भंगार वेचणाऱ्याने बनवला लघुपट

डी. आर. कुलकर्णी
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

पुणे - चित्रपट पाहण्याच्या वेडापायी मी शाळेला रामराम ठोकला... चांगल्या-वाईट मार्गानं हे वेड मी जपलं, जोपासलं... वस्तीतल्या मुलांच्या संगतीनं उनाडक्‍या करताना नकळत माझी पावलं गंमतशाळेकडे वळली अन्‌ चार इयत्ता शिकून मी उत्तम व्हिडिओ एडिटर बनलो... झोपडपट्टीतील आयुष्याच्या शिदोरीवर मी एक लघुपट
बनवला असून, एका राष्ट्रीय लघुपट महोत्सवात तो निवडला गेला आहे.

पुणे - चित्रपट पाहण्याच्या वेडापायी मी शाळेला रामराम ठोकला... चांगल्या-वाईट मार्गानं हे वेड मी जपलं, जोपासलं... वस्तीतल्या मुलांच्या संगतीनं उनाडक्‍या करताना नकळत माझी पावलं गंमतशाळेकडे वळली अन्‌ चार इयत्ता शिकून मी उत्तम व्हिडिओ एडिटर बनलो... झोपडपट्टीतील आयुष्याच्या शिदोरीवर मी एक लघुपट
बनवला असून, एका राष्ट्रीय लघुपट महोत्सवात तो निवडला गेला आहे.

भंगार वेचून चित्रपट पाहण्याचा छंद जोपासणारा इंद्रजित नारायण जोगदंड आपल्या आयुष्याचा लघुपट उलगडत होता. मूळचा अंबाजोगाईचा असलेला इंद्रजित विश्रांतवाडीतील भीमनगरमध्ये राहतो. घरची गरिबी, तीन भाऊ, एक बहीण, आई-वडील असे मोठे कुटुंब. वडील बिगारी कामावर, तर आई व एक भाऊ भंगार वेचायचे. इंद्रजितचं पाचवीपर्यंतचं शिक्षण विनाअडथळा पार पडलं. नंतर त्याला शाळा आवडेनाशी झाली; पण चित्रपटाची आवड अखंड राहिली. शाळा सोडून वस्तीतल्या मुलांबरोबर तो आयुष्य जगू लागला. भंगार वेचून व मिळेल त्या मार्गानं पैसे मिळवून तो चित्रपट पाहू लागला. वीस-पंचवीस वर्षांपूर्वीची ही स्थिती. चित्रपट पाहिल्यानंतर वस्तीतल्या मुलांना तो चित्रपटाची कथा सांगायचा. ती मुलं त्याला त्यासाठी पैसे द्यायची. त्यातून तो पुन्हा दुसरा चित्रपट पाहायचा. त्यानंतर एका समाजमंदिरात सुरू झालेली गंमतशाळा त्याला खुणावू लागली. अभ्यासापेक्षा तिथं खेळायला मिळतंय, खाऊ मिळतंय याचं आकर्षण होतं. नकळत त्याची पावलं आधी गंमतशाळेकडे आणि नंतर शाळेकडे वळली. त्यातून तो दहावी उत्तीर्ण झाला.

इंद्रजित म्हणाला, ""सांगतो, गंमतशाळेनं मला आत्मविश्‍वास दिला. मला बोलायला शिकवलं. अनुराधा सहस्रबुद्धे मॅडमनी खूप धीर दिला. माझी चित्रकला त्यांच्या प्रोत्साहनाने फुलवली. आत्मविश्‍वासपूर्वक बोलण्यामुळं मी मार्केटिंगमध्ये चांगलं काम केलं. पुण्यातल्या पहिल्या फूडवर्ल्डमध्ये मी सेल्समनपासून ते स्टोअर मॅनेजरपर्यंत काम केलं. नागरवस्ती विकास योजनेतून व्हिडिओ शूटिंग व एडिटिंगचं प्रशिक्षण घेतलं. सिनेमाच्या वेडाचा फायदा करून घ्यायचा या ईर्ष्येने मी "पीडा' नावाचा लघुपट बनवला.'' अंधश्रद्धेपोटी नातवाचा जीव घेणाऱ्या आजीची कथा त्यात मांडली. साताऱ्यात नुकत्याच झालेल्या विवेक नॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये देशभरातून 264 लघुपटांमध्ये स्पर्धा झाली. त्यातील 38 लघुपट सादरीकरणासाठी निवडले गेले. अंनिस व दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या आटपाट संस्थेने हा महोत्सव आयोजित केला होता. माझी "पीडा' त्यात होती. या निवडीचा निकाल कधी लागतोय, हे पाहण्यासाठी मी रात्रभर तरसत होतो. दहा-दहा मिनिटाला इंटरनेट पाहायचो. अखेर रात्री सव्वा दोन वाजता माझं नशीब पालटलं. 38च्या यादीत माझं नाव होतं, असे त्याने सांगितले.

स्क्रिनिंगला प्रेक्षकांकडून दाद
महोत्सवात दुसऱ्या दिवशी लघुपटाचं स्क्रिनिंग झाल्यावर जेव्हा प्रेक्षकांनी उभा राहून अभिवादन केलं, त्या वेळी मी भरून पावलो. भंगार वेचणाऱ्या इंद्रजितच्या सर्जनशीलतेला समाजानं दिलेली ती दाद होती. आज इंद्रजित एका इव्हेन्ट कंपनीत व्हिडिओ एडिटर आहे. अंधश्रद्धेमुळं समाजात निर्माण होणारी पीडा त्याला बोचतेय. त्यासाठी तो याच विषयावर एक चित्रपट लिहितोय.

Web Title: Student from poor background created shortfilm