आळंदी येथे बाल विवाह रोखण्यात प्रशासनाला यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Child marriage

आळंदी येथे बाल विवाह रोखण्यात प्रशासनाला यश

जुन्नर -शिरोली बुद्रुक, ता. जुन्नर येथील वधू-वराचा बाल विवाह रोखण्यास प्रशासनाला यश आले आहे. हा विवाह आळंदी, ता. खेड येथील अलंकार मंगल कार्यालयात रविवार ता. १९ रोजी दुपारी होणार होता. शिरोली बुद्रुक येथील मुलगा व मुलीचा बालविवाह होत असल्याबाबत एका निनावी व्यक्तीकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर पुणे येथील जिल्हा महिला बाल विकास अधिकारी अश्विनी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर तालुका स्तरीय संरक्षण अधिकारी ए. के. साळुंखे यांनी जुन्नर पोलीसांच्या मदतीने आळंदी पोलीसांशी संपर्क साधून हा बाल विवाह थांबवण्यास सांगितले.

आळंदी पोलीसांनी तात्काळ विवाहस्थळी जाऊन बालविवाह थांबवला. मुलीच्या आधारकार्डवर असलेल्या जन्मतारखेनुसार मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाले होते परंतु माहिती देणाऱ्या व्यक्तीने आधारकार्डवरील नोंदीमध्ये फेरफार केले असल्याचे सांगितले होते. त्यामुळे मुलीच्या शाळेतील जन्मनोंदणीचा दाखला मागवुन घेण्यात आला. त्यानुसार मुलीचे वय १६ वर्ष ९ महिने असल्याचे आढळून आले. मूळ व मुलीचे नातेवाईकांना जुन्नर पोलीस ठाण्यात बोलावून घेतले असता मुलीच्या वडिलांनी नवीन अपडेट केलेले आधार कार्ड दिले. त्यानुसार मुलीचे वय १६ वर्ष ९ महिने इतके होते.यासमुळे मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्याखेरीज चा विवाह करणार नाही, असा जबाब लिहून घेण्यात आला. पोलिसांकडून योग्य ती समज देण्यात आली.

हा बालविवाह रोखण्यासाठी जुन्नरचे पोलीस निरीक्षक विकास जाधव, आळंदीचे पोलीस उपनिरीक्षक गायकवाड व कर्मचारी, तालुका स्तरीय संरक्षण अधिकारी ए. के. साळुंखे, शिरोली बुद्रुकचे बाल विवाह प्रतिबंध अधिकारी व पोलीस पाटील अमोल थोरवे यांचे सहकार्य लाभले. बालविवाह करणे व संबधित विवाहात सहभागी होणे बालविवाह प्रतिबंधक अधिनियमा नुसार गुन्हा आहे.

विवाह मंगल कार्यालय मालकांनी विवाह सोहळा करताना आधारकार्डच्या जन्म तारखेचा आधार घेऊ नये तर जन्मतारखेचा दाखला, शाळा सोडलेला दाखला, शाळेतील जन्माची नोंद या कागदपत्रांचा आधार घेऊन वयाची खात्री करावी, ही कागदपत्रे उपलब्ध नसतील तर वयाच्या वैद्यकीय प्रमाणपत्राचा आधार घेण्यात यावा.

समाजात बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाल्यास त्वरित चाईल्ड लाईन नंबर 1098, पोलीस हेल्पलाईन नंबर 100 किंवा संबधित पोलीस स्टेशन किंवा महिला बाल विकास विभागास माहिती देऊन प्रशासनास सहकार्य करावे. याबाबतची माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय पुणे याच्या वतीने ए. के. साळुंखे, तालुका स्तरीय संरक्षण अधिकारी जुन्नर यांनी केले आहे.

Web Title: Success Of Administration In Preventing Child Marriage In Alandi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top