स्पर्धा परीक्षेचे वास्तव : कोरोनातील परीक्षा आणि करिअरसाठी संघर्षाचा दबाव सहन होईना

ब्रिजमोहन पाटील
Thursday, 24 September 2020

पाच एप्रिलला राज्यसेवेची परीक्षा घेणारच अशी भुमिका महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतली होती, त्यामुळे अनेक विद्यार्थी पुण्यात दहशतीत रहात होते. परीक्षा दोन चार दिवसांवर आलेली असताना आयोगाने परीक्षा पुढे ढकलली अन विद्यार्थी मिळेल त्या वाहनाने गाव गाठले.

पुणे : घरी दोन एकर शेती, वडील साखर कारखान्यामध्ये कामाला जातात, आई गृहिणी आहे, मी अधिकारी व्हावे म्हणून त्यांनी मला पुण्यात पाठवले. गेल्या तीन चार वर्षापासून सतत प्रयत्न करतोय पण यश थोडक्‍यात हुलकावनी देत आहे. काही करून यावर्षी राज्यसेवा उत्तीर्ण करायचीच म्हणून चंग बांधला. पण कोरोनाने घात केला, परीक्षा वारंवार पुढे ढकलण्यात आली, अभ्यासात अडथळे आले.

पुढच्या वर्षी नव्याने पदभरती होईल का हे माहिती नाही. पुढच्या महिन्यात परीक्षा आहे. फक्त अशा वातावरणात प्रयत्न करणे एवढेच माझ्या हातात आहे, असे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा योगेश बाबर सांगत होता. योगेश हा केवळ एक प्रतिनिधी आहे असे लाखो योगेश आपले काय होणार? या विचाराने चिंतते आहेत.

पुण्यात नऊ मार्चला 'कोरोना'चा पहिला रुग्ण आढळला, काही दिवसांनी शाळा, महाविद्यालये, क्‍लासेस बंद करण्याचे आदेश सरकारने काढले. पाच एप्रिलला राज्यसेवेची परीक्षा घेणारच अशी भुमिका महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतली होती, त्यामुळे अनेक विद्यार्थी पुण्यात दहशतीत रहात होते. परीक्षा दोन चार दिवसांवर आलेली असताना आयोगाने परीक्षा पुढे ढकलली अन विद्यार्थी मिळेल त्या वाहनाने गाव गाठले.

तेव्हापासून या विद्यार्थ्यांवर प्रचंड मानसिक ताण निर्माण झाला आहे. गेल्या सहा महिन्यात पुणे 'कोरोना'चे हॉटस्पॉट शहर झाले आहे. त्यामुळे पुण्यात यायचे म्हणले की 'आपला जीव महत्वाचा की करियर' अशी द्विधा मनस्थिती विद्यार्थी, पालक यांची निर्माण होत आहे. पुढच्या महिन्यात होणाऱ्या परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी केवळ पाच ते 10 हजार विद्यार्थी पुण्यात आहेत.

स्पर्धा परीक्षेचे वास्तव

दरवर्षी हजारो विद्यार्थी अधिकारी होण्याचे स्वप्न घेऊन पुण्यात येतात, पण स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्याचं नेमकं प्रमाण किती? हा प्रश्‍न कायम उपस्थित केला जातो. पुण्यातील बहुतांश विद्यार्थी हे 'यूपीएससी' पेक्षा 'एमपीएससी'ची तयारी करतात. वर्षभरात राज्यसेवा, दुय्यम सेवा अराजपत्रीत गट ब आणि अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा यासाठी भरती प्रक्रिया राबविली जाते. राज्यसेवेसाठी 300 ते 400, अराजपत्रीत गट ब साठी सुमारे 800 तर अभियांत्रिकीसाठी सुमारे 200 ते 250 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाते. पण महाराष्ट्रभरातून या परीक्षांसाठी सुमारे साडे चार लाख अर्ज दाखल होतात.

प्रचंड स्पर्धा असल्याने विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी एकाग्रतेने अभ्यास करण्याशिवाय पर्याय नाही. एक दोन वेळा अपयश आल्यानंतर घरचे काही म्हणत नाहीत, पण त्यानंतर मात्र अजून किती वेळा याच परीक्षा देणार आहेस? पुढचा काही विचार केला आहे की नाही' अशी विचारणा सुरू होते. त्यातून विद्यार्थ्यांच्या मनावरील दडपण वाढत जाते. मग ही अपयशी झालेली मुले काय करत असतील कधीच कोणाला समजत नाही.

