सातारा पहिली उचल ४५०० रुपयांसाठी नागठाणे व किणी टोलनाक्यावर स्वाभिमानीचा बेमुदत चक्का जाम

सातारा पहिली उचल ४५०० रुपयांसाठी नागठाणे व किणी टोलनाक्यावर स्वाभिमानीचा बेमुदत चक्का जाम
Published on: 

‘स्वाभिमानी’ साताऱ्यात
करणार मंगळवारी ‘चक्का जाम’

कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत बेमुदत आंदोलनाचा इशारा

ॲग्रोवन वृत्तसेवा
सातारा : चालू गळीत हंगामातील उसाला पहिली उचल प्रतिटन साडेचार हजार रुपये जाहीर करावी आणि शेतकऱ्यांच्या घामाला योग्य मोबदला मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आरपारच्या संघर्षाची भूमिका घेतली आहे. या मागणीसाठी मंगळवारी (ता. ३) पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत एकाच दिवशी बेमुदत चक्का जाम आंदोलन पुकारण्यात आले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील शेतकरी किणी टोलनाक्यावर तर सातारा जिल्ह्यातील शेतकरी नागठाणे येथील उरमोडी नदी पुलाजवळ महामार्ग रोखून धरणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून उसाच्या दराबाबत साखर कारखानदारांना सकारात्मक तोडगा काढण्याची संधी देण्यात आली होती. मात्र वाढता उत्पादन खर्च लक्षात घेऊन प्रति टन साडेचार हजार रुपयांची उचल जाहीर करण्यास कारखानदार टाळाटाळ करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या संतापातूनच सातारा जिल्ह्यातील खटाव, कराड आणि कोरेगाव तालुक्यांत कारखान्यांकडे जाणारी ऊस वाहतूक शेतकऱ्यांनी रोखून धरली असून, गेल्या दोन दिवसांपासून कार्यकर्ते रस्त्यावर ठाण मांडून आहेत. आता या लढ्याला निर्णायक वळण देण्यासाठी महामार्गावर बेमुदत चक्का जाम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या आंदोलनात ऊसदराच्या प्रमुख मागणीसोबतच कृष्णा, उरमोडी आणि तारळी प्रकल्पांतील शेतीच्या पाण्याचा प्रश्नही ऐरणीवर आणला जाणार आहे. धरणात मुबलक पाणीसाठा असताना सिंचनासाठी कायद्याचे दाखले देत पाणी अडवले जाते, असा आरोप करत शेतकऱ्यांना तातडीने पाणी देण्याची मागणी लावून धरण्यात येईल. ऊस उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम राहिला तरच ग्रामीण अर्थव्यवस्था आणि बाजारपेठ टिकणार असल्याने, नागठाणे येथील महामार्गावरील आंदोलनात शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले आहे. ऊस उत्पादकांच्या घामाला योग्य दर मिळेपर्यंत हा लढा मागे घेतला जाणार नाही, असा इशाराही संघटनेने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.