esakal | फराळासाठी आमच्याकडे खवय्ये मिळतील!
sakal

बोलून बातमी शोधा

panchnama

दिवाळीतील पहिल्या आठवड्यातील अनेक कटू आणि दाहक अनुभव आम्ही पचवले आहेत. त्यामानाने फराळ पचवणे आम्हाला सोपे वाटते. दिवाळीत अनेक ठिकाणी आमच्यासमोर परातभर फराळ ठेवला जातो.

फराळासाठी आमच्याकडे खवय्ये मिळतील!

sakal_logo
By
सु. ल. खुटवड

दिवाळीतील पहिला आठवडा आम्ही कोणाच्याही घरी जायचे टाळतो. कोणी कितीही आग्रह केला तरी आम्ही आमचे मत बदलत नाही. यंदा तर कारणच सापडलंय. कोणी फारच प्रेमाने आग्रह केला तर सरळ सांगतो, ‘आलो असतो; पण कोरोना झाल्यामुळे आम्ही घरीच क्वारंटाइन आहोत. तुमची फारच इच्छा असेल तर येतो.’ असे म्हटल्यावर समोरची व्यक्ती भांबावून जाते. ‘नको. नको. आम्ही दुसरं ‘गिऱ्हाईक’ बघतो.’ खरं तर त्यांना आम्ही दुसऱ्या मित्रांना बोलवतो, असे म्हणायचे असावे, मात्र गडबडून ती व्यक्ती ‘गिऱ्हाईक’ हा शब्द वापरत असावी.   

दिवाळीतील पहिल्या आठवड्यातील अनेक कटू आणि दाहक अनुभव आम्ही पचवले आहेत. त्यामानाने फराळ पचवणे आम्हाला सोपे वाटते. दिवाळीत अनेक ठिकाणी आमच्यासमोर परातभर फराळ ठेवला जातो. आम्ही खातो की नाही, हे पाहण्यासाठी वहिनी आमच्यासमोर ठाण मांडून बसतात. ‘‘करंजी घ्या. एकदम खुसखुसीत आहे. लाडू आधी संपवा. वहिनींनी केलेले लाडू इतके कडक होते, की ते एकमेकांवर घासले असते तर त्यातून अग्नी निघाला असता पण आम्ही तसे चेहऱ्यावर काही दाखवत नाही.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘‘तुम्ही चकलीला तर हातही लावला नाही. आख्ख्या सोसायटीत माझ्यासारखी चकली कोणी कोणी करत नाही,’’ असे म्हणून आणखी दोन चकल्या त्या वाढतात. आता आपण काही त्यांच्या सोसायटीतील प्रत्येक घरी जाऊन, त्यांचे विधान खरं की खोटं याची शहनिशा करत नाही. त्यामुळे तोंडात चकली टाकून, त्यांना ‘खलंय.. खलंय’ असेच म्हणावे लागते. तोंडात चकली असल्याने ‘खरंय’चा उच्चार ‘खलंय’ असाच होतो. त्यामुळे त्यांचा उत्साह वाढून, आणखी दोन- तीन करंज्या परातीत पडतात.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘‘अहो, आमच्या यांना असलं काही चालत नाही. मुलं तर ढुंकूनसुद्धा पाहत नाही. त्यामुळे फेकून देण्यापेक्षा असं कोणालातरी खायला घालते. तुम्ही लाजू नका. अनारसे घ्या अजून. माझ्यासारखे अनारसे आख्ख्या....’’ त्यांचे बोलणे पूर्ण होण्याआधीच आमच्या घशात लाडू अडकला होता. 

‘‘अजून दोन- तीन दिवस वाट बघणार आहे. तुमच्यासारखे अजून कोणीतरी सापडतील आणि नाही सापडले तर शेजारील मंदिरातील भिकाऱ्यांना देणार आहे. अहो, तेवढंच पुण्य. तुम्ही लाजू नका. तेवढ्या करंज्या संपवा.’’ त्यांचा हा प्रेमळ आग्रह पाहून आम्ही हात आवरता घेतला. एका मित्राने फारच आग्रह केला म्हणून आम्ही गेलो होतो. तर दरवाज्याबाहेरच नवरा- बायकोचे भांडण ऐकू येत होते.

‘‘मी एवढ्या कष्टाने एवढा फराळ करते, आणि तुम्ही त्याला तोंडही लावत नाही. माझ्या कष्टाची तुम्हाला काही कदरच नाही. बऱ्या बोलाने खाताय की कायमची माहेरी निघून जाऊ.’’ असे म्हणून वहिनी रडू लागल्या. आम्ही घरात प्रवेश केल्यानंतर वातावरण एकदम बदलले. एका मोठ्या ताटात फराळ आला. इच्छा नसतानाही फक्त त्यांचा संसार वाचावा म्हणून आम्ही त्यावर तुटून पडलो. आम्ही तृप्तीचा ढेकर दिल्यानंतर वहिनीही खुश झाल्या व त्यांनी माहेरी जाण्याचा बेत रद्द केला. आमच्या फराळ खाण्याने एकाचा संसार वाचला, एवढे पुण्य आमच्या गाठीशी आहे.  या सगळ्या अनुभवातून आम्ही लवकरच एका नवीन व्यवसायाला सुरवात करतोय.

‘तुमच्या येथील फराळ संपविण्यासाठी चोखंदळ व खवय्ये माणसे भाडे तत्त्वावर पुरवली जातील. तुमच्या फराळाची स्तुती करण्याबरोबरच कितीही कठीण व बिघडलेले खाद्यपदार्थांनाही अजिबात नावे ठेवली जाणार नाहीत, याची हमी देऊ. त्वरा करा. नावनोंदणी सुरू.’’