
दौंड : राज्याचे उपमुख्यमंत्री मंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड या खासगी साखर कारखान्याच्या गळित हंगाम शुभारंभ आणि वाढीव गाळप क्षमता प्रकल्पांच्या उद्घाटन समारंभास विरोध करण्यात आला आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने हा विरोध करण्यात आला असला तरी नियोजित वेळेवर कार्यक्रम होणार असल्याची माहिती कारखान्याचे संचालक यांनी दिली आहे.
दौंड शहर व तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने दौंड येथे निवासी नायब तहसीलदार ममता भंडारे यांना एका निवेदन देण्यात आले असून त्यामध्ये हा विरोध नमूद करण्यात आला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करीत असताना आणि आरक्षण आंदोलनाचा एक भाग म्हणून पुढार्यांना गावबंदी असल्याने हा विरोध करण्यात आला आहे.
दौंड शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या आलेगाव येथील या कारखान्याचा गळित हंगामाचा शुभारंभ २ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते उसाची मोळी टाकून दुपारी ४ वाजता होणार आहे.
अजित पवार यांच्या हस्ते गळित हंगामाचा शुभारंभ झाल्यास त्याला विरोध होण्यासह मराठा समाजाच्या वतीने अजित पवार यांचा निषेध होण्याची शक्यता निवेदनात नमूद करण्यात आली आहे. सदर कार्यक्रम अजित पवार यांच्या हस्ते न करण्याची मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हा सरचिटणीस विक्रम पवार यांनी दिली.
दौंड शुगर या कारखान्याची ऊस गाळप क्षमता टप्प्याटप्याने प्रतिदिन ६००० मेट्रीक टनावरून १७५०० मेट्रीक टन इतकी करण्यात आली आहे. तर सहवीजनिर्मिती प्रकल्पाची क्षमता १८ मेगावॅट वरून ८२ मेगावॅट करण्यात आली असून वाढीव गाळप क्षमता व सहवीजनिर्मिती प्रकल्पांचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते २ नोव्हेंबर रोजी नियोजित आहे.
दरम्यान २९ ऑक्टोबर रोजी अजित पवार यांना डेंगीची लागण झाल्याने ते दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेडच्या कार्यक्रमास उपस्थित राहणार का नाही ?, याविषयी अनिश्चितता असताना आता मराठा समाजाने विरोध केला आहे.
दरम्यान कारखान्याचे संचालक वीरधवल जगदाळे यांना या बाबत विचारले असता त्यांनी कारखान्याचा कार्यक्रम वेळेवर होणार आहे. आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आमंत्रित केले आहे. कार्यक्रमाच्या पत्रिका वितरित झाल्या आहेत व नियोजित वेळेप्रमाणे आणि ठरल्याप्रमाणे कार्यक्रम होईल, असे स्पष्ट केले.
अजित पवारांचे मामेभाऊ चेअरमन...
दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड हा साखर कारखाना २००९ मध्ये आलेगाव येथे सुरू करण्यात आला असून उपमुख्यमंत्री अजित पवार हे कारखान्याचे संस्थापक मार्गदर्शक आहेत. अजित पवार यांचे मामेभाऊ तथा पाच दिवसात लोणी ते मूर्तिजापूर या ७५ किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती करून विश्वविक्रम केल्याप्रकरणी गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॅार्ड मध्ये नोंद झालेले उद्योजक जगदीश कदम
(रा. देवळाली प्रवरा, जि. नगर) हे कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आहेत. तर दौंडचे दिवंगत माजी आमदार कृष्णराव जगदाळे आणि माजी आमदार श्रीमती उषादेवी कृष्णराव जगदाळे - पाटील यांचे ज्येष्ठ पूत्र तथा लिंगाळी (ता. दौंड) येथील पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वीरधवल जगदाळे हे या कारखान्याचे संचालक आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.