

पान १२ - २१ साठी
००००००००००००००००००००००००
पूर्वहंगामी उसामध्ये ठिबकद्वारे खत व्यवस्थापन
---------------------------------
शेतामध्ये ठिबक सिंचन व्यवस्था उपलब्ध असल्यास सर्व विद्राव्य खते ठिबक सिंचनाद्वारेच द्यावीत. अशा परिस्थितीत नत्र, स्फुरद व पालाश ही खते पारंपरिक पद्धतीने देण्याची आवश्यकता नाही. ठिबक सिंचनाद्वारे खते थेट सक्रिय मुळांच्या सान्निध्यात उपलब्ध होत असल्याने खत वापर कार्यक्षमता वाढते, अन्नद्रव्यांचे नुकसान कमी होते तसेच मजुरी व उत्पादन खर्चात बचत होते.
---------------------------------------
डॉ. प्रीती देशमुख, डॉ. ए. डी. कडलग
--------------------------------------
पूर्वहंगामी ऊस पिकाची लागवड हंगामातील अत्युच्च साखर उतारा हंगामात गाळपात येत असल्यामुळे या हंगामातील लागवडीस विशेष महत्त्व आहे. पूर्वहंगामातील ऊस १३ ते १४ महिन्यांत म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या थंडीच्या महिन्यांत गाळपात येतो. त्यामुळे या पिकाचा साखर उतारा जास्त मिळतो. पूर्वहंगामी ऊस वेळेत तुटल्यामुळे खोडवा पीक चांगले येते. तसेच या हंगामातील पिकावर सुरुवातीच्या काळात येणाऱ्या खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी होतो. पूर्वहंगामी ऊस पिकाची लागवड १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत करावी. नोव्हेंबरनंतर लागण झाल्यास थंडीमुळे उसाच्या उगवणीवर विपरीत परिणाम दिसून येतो. फुटव्यांची संख्या अपेक्षित येत नाही.
सेंद्रिय खत व्यवस्थापन ः
शाश्वत उत्पादनासाठी सेंद्रिय खत व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. सेंद्रिय खतांच्या वापरामुळे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढून जमिनीची पाणी धारण क्षमता वाढते, निचरा सुधारतो, उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या वाढते आणि रासायनिक खतांची कार्यक्षमता लक्षणीयरीत्या सुधारणा होऊन रासायनिक खतांची मात्रा कमी होते. शेणखत, कंपोस्ट, प्रेसमड, कोंबडी खत व बायोकंपोस्ट यांसारख्या सेंद्रिय खतांचा संतुलित वापर केल्यास जमिनीचा पोत टिकून राहून ऊस उत्पादन अधिक शाश्वत होते.
महाराष्ट्रातील बहुतांश साखर कारखान्यांमध्ये साखर उद्योगातून निर्माण होणाऱ्या प्रेसमडचे योग्य पद्धतीने कंपोस्टिंग करून उच्च दर्जाच्या बायोकंपोस्टची निर्मिती केली जाते. बायोकंपोस्टमुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यास जमिनीची भौतिक व रासायनिक गुणवत्ता सुधारण्यास तसेच पिकांना आवश्यक अन्नद्रव्यांचा कार्यक्षम पुरवठा होण्यास मदत होते.
उसामध्ये मुळांची जोमदार वाढ, अन्नद्रव्यांचे शोषण आणि जमिनीची सुपीकता सुधारण्यासाठी ह्युमिक ॲसिड अत्यंत उपयुक्त ठरते. ह्युमिक ॲसिडमुळे पांढऱ्या मुळांची वाढ व शाखायुक्त मुळांची निर्मिती वाढते, जमिनीची पाणी धारण क्षमता सुधारते, तसेच नत्र, स्फुरद, पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढून खतांच्या कार्यक्षमता सुधारणा होते. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ने ह्युमिक ॲसिड हे द्रवरूप उत्पादन विकसित केले आहे. याचा वापर लागवडीच्या वेळी व लागवडीनंतर १२० दिवसांनी प्रति एकरी १ लिटर ह्युमिक ॲसिड, २०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक सिंचन किंवा आळवणीद्वारे वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे.
