कोल्हापूरः स्वाभिनानीचे आंदोलन मागे

कोल्हापूरः स्वाभिनानीचे आंदोलन मागे
Published on: 

‘स्वाभिनानी’चे आंदोलन मागे

३९०० पहिली उचल अधिक हंगाम संपताना १०० रुपयांवर तोडगा

ॲग्रोवन वृत्तसेवा
कोल्हापूर ः यंदाच्या गळीत हंगामात उसाला प्रति टन ३९०० पहिली उचल अधिक हंगाम संपताना १०० रुपये या कारखानदारांच्या प्रस्तावाला आंदोलक शेतकरी संघटनांनी शुक्रवारी (ता. ६) मध्यरात्री मान्यता देत किणी टोल नाक्यावरील बेमुदत चक्का जाम आंदोलन मागे घेतले. या संदर्भातील घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी किणी पथकर नाक्यावर उपस्थित हजारो आंदोलकांसमोर केली. दरम्यान, साखरेला ४५०० रुपये दर मिळाल्यावर पुढील हंगामात कारखाने सुरू होण्यापूर्वी २०० रुपये प्रति टन देण्याचेही ठरले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात ऊसदरासंदर्भात मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड आणि प्रकाश आवाडे यांच्याबरोबर गुरुवारी (ता. ५) झालेली तीन तासांची बैठक फिस्कटली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांचा कारखानदारांचा पाठविलेला प्रस्ताव घेऊन इचलकरंजीचे प्रांत दीपक शिंदे, हातकणंगलेचे तहसीलदार सुशील बेल्हेकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर आदींनी रात्री अकराच्या सुमारास आंदोलनस्थळी आले. त्यांनी शेट्टी यांना नोटीस बजावली. त्यानंतर शेट्टी व संघटनेचे मोजके प्रमुख यांनी पथकर नाक्याजवळील एका हॉटेलमध्ये या प्रस्तावावर अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ही चर्चा सुमारे दोन तास चालली. मध्यरात्री एक वाजता शेट्टी आंदोलनस्थळावरून व्यासपीठावर आले आणि त्यांनी आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले. त्या वेळी उपस्थित आंदोलनकर्त्यांनी आपल्या मोबाइलचे टॉर्च प्रकाशित करून त्यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला. या वेळी आंदोलनकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत एकच घोषणाबाजी केली. शेट्टी यांनी आंदोलनाचे यशस्वी नेतृत्व केल्याबद्दल त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून आभार मानण्यात आले.
त्या वेळी शेट्टी म्हणाले, ‘‘जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेत आहे. हा दर सांगली आणि सातारा जिल्ह्यांसाठीही लागू होईल. आंदोलनामुळे नागरिक आणि सर्व संबंधित यंत्रणांना झालेल्या त्रासाबद्दल मी दिलगीर आहे; मात्र आमची लढाई शेतकऱ्यांच्या हिताची आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.