

साखर साठवणुकीबाबत
व्यापाऱ्यांवर निर्बंध कडक
पंधरा सप्टेंबरपासून दोन हजार क्विंटल साठवणुकीची मर्यादा
राजकुमार चौगुले ः ॲग्रोवन वृत्तसेवा
कोल्हापूर ः साखरेचा साठा करून कृत्रिम टंचाई निर्माण करायची, बाजारातील दरवाढीला खतपाणी घालायचे आणि सट्टेबाजीच्या माध्यमातून बाजाराला आपल्या मर्जीप्रमाणे हलवायचे, अशा प्रवृत्तींना लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने साखर व्यापाऱ्यांवर आणखी कडक निर्बंध लादले आहेत. १५ सप्टेंबरपासून देशभरातील साखर व्यापाऱ्यांना एका ठिकाणी किंवा कोणत्याही वेळी जास्तीत जास्त २ हजार क्विंटलच साखर साठवता येणार आहे.
विशेष म्हणजे, ऑगस्टपासून लागू असलेली ४ हजार क्विंटलची मर्यादा अवघ्या काही आठवड्यांत निम्म्यावर आणण्यात आली आहे. ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने मंगळवारी (ता. १) या बाबत आदेश जारी केला. नव्या निर्णयामुळे व्यापाऱ्यांच्या साठ्यावर थेट नियंत्रण आले असून एका ठिकाणी किंवा कोणत्याही वेळी २ हजार क्विंटलपेक्षा अधिक साखर ठेवता येणार नाही. एवढेच नव्हे, तर साखर प्राप्त झाल्यानंतर ती ३० दिवसांपेक्षा अधिक काळ साठवून ठेवण्यासही मनाई करण्यात आली आहे. साखर दर कमी करण्यासाठी बाजारातील अनावश्यक साठेबाजीला आळा घालण्यासाठी केंद्राने साठा मर्यादा आणखी घटवली आहे. देशभरासाठी २ हजार क्विंटलची मर्यादा निश्चित करण्यात आली असली तरी कोलकाता आणि विस्तारित महानगर क्षेत्राला ४ हजार क्विंटलची मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातून कोलकात्याला मोठ्या प्रमाणात साखर येते. पूर्व आणि ईशान्य भारतातील राज्यांना पुढे पुरवठा होत असल्याने ही सवलत देण्यात आली आहे. हे नियम केवळ कागदावर राहू नयेत, यासाठी सरकारने साखरेच्या साठ्याची प्रत्यक्ष पडताळणी आणि कडक देखरेख करण्याचे निर्देश दिले आहेत. व्यापारी, वितरक आणि संबंधित घटकांकडील साठा तपासला जाणार आहे.
गेल्या काही दिवसांत उच्चांकी पातळीवरून तब्बल ३० टक्क्यांपर्यंत घसरलेल्या देशांतर्गत साखरेच्या दरांना पुन्हा उभारी मिळू लागली आहे. उत्तर प्रदेशातील बाजारपेठेत दरात सुधारणा झाली असून महाराष्ट्रातही बाजाराचा कल स्थिर ते मजबूत राहिला आहे. मात्र, केंद्र सरकारचा बाजारातील वाढता हस्तक्षेप आणि सप्टेंबरपासून सुरू होणारी पंधरवड्याच्या साखर कोटा वितरणाची नवी पद्धत यामुळे साखरेच्या दरात पूर्वीसारखी झपाट्याने तेजी येण्याची शक्यता कमी असल्याचे बाजारातील संकेत आहेत. कोटा वारंवार जाहीर होणे, साखर साठ्यावर वाढलेली देखरेख आणि सरकारकडून होणारे बारकाईने निरीक्षण यामुळे साठेबाजी व सट्टेबाज खरेदीला मर्यादा येण्याची शक्यता आहे. परिणामी बाजारात दर सुधारले तरी मोठी तेजी रोखली जाण्याची शक्यता आहे.
चौकट ----
साखर दरात १०० ते २०० रुपयांची वाढ
दरम्यान, कोल्हापूर बाजारात एस-ग्रेड साखरेचा दर सध्या ४६५० ते ४७०० रुपये प्रति क्विंटल आहे. तर उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर बाजारात एम-ग्रेड साखरेचा दर ५१५० ते ५४५० रुपये प्रति क्विंटल असून, दरात सुमारे १०० ते २०० रुपयांची वाढ नोंदविली गेली आहे. साठा मर्यादेचा नेमका काय परिणाम होईल हे सध्या तरी सांगता येत नसल्याचे साखर उद्योगातील तज्ज्ञांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.