Pune University : ‘अभियांत्रिकी’मधील विद्यार्थी संशोधनात अग्रेसर;डॉ. सीताराम,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १२४वा पदवीप्रदान सोहळा

‘‘भारत संशोधन आणि नावीन्यता क्षेत्रात जागतिक पातळीवर चौथ्या क्रमांकावर आहे. परंतु देशातील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या तुलनेत भारतीय विज्ञान संस्थेत (आयआयएससी) सर्वाधिक संशोधन होत आहे.
Pune University
Pune Universitysakal

पुणे : ‘‘भारत संशोधन आणि नावीन्यता क्षेत्रात जागतिक पातळीवर चौथ्या क्रमांकावर आहे. परंतु देशातील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या तुलनेत भारतीय विज्ञान संस्थेत (आयआयएससी) सर्वाधिक संशोधन होत आहे. दरवर्षी देशातील सर्व ‘आयआयटी’मधून जवळपास १५ हजार विद्यार्थी पदवीधर होतात, तर मोठ्या शहरांमधील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यापेक्षा अधिक विद्यार्थी पदवीधर होत आहेत. नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी संशोधनात अग्रेसर असल्याचे दिसून येते’’, असे उद्‌गार अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. टी. जी. सीताराम यांनी काढले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १२४वा पदवी प्रदान सोहळा डॉ. सीताराम यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी झाला. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे उपस्थित होते. संशोधन आणि नावीन्यता क्षेत्रात खूप वाव असून विद्यार्थ्यांनी त्यात योगदान द्यावे, असे डॉ. सीताराम यांनी नमूद केले. ते म्हणाले, ‘‘भारत गेल्या ४० ते ३५ वर्षांपासून संपूर्ण जगाला चांगले अभियंते आणि व्यवस्थापक देत आहे. जगात अशी एकही कंपनी नाही, ज्यात भारतीय अभियंते आणि व्यवस्थापक नाहीत. देशात अत्यंत प्रतिभावान विद्यार्थी घडत आहेत. यातील काही विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जात आहेत. परंतु, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार होणाऱ्या बदलांमध्ये शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी करण्याची ताकद आहे.’’

‘एआयसीटीई’ने नुकतीच सी-कॅम्प (सेंटर फॉर सेल्युलर ॲण्ड मोलेक्युलर प्लॅटफॉम्स्‌) समवेत सहयोग करून ‘एआयसीटीई-इंटर इन्स्टिट्यूशनल बायोमेडिकल इनोव्हेशन्स प्रोग्रॅम’ (आयबीआयपी) सुरू केला आहे. या अंतर्गत अभियांत्रिकी आणि वैद्यकीय संस्थांमध्ये एकत्रितरीत्या आंतरविद्याशाखीय शिक्षण, संशोधन आणि इनोव्हेशन करणे शक्य होणार असल्याचेही डॉ. सीताराम यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. गोसावी म्हणाले, ‘‘सर्वच क्षेत्रात भारताचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याची मोठी जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे. पदवी घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने भारताच्या आंतरराष्ट्रीयीकरणात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ब्रॅण्ड ॲम्बेसिडर म्हणून आपली भूमिका निष्ठेने पार पाडावी’’. कार्यक्रमात विविध विद्या शाखांमधील ७१ विद्यार्थ्यांना ११७ सुवर्णपदके प्रदान करण्यात आली.

‘‘रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धीमत्ता, मशिन लर्निंग, डेटा सायन्स हे भविष्यातील तंत्रज्ञान नाही; तर हे तंत्रज्ञान सध्या अस्तित्वात असून वापरात देखील आहे. त्या-त्या क्षेत्रातील भाविष्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञानातील कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे. आगामी काळात रोबोटद्वारे कोणतीही नोकरी, काम अचूक करणे शक्य होणार आहे. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांसमोर हे नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आव्हान आहे. शिक्षकांची भूमिका देखील केवळ शिकविण्यापूरती मर्यादित असणार नाही. शिक्षकांनाही नवीन तंत्रज्ञान, त्यातील कौशल्यांचे ज्ञान घ्यावे लागेल’’, असा सल्ला डॉ. सीताराम यांनी दिला.

प्रमाण ५० टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट

‘‘देशात जवळपास २५ कोटी विद्यार्थी हे दरवर्षी शालेय शिक्षण घेतात. दरम्यान, केवळ २८.३ टक्के विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतात. उर्वरित विद्यार्थी कोठे जातात, हा गंभीर मुद्दा आहे. एखाद्या विकसित देशात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण हे ८५ टक्के आहे. भारत विकसित राष्ट्र होण्याकडे वाटचाल करत असताना, निदान आपल्याला २०३५पर्यंत उच्च शिक्षणात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत आणणे आवश्यक आहे. त्यासाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांना सामावून घेणाऱ्या विद्यापीठांची निर्मिती होणे आवश्यक आहे,’’ असे मत डॉ. सीताराम यांनी व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com