

ऊस वाहतूक करणाऱ्या
वाहनांना रिफ्लेक्टर बंधनकारक
अपघात झाल्यास कारखाना व्यवस्थापनावरही कारवाईचा पोलिसांचा इशारा
ॲग्रोवन वृत्तसेवा
लातूर : ऊसतोड गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर, ट्रॉली आणि बैलगाड्यांच्या पुढील व मागील बाजूस उच्च दर्जाचे रिफ्लेक्टर व स्टिकर्स लावावेत, असे निर्देश पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी साखर कारखाना व्यवस्थापनाला दिले आहेत. रिफ्लेक्टर नसल्यामुळे तसेच नियमांचे पालन न केल्यामुळे अपघात होऊन जीवितहानी झाल्यास कारखान्याविरुद्धही नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
ऊसतोड हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू झाला असून, जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि प्रमुख रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणावर ऊस वाहतूक सुरु आहे. ऊस वाहतूक करणारी वाहने संथ गतीने धावत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते. विशेषतः रात्रीच्या वेळी अशा वाहनांचा अंदाज इतर चालकांना वेळेत न आल्यास गंभीर अपघात होऊ शकतात. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या पुढील व मागील बाजूस उच्च दर्जाचे रिफ्लेक्टर आणि स्टिकर्स लावल्यास रात्रीच्या वेळी ही वाहने दुरून नजरेस पडतात. त्यामुळे वाहनचालकांना योग्य अंतर राखता येते आणि संभाव्य अपघात टाळता येतात. यासाठी सर्व साखर कारखाना व्यवस्थापनांनी आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनावर आवश्यक रिफ्लेक्टर बसविल्याची खात्री करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आवश्यक रिफ्लेक्टर व स्टिकर्स नसणे, आदी कारणांमुळे गंभीर अपघात होऊन जीवितहानी झाल्यास, संबंधित वाहनधारकांसह जबाबदार कारखाना व्यवस्थापनाविरुद्ध लागू कायद्यानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस अधीक्षक तांबे यांनी दिला आहे.
क्षमतेपेक्षा जास्त ऊस वाहतूक टाळा
वाहनाच्या निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक ऊस वाहतूक केल्याने वाहनाचा समतोल बिघडणे, रस्त्यावर ऊस बाहेर पसरून इतर वाहनांना धोका निर्माण होणे तसेच रस्त्यांचे नुकसान होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे वाहनांच्या क्षमतेनुसारच ऊस वाहतूक करावी आणि वाहतुकीसंबंधी नियमांचे काटेकोर पालन करावे, असेही पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी रस्ता सुरक्षा समिती व संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून साखर कारखाना व्यवस्थापनाला रिफ्लेक्टर आणि स्टिकर्स बसविण्याबाबत वेळोवेळी लेखी सूचना देण्यात आल्या आहेत. रस्ते सुरक्षा ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे साखर कारखाना व्यवस्थापन, वाहनमालक आणि चालकांनी नियमांचे पालन करून ऊस वाहतूक सुरक्षित व शिस्तबद्ध करावी आणि अपघात टाळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन तांबे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.