हिरवळीच्या खताचा वापर ः
जमिनीची सुपीकता व सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी हिरवळीचे खत हा अत्यंत प्रभावी पर्याय आहे. ऊस लागवडीनंतर ताग किंवा धैंचा यांचे आंतरपीक घेऊन पहिल्या पाण्यानंतर जमिनीत वापसा आल्यावर सरीच्या मध्यभागी पेरणी करावी. बाळबांधणीच्या वेळी हे हिरवळीचे पीक जमिनीत गाडल्यास मोठ्या प्रमाणात सेंद्रिय पदार्थांची भर पडते. सेंद्रिय व हिरवळीच्या खतांचा नियमित वापर केल्यास जमिनीचा पोत सुधारतो, सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता वाढते आणि दीर्घकाळ उत्पादकता टिकून राहते.
ठिबकद्वारे खतांच्या वापर कार्यक्षमतेत वाढ ः
१) युरिया पारंपरिक पद्धतीने चार हप्त्यांमध्ये दिल्यास नत्राचा बराचसा भाग बाष्पीभवन व निचऱ्याद्वारे वाया जातो. त्यामुळे नत्र वापराची कार्यक्षमता केवळ २५ ते ३० टक्के इतकी राहते. ठिबकद्वारे युरिया १९ हप्त्यांमध्ये विभागून दिल्यामुळे नत्र सक्रिय मुळांच्या सानिध्यात उपलब्ध होते, अन्नद्रव्यांचे नुकसान कमी होते आणि नत्र वापराची कार्यक्षमता ८० ते ९० टक्यांपर्यंत वाढते. परिणामी कमी खतामध्ये अधिक परिणामकारक पोषण मिळून उसाची जोमदार वाढ व उत्पादनात लक्षणीय वाढ होते.
२) सिंगल सुपर फॉस्फेट, डाय-अमोनियम फॉस्फेट आणि १०:२६:२६ ही स्फुरदयुक्त खते प्रामुख्याने दिली जातात; परंतु जमिनीत दिलेल्या स्फुरदापैकी केवळ १५ ते २५ टक्के स्फुरद पिकाला उपलब्ध होते, उर्वरित स्फुरद कॅल्शियम, लोह व ॲल्युमिनियमशी संयोग होऊन जमिनीत स्थिरीकरण होते. ठिबकद्वारे फॉस्फोरिक ॲसिड किंवा मोनो अमोनियम फॉस्फेट दिल्यामुळे स्फुरद थेट मुळांच्या कार्यक्षम क्षेत्रात पोहोचतो, स्थिरीकरण कमी होते आणि स्फुरद वापराची कार्यक्षमता २५ ते ४५ टक्क्यांपर्यंत वाढते.
३) म्युरेट ऑफ पोटॅश पारंपरिक पद्धतीने दिल्यास पालाशाचा काही भाग मातीतील चिकण कणांवर स्थिर होतो किंवा सिंचनामुळे मुळांच्या कार्यक्षम क्षेत्राबाहेर जातो, त्यामुळे पालाश खत वापर कार्यक्षमता साधारण ३० ते ५० टक्के इतकी राहते. याउलट, ठिबकद्वारे विद्राव्य पालाश खते दिल्यामुळे पालाश थेट सक्रिय मुळांच्या सान्निध्यात उपलब्ध होतो, अन्नद्रव्यांचे नुकसान कमी होते आणि पालाश वापर कार्यक्षमता ५० ते ७० टक्क्यांपर्यंत वाढते. त्यामुळे कमी खतामध्ये अधिक पालाश उपलब्ध होऊन उसाची वाढ, साखर संचय आणि उत्पादनात लक्षणीय सुधारणा होते.
पूर्वहंगामी ऊस पिकासाठी शिफारशीत नत्र: स्फुरद : पालाश १३६:६८:६८ कि.ग्रॅ./ एकर आहे. ठिबक सिंचनाद्वारे खतांचा कार्यक्षम वापर होत असल्याने शिफारशीत खत मात्रेत २५ टक्के बचत करता येते. त्यानुसार ठिबक सिंचनाद्वारे नत्र १०२ कि.ग्रॅ., स्फुरद ५१ कि.ग्रॅ. आणि पालाश ५१ कि.ग्रॅ./ एकर खत मात्रा गृहीत धरून ठिबक सिंचनाद्वारे खत देण्यासाठी खालीलप्रमाणे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.
