
प्रशासकीय अधिकारी म्हणून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर १३ पुरस्कार प्राप्त संकेत भोंडवे नुकतेच पुण्यात आले होते. ‘आयएएसची पाऊलवाट’ या त्यांच्या पुस्तकाच्या आठव्या आवृत्तीच्या निमित्ताने भोंडवे यांच्याशी साधलेला संवाद..
प्रशासकीय अधिकारी म्हणून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर १३ पुरस्कार प्राप्त संकेत भोंडवे नुकतेच पुण्यात आले होते. ‘आयएएसची पाऊलवाट’ या त्यांच्या पुस्तकाच्या आठव्या आवृत्तीच्या निमित्ताने भोंडवे यांच्याशी साधलेला संवाद..
प्रश्न - एका अधिकाऱ्याचा लेखक म्हणून प्रवास कसा?
संकेत भोंडवे - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) प्रावीण्य सूचीमध्ये १४ मे २००७ ला माझे नाव आले. तेव्हापासून प्रशासकीय अधिकारी म्हणून माझा प्रवास सुरू झाला. स्पर्धा परिक्षेची तयारी करताना माझ्या लक्षात आले की, मराठी भाषिक मुलांमध्ये परिक्षेविषयीची तळमळ आहे, कष्ट करण्याची क्षमता आहे. मात्र मार्गदर्शनाचा अभाव दिसतो. पिंपरी-चिंचवडमध्ये लहानाचा मोठा झालेला आणि आयएएसपर्यंत पोचलेला कदाचित तेव्हा मी एकटाच होतो. मराठीची टक्का कमी का?, हा विचार मी त्यावेळी केला. प्रशिक्षणाला जाण्यापूर्वी अनेक गावांत फिरलो, विद्यार्थ्यांना भेटलो. यातूनच स्पर्धा परिक्षेबरोबरच आयुष्यातील प्रत्येक स्पर्धेसाठी मार्गदर्शन करणाऱ्या पुस्तकाची कल्पना समोर आली. मावशीच्या मदतीने मी जमेल तसे पुस्तकासाठीचे लिखाण रेकॉर्ड करत गेलो. मुलांना स्पर्धा परिक्षेसाठी काय हवं, काय नको, याची कल्पना मनात पक्की होती. युपीएससीने वेळोवेळी अभ्यासक्रमात बदल केला. त्यानुसार आवश्यक ते बदल यात केले आहे.
प्रश्न - पुस्तकातून वाचकाला काय मिळेल?
शालेय विद्यार्थ्यांपासून आयएएसच्या मुलाखतीला जाणाऱ्या उमेदवारापर्यंत सर्वांसाठी हे पुस्तक उपयोगी आहे. या पुस्तकात अधिकारी म्हणून मी फक्त एक धडा लिहिला आहे. अपयशापासून यशापर्यंतचा प्रवास वाचकाला यातून मिळेल. कारण, मी स्वतः अनेक स्पर्धा परिक्षांमध्ये नापास झालो होतो.
प्रश्न - विद्यार्थ्यांनी काय करावे?
नोकरी करताना स्पर्धा परिक्षेचा अभ्यास कसा करावा यासंबंधीचा धडा पुस्तकात दिला आहे. आपली निवड नाही झाली तरी विद्यार्थ्यांकडे अभ्यासाच्या काळात आत्मसात केलेल्या कौशल्यांची शिदोरी असते. मी बीएससीनंतर एमसीए केले. इन्फोसिसला कामाला लागलो. तिथे ज्या दिवशी परमनंट झालो, त्याचदिवशी राजीनामा दिला आणि अभ्यासाला लागलो.
प्रश्न - प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी कोणते धडे उपयोगात आले?
स्पर्धा परिक्षेच्या संघर्षात आत्मविश्वास, मेहनतीची तयारी, धरसोड वृत्ती टाळून ठेवलेली चिकाटी आणि जिद्द, या प्रवासात मला महत्त्वपूर्ण टप्प्यांवर मार्गदर्शक होत गेले. गुरुजन, आईवडील यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद महत्त्वाचे ठरले.
Edited By - Prashant Patil