राज्यात ३० साखर कारखाने सुरू

राज्यात ३० साखर कारखाने सुरू
Published on: 

राज्यात ३० साखर कारखाने सुरू

गाळप परवाने मिळालेल्या कारखान्यांची संख्या; २१३ कारखान्यांचे अर्ज, छाननी सुरू

अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे : राज्यात यंदाच्या ऊस गाळप हंगामाला गुरुवारपासून (ता. १५) सुरुवात झाली असली, तरी आतापर्यंत केवळ ३० साखर कारखान्यांना गाळप परवाने मिळाले आहेत. राज्यातील सहकारी आणि खासगी अशा २१३ साखर कारखान्यांनी परवान्यासाठी अर्ज केले आहेत. या अर्जांसोबत सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी सुरू असल्याची माहिती साखर आयुक्तालयाच्या आकडेवारीतून समोर आली आहे. परवान्याशिवाय गाळप सुरू करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याचा इशारा साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी दिला आहे.
राज्यातील साखर कारखान्यांना गाळप परवाने देण्यासाठी सप्टेंबरमध्ये ऑनलाइन अर्ज प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानुसार १०६ सहकारी आणि १०७ खासगी कारखान्यांनी अर्ज केले आहेत. यापैकी ४० सहकारी आणि ४५ खासगी कारखान्यांच्या अर्जांवर प्रादेशिक स्तरावर छाननी सुरू आहे. काही अर्जांमध्ये आवश्यक कागदपत्रे आणि अटींच्या पूर्ततेबाबत तपासणी केली जात आहे. आयुक्तालयाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, २३ सहकारी आणि १९ खासगी कारखान्यांच्या अर्जांबाबत स्थगिती अथवा रद्द करण्याच्या नोंदी आहेत. परवाना वितरणाची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे.
साखरेचे दर नियंत्रणात राहावेत आणि नवीन साखर बाजारात लवकर उपलब्ध व्हावी, या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू करण्यास मान्यता दिली आहे. मात्र, गाळप परवाने मिळण्यास विलंब होत असल्याने कारखान्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत.
दरम्यान, गाळप परवान्यांच्या प्रश्नावर काही कारखान्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयीन हस्तक्षेपानंतर १४ कारखान्यांना १४ ऑक्टोबर २०२६ पर्यंत तात्पुरता दिलासा मिळाल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती. त्यानंतर परवाना प्रक्रियेत पुढील हालचाली झाल्या आहेत. मात्र, न्यायालयीन दिलासा मिळालेल्या कारखान्यांची आणि आयुक्तालयाकडून परवाने मिळालेल्या कारखान्यांची संख्या एकच असल्याचे गृहीत धरता येत नाही.
यंदा पावसातील खंडामुळे अनेक भागांत उसाची वाढ अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. त्यामुळे हंगाम लवकर सुरू केल्यास उसाच्या उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत गाळपाचे नियोजन, परवाना प्रक्रिया आणि उसाची उपलब्धता यांचा समतोल साधण्याचे आव्हान साखर उद्योगासमोर आहे. हंगाम लवकर सुरू करण्याच्या निर्णयाबाबत शेतकरी संघटनांनीही विरोधाची भूमिका घेतली आहे.
---------------
कोट
आतापर्यंत ३० साखर कारखान्यांना गाळप हंगाम सुरू करण्यासाठी परवाने दिले आहेत. परवान्याशिवाय कोणत्या कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे का, याची तपासणी सुरू आहे. असे आढळल्यास संबंधित कारखान्यांवर कारवाई केली जाईल.
- डॉ. संजय कोलते, साखर आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Raju Shetti warning to sugar factories
Sugar Factory
Sugar Mill Opening
Maharashtra sugar season
Marathi News Esakal
www.esakal.com