चौकट ः पूर्वहंगामी उसासाठी ठिबक सिंचनाद्वारे खतांचा वापर
क्र. खत देण्याची वेळ युरिया (कि.ग्रॅ./एकर) अमोनिअम सल्फेट (कि.ग्रॅ./एकर) फॉस्फोरिक ॲसिड (कि.ग्रॅ./एकर) म्युरेट ऑफ पोटॅश (कि.ग्रॅ./एकर) व्हीएसआय मायक्रोसोल (कि.ग्रॅ./ एकर)
१ लागणीचे वेळी २.२ ०.९ ०.९ —
२ २ आठवड्यांनी ४.४ १.७ १.७ —
३ ४ आठवड्यांनी ४.४ १.७ १.७ २.५०
४ ६ आठवड्यांनी ८.९ ३.४ १.७ —
५ ८ आठवड्यांनी १३.३ ५.१ २.६ २.५०
६ १० आठवड्यांनी १३.३ ५.१ ३.४ —
७ १२ आठवड्यांनी ११.१ १४.६ ६.८ ४.३ —
८ १४ आठवड्यांनी १७.७ ६.८ ५.१ —
९ १६ आठवड्यांनी १३.३ ९.७ ६.८ ६.० २.५०
१० १८ आठवड्यांनी २०.० ७.७ ४.३ —
११ २० आठवड्यांनी १३.३ १४.६ ७.७ ४.३ —
१२ २२ आठवड्यांनी २२.२ ८.५ ६.८ —
१३ २४ आठवड्यांनी १३.३ १४.६ ७.७ ७.७ —
१४ २६ आठवड्यांनी १३.३ ५.१ ६.८ २.५०
१५ २८ आठवड्यांनी ८.९ ३.४ ६.० —
१६ ३० आठवड्यांनी ६.७ २.६ ६.० —
१७ ३२ आठवड्यांनी ४.४ १.७ ६.० —
१८ ३४ आठवड्यांनी ४.४ १.७ ५.१ —
१९ ३६ आठवड्यांनी २.२ ०.९ ५.१ —
एकूण १९७ ५३ ८५ ८५ १०
टीप :
१) ऊस पिकाच्या गरजेनुसार फॉस्फोरिक ॲसिडच्या ऐवजी मोनोअमोनियम फॉस्फेट (१२:६१:०) वापरता येतो. मात्र मोनोअमोनियम फॉस्फेटमधून नत्र व स्फुरद दोन्ही उपलब्ध होत असल्याने, त्यानुसार युरिया व इतर नत्रयुक्त खतांची मात्रा समायोजित करावी.
२) को- ८६०३२ ऊस जातीसाठी वरीलप्रमाणे शिफारशीत खत मात्रेत २५ टक्के वाढ करून खत मात्रा द्यावी.
३) ठिबक सिंचन उपलब्ध असल्यास खते फक्त ठिबकद्वारेच द्यावीत.
४) शेतामध्ये ठिबक सिंचन व्यवस्था उपलब्ध असल्यास सर्व विद्राव्य खते ठिबक सिंचनाद्वारेच द्यावीत. अशा परिस्थितीत नत्र, स्फुरद व पालाश ही खते पारंपरिक पद्धतीने देण्याची आवश्यकता नाही. ठिबक सिंचनाद्वारे खते थेट सक्रिय मुळांच्या सान्निध्यात उपलब्ध होत असल्याने खत वापर कार्यक्षमता वाढते, अन्नद्रव्यांचे नुकसान कमी होते तसेच मजुरी व उत्पादन खर्चात बचत होते.
