#StudentIssue खोल्यांमध्ये पाणी अन्‌ दुर्गंधीही

Ambedkar-Student-Hostel
Ambedkar-Student-Hostel

पुणे - वसतिगृहाच्या जिन्यामध्ये सांडलेले पाणी, तुंबलेली बाथरूम, भिंतीमधून खोल्यांमध्ये पाझरणारे पाणी अन्‌ दुर्गंधी अशा वातावरणात महापालिकेच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा जीव गुदमरतोय, त्यामुळे शिक्षणासाठी बाहेरगावाहून आलेले विद्यार्थी हैराण झाले आहेत.

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात महापौर बंगल्यासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहाची पाहणी केली असता तेथे अस्वच्छता दिसून आली. सुविधांचा अभाव, अस्वच्छतेमुळे वसतिगृहातील वातावरण शिक्षणासाठी पूरक नसल्याची तक्रार विद्यार्थी करत आहेत. वसतिगृहात शिरताच दुर्गंधी येते. बाथरूमच्या भिंती पाइपांबाहेर वाहणाऱ्या पाण्यामुळे ओलवल्या आहेत. तसेच, बाथरूममधून पाणी झिरपत ते विद्यार्थ्यांच्या खोलीत पाझरत आहे. त्यातून विद्यार्थ्यांच्या खोल्याही ओलावलेल्या आहेत. स्वच्छतागृह आणि बाथरूमची वसतिगृहात आधीच कमतरता आहे, त्यातही असलेली बाथरूम तुंबलेली आहेत. 

वसतिगृहातील तीनपैकी एका इमारतीमध्ये ३५ खोल्यांसाठी दोनच स्वच्छतागृहे सुरू आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रासाला सामोरे जावे लागते. तसेच, येथील तीन इमारतींपैकी दोन विंगमध्ये गरम पाणी येत नसल्याने विद्यार्थ्यांना गार पाण्याने अंघोळ करावी लागते. पाणी गरम करण्यासाठी हीटर वापरल्यास ते जप्त केले जाते. वसतिगृहाच्या जिन्यातील फरशीवर घाणीचे थर साचले आहेत, त्यांचीही वेळच्यावेळी साफसफाई होत नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाने मोठ्या टाक्‍यांची व्यवस्था केली आहे. मात्र, त्यातील पाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी एकही फिल्टर बसविला नसल्याने पाण्याच्या गुणवत्तेवरच विद्यार्थी शंका उपस्थित करत आहेत.

पुण्यात इतर ठिकाणी राहण्याची सुविधा नसल्याने अस्वच्छतेतच राहावे लागते. वसतिगृहातील बाथरूम तुंबलेली आहेत. असुविधांबाबत तक्रार केल्यास लक्ष्य केले जाण्याची शक्‍यता असते, त्यामुळे असुविधांविषयी तक्रार करत नाही.
- एक विद्यार्थी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह.

विद्यार्थ्यांनी त्यांच्या अडचणी वसतिगृह प्रमुखांच्या निदर्शनाला आणून द्याव्यात. तेथील प्रश्‍न न सुटल्यास समाजविकास विभागाकडे तक्रार करावी. त्यानंतर प्रलंबित प्रश्‍न तत्काळ सोडवले जातील. तसेच, वसतिगृह प्रमुखांना समस्यांविषयी विचारणा केली जाईल.
- नितीन उदास, उपायुक्त, समाज विकास विभाग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com