

पालकमंत्री म्हणतात, गुरुवारी कारखानदारांची बैठक;
शेट्टी म्हणाले, तोपर्यंत कारखाने बंद ठेवा; मग ठरवू!
ऊसदराच्या प्रश्नावर ठिय्या आंदोलन सुरूच; कारखानदारांकडून ३,००० ते ३,१५० रुपयांची तयारी
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १६ ः ऊसदराच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू असतानाच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गुरुवारी (ता. १९) कारखानदारांच्या बैठकीत दराच्या प्रश्नावर चर्चा करण्याचे आश्वासन दिले. मात्र, तोपर्यंत कारखाने बंद ठेवावेत, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी घेतली आहे. पालकमंत्र्यांनी चार दिवसांनी बैठक होणार असल्याचे सांगितले असेल, तर तोपर्यंत गाळप सुरू ठेवण्याचे कारण काय, असा सवाल करीत शेट्टी यांनी कारखाने बंद ठेवण्याची मागणी केली. या बैठकीनंतर पुढील निर्णय घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ऊस उत्पादकांच्या आंदोलनाबाबत बोलताना गोरे म्हणाले, जिल्हाधिकारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा करीत असून, कारखानदारांशीही संवाद सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा साखर उतारा अधिक असल्याने त्या प्रमाणात सोलापूरमधील कारखानदारांनी दर दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या प्रश्नावर गुरुवारी कारखानदारांची बैठक असून, त्यात यासंदर्भात चर्चा केली जाईल. राजू शेट्टी हे जाणकार नेते आहेत. त्यांना ऊस उत्पादक आणि कारखानदार या दोघांच्याही अडचणींची जाणीव आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या समन्वयातून मार्ग काढला जाईल, असे गोरे यांनी सांगितले.
दुसरीकडे, कारखानदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना ३,००० ते ३,१५० रुपये प्रतिटन दर देण्याचे कळवले आहे. मात्र, हा दर कोणत्या आधारावर निश्चित केला, असा प्रश्न शेट्टी यांनी उपस्थित केला. कोल्हापूर आणि कर्नाटकचा दर ठरविण्याचा फॉर्म्युला एकच असून, दोन्ही राज्यांतील मंत्र्यांशी चर्चेनंतर तो सर्वमान्य झाला आहे. सोलापूरमध्ये ३,९०० रुपये नव्हे, तर ३,५०० रुपये प्रतिटन दराची मागणी आहे. भीमेपलीकडील कर्नाटकातील कारखाना ३,७०० रुपये दर देत असताना दक्षिण सोलापुरातील कारखान्यांकडून त्यापेक्षा कमी दर का दिला जात आहे, असा सवाल त्यांनी केला.
पालकमंत्री गुरुवारी बैठक घेऊन निर्णय घेणार असतील, तर तोपर्यंत कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारात घ्यावा. दराचा निर्णय होईपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहील. बैठकीनंतर पुढील भूमिका ठरवू, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.
निवडणुकीत यश येणार नाही, हे लक्षात आल्याने माघार
धैर्यशील मोहिते-पाटील यांनी डीसीसी बँकेच्या निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेतल्याबाबत बोलताना, निवडणुकीत यश मिळणार नाही, हे लक्षात आल्यानेच त्यांनी माघार घेतल्याची टीका गोरे यांनी केली. तसेच एआय सेंटरप्रश्नी त्यांना उमाळा आला होता, आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनप्रश्नी ते का बोलत नाहीत? सोयीस्कर भूमिका घेता, शेतकऱ्यांचा उमाळा का आला नाही, असा सवालही त्यांनी केला.
चौकट
डीसीसीच्या निवडणुकीत फारशी भूमिका नाही
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आपली भूमिका फारशी नाही. स्थानिक नेते याबाबत चर्चा करीत आहेत. सोमवारी उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असून, त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. त्याच दिवशी आमचे पॅनेल जाहीर करू, असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.