ऊस हुमणी नियंत्रण

ऊस हुमणी नियंत्रण
Published on

पुरवणी लेख - तातडीने
०००००००००००००००००००००००००००००००००
उसातील हुमणीचे एकात्मिक नियंत्रणा
-------------------------------------------
हुमणीच्या प्रादुर्भावामुळे उसाच्या उगवणीत ४० टक्क्यांपर्यंत नुकसान होते तसेच ऊस उत्पादनात हेक्टरी १५ ते २० टनांपर्यंत नुकसान होते, त्यामुळे हुमणीचे योग्य वेळी नियंत्रण महत्त्वाचे आहे. हुमणी नियंत्रणासाठी बीव्हीएम किंवा ईपीएन ही जैविक कीडनियंत्रके वापरणे फायदेशीर ठरते.
-------------------------------------
डॉ. सुनिता साकुरे, डॉ. क्रांती निगडे, सुधा घोडके
--------------------------------
प्रथम अवस्थेतील हुमणीच्या अळ्या अंड्यातून बाहेर निघाल्यावर जमिनीतील कुजलेल्या सेंद्रिय पदार्थावर किंवा जिवंत मुळ्यांवर उपजीविका करतात. त्यांनतर दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेतील अळ्या ऊस व इतर पिकांची मुळे खातात. मुळे खाल्ल्यामुळे पिकाचे अन्न व पाणी शोषणाची प्रक्रिया बंद पडते. प्रादुर्भावग्रस्त ऊस निस्तेज दिसतो व पाने मरगळतात. हळूहळू पाने पिवळी पडण्यास सुरुवात होते व वीस दिवसांमध्ये संपूर्ण ऊस वाळतो. आणि वाळलेल्या काठीसारखा दिसतो. एका उसाच्या बेटाखाली जास्तीत जास्त २० पर्यंत अळ्या आढळतात. उसाचे एक बेट एक अळी तीन महिन्यांत तर दोन किंवा जास्त अळ्या एक महिन्यात मुळ्या कुरतडून कोरडे करतात. जमिनीखालील उसाच्या कांड्यांनाही अळी उपद्रव करते. प्रादुर्भावग्रस्त उसाला हलका झटका दिल्यास सहजपणे उपटून येतो. हुमणीची बारा महिन्यांत एकच पिढी तयार होत असली, तरी अळीचा जास्त दिवसांचा कालावधी आणि पिकाच्या मुळांवर उपजीविका करण्याची क्षमता यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
जीवनक्रम :
१) हुमणी किडीचा जीवनक्रम अंडी, अळी, कोष व भुंगेरे या चार अवस्थांत पूर्ण होतो. मॉन्सूनच्या पहिल्या सरींनंतर हुमणीच्या प्रौढ भुंगेरे संध्याकाळी जमिनीतून बाहेर येतात आणि कडुनिंब, बाभूळ, बोर इ. झाडांची पाने खातात नर- मादींचे मिलन होते. त्यानंतर मादी जमिनीमध्ये अंडी घालते.
२) अळीची पहिली अवस्था २५ ते ३० दिवस, दुसरी ३० ते ४५ दिवस व तिसरी अवस्था १४० ते १४५ दिवस असते.
३) तिसऱ्या अवस्थेतील पूर्ण वाढ झालेली अळी जमिनीत खोल गेल्यानंतर कोषावस्थेमध्ये जाते. अशा पद्धतीने एक पिढी पूर्ण होण्यासाठी एका वर्षाचा कालावधी लागतो.
------------------------------
इन्फो

एकात्मिक कीड नियंत्रण पद्धती :
पारंपरिक पद्धती :
- भुंगेरे जमिनीतून बाहेर पडतात आणि रात्रीच्या वेळी बाभूळ व कडुलिंबाच्या झाडावर मोठ्या प्रमाणावर जमा होतात. संध्याकाळी ७ ते ९ च्या दरम्यान फांद्या हलवून जमिनीवर पडलेले भुंगेरे गोळा करून ईपीएन (५० मिलि/१० लिटर पाणी) हे जैविक कीडनियंत्रक पाण्यात मिसळून त्या द्रावणात भुंगेरे टाकावेत.
- प्रकाश सापळ्यांचा वापर भुंगेरे गोळा करण्यासाठी करावा.

रासायनिक पद्धती :
१) कडुनिंब, बाभळीच्या झाडांवर इमिडाक्लोप्रिड (१७.८ टक्के एस.एल) ०.३ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारल्यास भुंगेऱ्यांचे नियंत्रण होते.
२) शेणखत, कंपोस्ट खतामार्फत हुमणीची अंडी व अळ्या शेतामध्ये जातात. नियंत्रणासाठी एक बैलगाडी शेणखतात १ किलो फिप्रोनील दाणेदार (०.३ जीआर) मिसळून शेतात पसरावे.
३) मोठ्या उसात फिप्रोनील ४० टक्के अधिक इमिडाक्लोप्रिड (४० टक्के डब्ल्यूजी) (संयुक्त कीटकनाशक)
५०० ग्रॅम प्रति हेक्टरी १००० लिटर पाण्यात मिसळून जमिनीत द्यावे.


जैविक पद्धत :
परोपजीवी सूत्रकृमीद्वारे (ई.पी.एन.) नियंत्रण ः
- सूत्रकृमीयुक्त द्रवरूप ईपीएन याचा वापर करून प्रभावीरीत्या हुमणीचे नियंत्रण शक्य आहे. हे जमिनीमध्ये आढळणारे सूत्रकृमी असून, जमिनीमधील हुमणीला शोधून तिच्या शरीरावरील छिद्रांवाटे किंवा तोंडावाटे शरीरात प्रवेश करतात. किडीला रोगग्रस्त करून तिच्या शरीरात वाढतात. मृत किडीच्या शरीरातून बाहेर पडून जमिनीमध्ये दुसऱ्या हुमणीला शोधून रोगग्रस्त करतात.
- एकरी एक लिटर ईपीएन प्रति ४०० लिटर पाण्यात मिसळून पिकाच्या मुळांशी वाफसा स्थितीत आळवणी केली असता प्रभावीरीत्या हुमणीच्या नियंत्रण करता येते.
- ईपीएन हे हुमणीचे नैसर्गिक शत्रू असल्यामुळे त्याचा जमिनीतील उपयुक्त जिवाणू, वातावरण, पिकावर, तसेच मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत नाही.
-----------------------------------------------------------------------
संपर्क ः डॉ. क्रांती निगडे, ८३७९९४६९८७
(कृषी सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट, पुणे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com