Video : JNU attack : जेएनयू हल्लाप्रकरणी विद्यार्थी एकवटले 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जानेवारी 2020

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुरोगामी संघटनांनी सोमवारी सायंकाळी एकत्र येऊन केंद्र सरकार व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) विरोधात हल्लाबोल केला.

पुणे - दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या विरोधात पुण्यातील विद्यार्थीही आक्रमक झाले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुरोगामी संघटनांनी सोमवारी सायंकाळी एकत्र येऊन केंद्र सरकार व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) विरोधात हल्लाबोल केला. "हुकुमशाही से आझादी, इस सरकार से आझादी' यासह अनेक घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यात राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदमदेखील सहभागी झाले होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

विद्यापीठात अनिकेत कॅन्टीन येथे सायंकाळी सातच्या सुमारास आंदोलन सुरू झाले. हलकीच्या तालावर घोषणाबाजी सुरू झाली. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग यांचे फोटो हातामध्ये घेऊन विद्यार्थी जमा झाले. या वेळी "आझादी आझादी, इनक्‍लाब जिंदाबाद, लोकशाही जिंदाबाद, हुकुमशाही मुर्दाबाद' अशा घोषणांनी विद्यार्थांमध्ये उत्साह निर्माण झाला. विद्यार्थांनी भाषणे करताना मोदी सरकारवरील चीड व्यक्त केली. ""देशाचे संविधान सर्वधर्मीयांना समान वागणूक देत असताना मोदी सरकार सीएएच्या माध्यमातून विषमात निर्माण करत आहे. तरुणांना रोजगार देण्यात सरकार अपयशी ठरल्याने असे विषय समोर काढत आहे. जेएनयूतील विद्यार्थी त्यांच्यापुढे झुकत नसल्याने रविवारी हा हल्ला घडवून आणला; पण आम्हीही तेथील विद्यार्थांच्या सोबत उभे असून, त्यांच्यापुढे झुकणार नाही,'' अशा शब्दांत अनेक विद्यार्थ्यांनी निषेध केला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेले राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांनी विद्यार्थ्यांमध्ये बसून, त्यांची भाषणे ऐकली. "इनक्‍लाब जिंदाबाद'च्या घोषणाही त्यांनी दिल्या. दरम्यान, गरवारे महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांनी "जेएनयू'तील डाव्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आंदोलन केले; तर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे बालगंधर्व रंगमंदिर चौकात निदर्शने करण्यात आली. 

"अभाविप'तर्फेही आंदोलन 
"जेएनयू'तील विद्यार्थ्यांवर झालेल्या मारहाणीत डाव्या संघटनांचाच हात आहे, असा आरोप करत "अभाविप'च्या कार्यकर्त्यांनी पुणे विद्यापीठात निदर्शने केली. देशभरात "सीएए'ला समर्थन मिळत असल्याने डाव्या संघटनांनी हे कृत्य केल्याचा आरोप दयानंद शिंदे यांनी केला. 

गेल्या पाच वर्षांत विद्यार्थ्यांवर वारंवार हल्ले झाले आहेत. देशातील स्वातंत्र्य, लोकशाही धोक्‍यात आहे. विद्यापीठांमध्ये भीतीचे वातावरण असले तरी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही. त्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. 
- डॉ. विश्‍वजित कदम, राज्यमंत्री 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students concentrated on JNU attack