साखर उद्योगाच्या बळकटीसाठी समन्वयाची गरज : विखे-पाटील
न्हावरे, ता. २६ : साखर उद्योग हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. उद्योग आणि शेतकरी यांच्यात समन्वय साधून शाश्वत विकास साधणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन माजी खासदार सुजय विखे-पाटील यांनी केले.
पुणे येथील ओंकार शुगर ग्रुपच्या मुख्य कार्यालयाला सुजय विखे-पाटील यांनी नुकतीच भेट देत साखर उद्योगाच्या सद्यःस्थितीचा आढावा घेतला. यावेळी समूहाचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे पाटील व ओमराजे बोत्रे पाटील यांनी त्यांचे स्वागत करत समुहाच्या विविध प्रकल्प व भविष्यातील नियोजनाची माहिती दिली, त्यावेळी विखे बोलत होते. बैठकीत साखर व्यवसायातील उत्पादन क्षमता, ऊस उपलब्धता, बाजारातील चढउतार तसेच निर्यात संधी यांवर सखोल चर्चा झाली. राज्यातील साखर उद्योगांसमोरील आव्हाने आणि त्यावरील संभाव्य उपाय योजनांबाबत दोन्ही बाजूंनी सकारात्मक विचारमंथन करण्यात आले. बदलत्या बाजारपेठेच्या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, उत्पादन खर्चावर नियंत्रण आणि शेतकऱ्यांना योग्य दर देण्यासाठी कोणती पावले उचलता येतील यावर चर्चा झाली. बाबूराव बोत्रे पाटील यांनी साखर क्षेत्रात नव्या संधी निर्माण करण्यासाठी समूह कटिबद्ध असल्याचे सांगितले. स्पर्धात्मक बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