हिशोब बिघडला

पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी फक्त क्‍लास आणि अभ्यासाचे साहित्य याचाच खर्च एक लाखाच्या पुढे जातो. यामध्ये क्‍लाससाठी सुमारे 50 हजार ते एक लाख, टेक्‍स्ट सिरीज 10 हजार, अभ्यासिका सरासरी 12 हजार, पुस्तकांचा खर्च 10 हजार असा हा खर्च एक लाखापेक्षा पुढे जातो. अनेक पालक कर्ज घेतात, काही व्याजाने पैसे उचलतात. त्यामुळे घरच्यांवर येणारा आर्थिक ताण याचा विचार करता, परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांची स्थिती करो या मरो अशीच असते. कोरोनामुळे अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसायाला उठाव नाही, शेतकरीही चिंतेत आहेत. या बिघडलेल्या आर्थिक स्थितीमुळे सर्वांचाच हिशोब बिघडल्याने विद्यार्थी लगेच पुन्हा पुण्याकडे येतील अशी स्थिती नाही.

ऐजबारचा धोका

'एमपीएससी' साठी पदानुसार वयाची अट बदलत जाते, पण साधारणपणे विविध पदांनुसार खुल्या गटासाठी 31 ते 38 आणि मागासवर्गीय गटासाठी 36 ते 43 वयापर्यंत परीक्षा देता येते. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना वयाची तिशी ओलांडल्यानंतर अनेक प्रश्न समोर उभे राहतात. अभ्यासही सोडता येत नाही आणि वय वाढल्याने घरच्यांचा दबाव वाढतो. लग्न, नोकरी याबद्दल प्रश्‍न उपस्थित केले जातात. कोरोनामुळे आता परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत, पुढच्या वर्षी भरती होईल की नाही हे माहिती नसल्याने या विद्यार्थ्यांना ऐजबार होण्याची भिती आहे. त्यामुळे पदभरतीसाठी वयाची अट वाढवावी अशीही मागणी विद्यार्थी करत असतात.

उस्मानाबाद येथील शिवराज जाधव म्हणाले, पाच वर्षांपासून माझा मुलगा पुण्यात होता, कोरोनावर लस येत नाही तो पर्यंत काही खरे नाही, सध्या अभ्यासिका, मेस बंद आहेत, एका खोलीत किमान तीन ते चार जण राहतात. पुण्यात आल्यानंतर मुले बाहेर फिरणार त्यामुळे त्यांना कोरोनाचा धोका आहेच. त्यामुळे मुलाला आता काही पुण्यात पाठवणार नाही. त्यापेक्षा जमेल तसा गावाकडे बसून अभ्यास करावा.

रायचंद वाघ म्हणाले, कोरोनामुळे सध्या परीक्षापुढे मानसिकतेत बदल झाला आहे. त्यातच घरात राहून स्पर्धा परीक्षा करणे अवघड आहे. आर्थिक संकटही आहे. अशा स्थितीत स्वतःचे मनोबल चांगले ठेऊन परीक्षेत यशस्वी होण्याचे आव्हान समोर आहे.

चाणक्‍य मंडल परिवाराचे प्रमुख अविनाश धर्माधिकारी म्हणाले, कोरोनाच्या संकटामुळे युवक प्रचंड मानसिक तणावात आहे, ज्याचे मनोधैर्य उत्तम आहे तो पुढील परीक्षेत यश नक्कीच मिळवेल. क्‍लास घेण्यास परवानगी नसल्याने खीळ बसली आहे, पण ऑनलाइन माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सुरू आहे. विद्यार्थ्यांची आर्थिक क्षमता नसल्यास त्यांना सवलत दिली जात आहे. कोरोनाचे संकट दूर होईपर्यंत विद्यार्थी पुण्यात येण्याचे प्रमाण कमी असेल, पण त्यानंतर पुन्हा विद्यार्थी पुण्यात परततील.

- आर्थिक संकट ओढवल्याने तणावात भर
- मुलांना पुण्यात पाठविण्यास पालकांचा नकार
- घरात अभ्यास करताना अडथळे
- अभ्यासासह नोकरीकडेही लक्ष देण्याचा पालकांचा सल्ला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students are not able to withstand the pressures of exams and careers in Corona