-------------------------------------------
इन्फो ः
सूक्ष्मअन्नद्रव्यांचा वापर ः
१) उसामध्ये केवळ नत्र, स्फुरद व पालाश पुरेसे नसून लोह, जस्त, मँगेनीज, तांबे, बोरॉन व मॉलिब्डेनम यांसारखी सूक्ष्म अन्नद्रव्ये संतुलित प्रमाणात उपलब्ध होणे अत्यावश्यक आहे. ठिबकद्वारे पाण्यात विद्राव्य सूक्ष्म अन्नद्रव्य खतांचा वापर केल्यास ही अन्नद्रव्ये थेट मुळांच्या कार्यक्षम क्षेत्रात उपलब्ध होतात. त्यामुळे त्यांची कमतरता दूर होते, प्रकाशसंश्लेषण व एन्झाइम क्रिया सुधारते तसेच कांड्यांची वाढ, साखर संचय आणि उत्पादनात लक्षणीय वाढ होते.
२) वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने व्हीएसआय मायक्रोसोल हे पाण्यात विद्राव्य द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्य खत विकसित केले आहे. तसेच फवारणीद्वारे संतुलित पोषणासाठी व्हीएसआय मल्टिमॅक्रोन्यूट्रिएंट आणि व्हीएसआय मल्टिमायक्रोन्यूट्रिएंट ही द्रवरूप अन्नद्रव्य खते विकसित केली आहेत. या खतांचा वापर शिफारस केलेल्या वेळापत्रकानुसार करावा.
च१कट ः ऊस पिकासाठी व्ही.एस.आय. सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत वापराबाबत मार्गदर्शक सूचना
उत्पादनाचे नाव --- फायदे --- वापरावयाची पद्धत
मल्टीमायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड – २
मल्टिमॅक्रोन्यूट्रिएंट(नत्र ८ टक्के, स्फुरद ८ टक्के, पालाश ८ टक्के) ---फवारणीमुळे पानांमध्ये हरितद्रव्याची निर्मिती होऊन पिकांची वाढ चांगली होते. दोन पेरांमधील अंतर, कांड्याची जाडी, लांबी आणि उंची वाढते. ---लागणीनंतर अथवा खोडवा राखल्यानंतर ६० दिवसांनी पहिली फवारणी करावी. यासाठी मल्टिमॅक्रोन्यूट्रिएंट (नत्र: स्फुरद: पालाश - ८:८:८) द्रवरूप खत २ लिटर आणि मल्टीमायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड–२ हे खत २ लिटर २०० लिटर पाण्यात एकत्र मिसळून एक एकर क्षेत्रासाठी फवारणी करावी. दुसरी फवारणी लागणीनंतर ९० दिवसांनी करावी. मल्टिमॅक्रोन्यूट्रिएंट (नत्र: स्फुरद: पालाश - ८:८:८) द्रवरूप खत ३ लिटर आणि मल्टिमायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड–२ हे खत ३ लिटर ३०० लिटर पाण्यात एकत्र मिसळून एक एकर क्षेत्रासाठी फवारणी करावी.
व्ही.एस. आय –मायक्रोसोल ग्रेड -१ ---प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग वाढून हरितद्रव्य निर्मितीत वाढ होते.
प्रथिने व संप्रेरकांची निर्मिती वाढते.पेशींची वाढ व विभाजनास सक्रियता येते. ऊस उत्पादन आणि साखर उताऱ्यात वाढ होते. --- पद्धत १: ठिबक सिंचनाद्वारे प्रति एकर २.५ किलो व्ही.एस.आय.–मायक्रोसोल १०० लिटर पाण्यात विरघळवून लागणीच्या वेळी, लागणीनंतर ६० दिवसांनी, १२० दिवसांनी आणि १८० दिवसांनी अशा एकूण चार वेळा सोडावे. किंवा पद्धत २ : ठिबक सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्यास, शेणखत किंवा कंपोस्ट खतामध्ये मिसळून लागणीच्या वेळी प्रति एकर ५ किलो आणि ऊस बांधणीच्या वेळी प्रति एकर ५ किलो या प्रमाणात द्यावे.
--------------------
संपर्क ः डॉ. प्रीती देशमुख, ९९२१५४६८३१
--------------------------------------
(मृदाशास्त्र विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.