जिल्ह्यात थकीत एफआरपी @ ४९६ कोटी
जिल्ह्यात थकीत एफआरपी @ ४९६ कोटी
३४ पैकी केवळ १२ साखर कारखान्यांनी बेसिक रिकव्हरीप्रमाणे दिली एफआरपी
सकाळ वृत्तसेवा
माळीनगर, ता. २१ : सोलापूर जिल्ह्यातील २२ साखर कारखान्यांकडे यंदाच्या गाळप हंगामातील बेसिक रिकव्हरीनुसार १५ फेब्रुवारीपर्यंत देय असलेली सुमारे ४९६ कोटी रुपयांची एफआरपी थकली आहे. तथापि, कारखान्यांनी जाहीर केलेल्या पहिल्या हप्त्यानुसारची या कालावधीतील थकीत उसबिलाची रक्कम ९५० कोटी रुपये आहे. जिल्ह्यातील हंगाम बऱ्यापैकी आटोपला असला तरीही उसबिले मिळत नसल्याने शेतकरी वैतागले आहेत. सातारा जिल्ह्यात सर्वाधिक एफआरपी थकली आहे.
यंदाचा गाळप हंगाम घेतलेल्या जिल्ह्यातील ३४ पैकी १२ साखर कारखान्यांनीच बेसिक रिकव्हरीप्रमाणे शेतकऱ्यांना एफआरपी दिली आहे. पांडुरंग, विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर व करकंब, ओंकार शुगर(म्हैसगाव) या चार कारखान्यांनीच शेतकरी संघटनांच्या आंदोलनानंतर जाहीर केलेल्या पहिल्या हप्त्यानुसार उसबिले ऊसबिले दिल्याचे आकडेवारीवरून दिसते. बाकीचे ३० कारखाने पहिल्या हप्त्यानुसार ऊसबिले देण्यात अपयशी ठरल्याचे दिसून येते.
गाळप झालेल्या उसाचे पेमेंट १४ दिवसांत शेतकऱ्यांना अदा करणे साखर कारखान्यांसाठी कायद्याने बंधनकारक आहे. जानेवारी अखेरपर्यंत जिल्ह्यात एक कोटी ४० लाख ८६ हजार ७०७ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले होते. त्यापोटी साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादकांना तीन हजार १८६ कोटी रुपयांची ऊसबिले देण्यात आली आहेत.
शेतकरी संघटना चिडीचूप
जिल्ह्यातील काही कारखान्यांची ऊसबिले चौथ्या पंधरवड्यापासूनच थकली आहेत. यंदाचा हंगाम सुरू झाल्यावर शेतकरी संघटनांनी महिनाभरानंतर अधिकचा ऊसदर मिळण्यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसून आक्रमक पवित्रा घेतला होता. संघटनांच्या तीव्र आंदोलनामुळे कारखानदारांना वाढीव दर देण्यास भाग पाडले. जादा ऊसदर मिळविण्यात संघटना यशस्वी झाल्या होत्या. परंतु, आता हंगाम संपण्याच्या मार्गावर आहे. अशात अनेक कारखान्यांकडे ऊसबिले थकली आहेत. बिलासाठी कारखान्यांवर खेटे मारून शेतकरी जाम झाले आहेत. तरीही शेतकरी संघटना थंड असल्याचे दिसते.
एफआरपीप्रकरणी प्रशासन सुस्त
जिल्ह्यातील २२ कारखान्यांकडे एफआरपी थकली आहे. प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. मागील तीन-चार दिवसांत थकीत एफआरपीप्रकरणी जिल्ह्यातील ११ साखर कारखान्यांच्या साखर आयुक्तालयात सुनावण्या झाल्या आहेत. तथापि, एफआरपी थकूनही यंदाच्या हंगामात एकाही कारखान्यावर आरआरसी कारवाई अद्याप झालेली नाही. आरआरसी कारवाई झाली तरीही त्याच्या अंमलबजावणीतील दिरंगाईमुळे कारखानदारांवर प्रशासनाचा धाक उरला नाही.
कारखानानिहाय १५ फेब्रुवारीअखेर थकीत ऊसबिले (कोटीत)
कारखाना थकीत
सिद्धेश्वर ४९.३५
संत दामाजी १७.०९
संत कुर्मदास २३.८१
लोकनेते ४६.६६
सासवड माळी १६.०६
लोकमंगल, बीबीदारफळ १२.३९
लोकमंगल, भंडारकवठे १०.०६
सिद्धनाथ ३६.२९
जकराया ४१.५८
वृंदावन (इंद्रेश्वर) ३०.५४
भैरवनाथ, लवंगी २४.११
युटोपियन २०.२०
राजवी ॲग्रो ७.९९
जयहिंद ५.१६
भीमा ३०.२६
सीताराम महाराज ०.९५
धाराशिव, सांगोला ५.६०
श्री शंकर ०.९३
आवताडे शुगर्स २०.१९
विठ्ठल, वेणूनगर ५०.४६
कमलाभवानी ३१.४८
शिवगिरी ॲग्रो, विहाळ २४.३४
जिल्हानिहाय थकीत एफआरपी (कोटीत)
जिल्हा कारखाने थकीत
सातारा १४ ५९७
पुणे ९ ५८४
अहिल्यानगर १५ ५६३
सोलापूर २२ ४९६
कोल्हापूर १३ ४५१
सांगली ६ २६९
धाराशिव १३ २६९
बीड ८ २६५
छ.संभाजीनगर ८ १९५
परभणी ७ १९२
लातूर ११ १८३
जालना ४ १३९
नांदेड ४ ६४
हिंगोली ४ ५८
यवतमाळ ३ ४१
नंदुरबार १ १८
नाशिक ३ १४
जळगाव १ १.५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

