

सहा कारखान्यांवरील कारवाईची सुनावणी पूर्ण
एफआरपी थकबाकीदार; जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे थकले ५१३ कोटी रुपये
सकाळ वृत्तसेवा
उ. सोलापूर, ता. १३ : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उसाची रक्कम न देणाऱ्या साखर कारखान्यांपैकी सहा कारखान्यांवरील कारवाईसंदर्भातील सुनावणी पूर्ण झाली आहे. गुरुवारी पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयात ही सुनावणी घेण्यात आली. या कारखान्यांनी शेतकऱ्यांची साठ टक्क्यांहून अधिक रक्कम थकवली आहे. प्रादेशिक साखर संचालक कार्यालयाने यावर एफआरपीची कारवाई प्रस्तावित केली आहे.
जिल्ह्यातील ऊस गळीत हंगाम संपला आहे. नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांना आपल्या उसाच्या रकमेसाठी कारखानदारांच्या कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागत आहेत. विविध शेतकरी संघटनांच्या आंदोलनानंतर प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. शेतकऱ्यांच्या उसाची रक्कम थकवणाऱ्या २७ साखर कारखान्यांपैकी ६० टक्क्यांहून अधिक रक्कम थकवणाऱ्या सहा कारखान्यांबाबत एफआरपी कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. याबाबत गुरुवारी पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी कारखानदारांनी आपली बाजू मांडली. यानंतर या कारखान्यांवर पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. ज्या कारखान्यांवर प्रशासनाने एफआरपी कारवाई प्रस्तावित केली आहे, अशा कारखान्यांवर महसूल प्रशासनाकडून वसुलीसाठी जप्तीची कारवाई सुरू होणार आहे.
चौकट
थकबाकीप्रकरणी सुनावणी झालेले कारखाने
सिद्धेश्वर सहकारी कारखाना, जकराया शुगर, लोकमंगल शुगर (बीबी दारफळ), वृंदावन शुगर (इंद्रेश्वर), भैरवनाथ शुगर (लवंगी), भीमा सहकारी
२७ कारखान्यांकडे थकली रक्कम
जिल्ह्यातील गाळप केलेल्या ३४ पैकी ३३ कारखान्यांनी प्रशासनाला माहिती दिली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकूळ शुगर वगळता इतर कारखान्यांच्या एफआरपीची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध आहे. ३३ पैकी २७ कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांचे पूर्ण पैसे दिले नाहीत. ही रक्कम ५१३ कोटी १७ लाख रुपये इतकी आहे.
सहा कारखान्यांनी दिली एफआरपीपेक्षा जास्त रक्कम
जिल्ह्यातील पांडुरंग सहकारी (श्रीपूर), सहकार महर्षी (अकलूज), विठ्ठलराव शिंदे (पिंपळनेर), ओंकार शुगर (चांदापुरी), विठ्ठलराव शिंदे (करकंब), येडेश्वरी शुगर (खामगाव) या कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाची पूर्ण रक्कम अदा केली आहे. यातील काही कारखान्यांनी एफआरपीपेक्षा जास्त दर दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.