
Sassoon Hospital : कात्री घुसलेला डोळा वाचविण्यात यश
पुणे : जेमतेम सात वर्षांचा मुलगा हातात कात्री घेऊन घरात पळत होता. पळता-पळता पायात पाय अडकून पडला. त्या क्षणी हातातील कात्री थेट डोळ्यात आरपार घुसली. खालच्या पापणीतून आतमध्ये शिरलेली कात्री डोळ्याच्या वरच्या खोबणीतून बाहेर पडली. या मुलाला तातडीने कोल्हापूरवरून उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले.
त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याची दृष्टी वाचविण्यात रुग्णालयातील नेत्रतज्ज्ञांना यश आले. ससून रुग्णालयाच्या नेत्ररोग विभागातील सहायक प्रा. डॉ. सतीश शितोळे म्हणाले, ‘‘रुग्णालयात दाखल केल्यानंतर सुरवातीलाच मुलाच्या डोळ्याचा सिटी स्कॅन करण्यात आला. कात्रीचा तुकडा डोळ्यात अडकला नसल्याची खात्री या सिटी कॅनमधून केली.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रुग्णाला पूर्ण भूल देऊन डोळ्याची शस्त्रक्रिया केली. सध्या यातून डोळ्याची ३० टक्के दृष्टी वाचविण्यात यश आले आहे.’’ डोळ्याअंतर्गत झालेल्या दुखापतीवर उपचार करून कात्रीमुळे कापली गेलेली खालची आणि वरची पापणी टाके घालून शिवली. शस्त्रक्रियेनंतर सहा दिवस रुग्णाची बारकाईने तपासणी करून, डोळ्यात होणारी सुधारणा प्रत्येक वेळी नोंदण्यात आली, असे डॉ. शितोळे यांनी सांगितले.