभव आल्याचे त्यांच्या कन्या सुनंदा साळवी यांनी ‘सकाळ’ला सांगितला.