कांद्याने मारले; उसाने तारले

कांद्याने मारले; उसाने तारले

Published on

गुनाट, ता. २४ : गुनाट (ता. शिरूर) व परिसरात गुऱ्हाळ चालकांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सद्यपरिस्थितीत ३६०० ते ३७०० प्रतिटन उसाला बाजारभाव मिळत आहे. वाढत्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. कांद्याने मारले पण ऊस पिकाने तारले, अशीच भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.

मागील दोन महिन्यांपासून सहकारी व खासगी साखर कारखाने, गुऱ्हाळे यांच्यात उसाच्या पळवापळवीबाबत स्पर्धा निर्माण झाली आहे. हीच स्पर्धा ऊस उत्पादकांच्या पथ्यावर पडत आहे. तोडणीसाठी ऊस मिळावा म्हणून खासगी कारखाने व गुऱ्हाळ मालक तर शेतकऱ्यांच्या उसाचे ॲडव्हान्स बुकींग करत आहेत. याच स्पर्धेमुळे शेतकऱ्यांच्या उसाचा दर एफआरपी पेक्षा ही जास्त वाढला आहे. पंधरा फेब्रुवारी खासगी कारखाने ३२००० रुपये प्रति टनांपर्यंत तर गुऱ्हाळ चालकांकडून याच उसाची प्रतिटन ३५०० रुपयांपर्यंत खरेदी होती. कारखान्यांचा गळीत हंगाम संपल्यानंतर हेच रेट कमी होतील की काय अशी शंका शेतकऱ्यांच्या मनात होती. मात्र संपत आलेले ऊस तोडणीचे क्षेत्र व त्याच दरम्यान रसवंती चालकांशी निर्माण झालेली स्पर्धा यामुळे गुऱ्हाळ चालकांनी दोनशे रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे हाच दर आता ३७०० रुपये प्रतिटनांपर्यंत गेला आहे.

गुऱ्हाळ चालकांनाच पहिली पसंती
रसवंती चालकांनी आपला दर ४००० रुपये प्रतिटनांपर्यंत ठेवला आहे. मात्र रसवंतीला ऊस दिल्यावर तोडणी दरम्यान घट येत असल्याने ऊस उत्पादक शेतकरी गुऱ्हाळ चालकांनाच आपली पहिली पसंती देत आहेत. त्यामुळे हीच स्पर्धा ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मात्र पथ्यावर पडली आहे.

मागील वर्षभरापासून पडलेल्या बाजारभावामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या संकटात व मानसिकदृष्ट्या खचलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे उसाच्या वाढत्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांना हक्काचे दोन पैसे मिळत असले तरी वर्ष भराच्या शेतीवरील खर्चाची सरासरी काढली तरी शेतकरी आजही कर्जाच्या विळख्यात आहे. शिवाय ज्यांच्याकडे बारमाही पाणी आहे, त्यांच्याकडेच ऊस आहे.
-संतोष भगत, शेतकरी गुनाट.

00333

Marathi News Esakal
www.esakal.com