

ऊस उत्पादकांच्या आंदोलनाला यश
‘ओंकार शुगर’ प्रशासनाची नमती भूमिका; २५ मेपर्यंत आंदोलन स्थगित
ॲग्रोवन वृत्तसेवा
परळी, जि. बीड : थकीत ऊसबिलासाठी सुरू असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले असून, ओंकार शुगर कारखाना प्रशासनाने १५ दिवसांत सर्व देयके अदा करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर संघर्ष समितीने आंदोलन तूर्तास २५ मेपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
पांगरी, लिंबुटा, टाकळी आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे हा लढा यशस्वी झाल्याची भावना ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने व्यक्त केली.
थकीत ऊसबिल, तोडणी मजुरी, वाहतूक खर्च आणि कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्याच्या मागणीसाठी ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने ओंकार शुगर्ससमोर सत्याग्रह आंदोलन सुरू केले होते. आंदोलन दुसऱ्या दिवशीही रात्री उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान, शेतकरी आक्रमक होत कारखान्याच्या वाहनांना अडवू लागल्याने प्रशासनावर दबाव वाढला.
आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांच्या खात्यात १८०० रुपये प्रतिटन दराने रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे. तसेच जाहीर केलेल्या २९५० रुपये प्रतिटन दरानुसार उर्वरित ११५० रुपये प्रतिटन रक्कम २५ मेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल, असे लेखी आश्वासन कारखान्याचे जनरल मॅनेजर एस. व्ही. सोळंके यांनी शनिवारी (ता. ९) रात्री आंदोलनकर्त्यांना दिले.
यावेळी संघर्ष समितीचे नेते ॲड. अजय बुरांडे, ॲड. श्रीनिवास मुंडे, श्रीराम बडे, विनायकराव मुंडे, अरुण महाराज शिंदे, देविदास कराड, धोंडीबा दिवटे, अशोक शिंदे, दत्तात्रय तिडके, प्रभाकर मुंडे, मनोहर मुंडे, बिभीषण गित्ते, अविनाश मुंडे, शरद गित्ते, सूर्यकांत तिडके यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान, या आंदोलनाची दखल घेत एनएसएल पवारवाडी आणि ट्वेंटी ट्वेंटी सायखेडा या कारखान्यांनीही जाहीर दरानुसार ऊसबिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केल्याची माहिती संघर्ष समितीला देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या हक्काच्या घामाच्या पैशांसाठी आंदोलन करावे लागत असल्याची खंत व्यक्त करत, पुढील काळातही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकजुटीची वज्रमूठ कायम ठेवण्याचे आवाहन संघर्ष समितीने केले.
--
ठळक बाबी
- ऊसबिलासाठीच्या आंदोलनाला अखेर यश
- १५ दिवसांत सर्व देयके अदा करण्याचे लेखी आश्वासन
- १८०० रुपये प्रतिटन रक्कम जमा करण्यास सुरुवात
- उर्वरित ११५० रुपये प्रतिटन रक्कम २५ मेपर्यंत देणार
- आंदोलनामुळे इतर कारखान्यांकडूनही ऊसबिल अदा सुरू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.