

पान १४ साठी
आडसाली उसातील तण व्यवस्थापन
-------------
ऊस लागवडीतील तणांचे वेळेवर नियंत्रण न केल्यास ऊस उत्पादनात सुमारे ३० ते ७० टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. आडसाली ऊस पिकामध्ये सुरुवातीच्या वाढीच्या काळात तणांचा प्रभावी व एकात्मिक व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
-----------
डॉ. अभिनंदन पाटील, प्रणाली ढेकाणे, डॉ. अशोक कडलग
--------------------------------
महाराष्ट्रात उसाची लागवड प्रामुख्याने आडसाली, पूर्वहंगामी आणि सुरू या तीन हंगामांमध्ये केली जाते. यापैकी आडसाली ऊस हा सर्वाधिक कालावधीचा (सुमारे १६ ते १८ महिने) हंगाम असतो. या हंगामातील लागवड साधारणपणे जुलै-ऑगस्ट महिन्यात केली जाते. पिकाला वाढीसाठी अधिक कालावधी उपलब्ध होत असल्याने कांड्यांची वाढ, फुटव्यांची निर्मिती अधिक प्रमाणात होते, मात्र पिकाचा वाढीचा कालावधी मोठा असल्यामुळे तणांचा प्रादुर्भावही अधिक प्रमाणात दिसून येतो. विशेषतः लागवडीनंतरच्या सुरुवातीच्या तीन ते चार महिन्यांत उसाची वाढ तुलनेने संथ असते, तर तणे ही अतिशय वेगाने वाढून पाणी, अन्नद्रव्य, सूर्यप्रकाश आणि जागेसाठी पिकाशी तीव्र स्पर्धा करतात. त्यामुळे उसाची वाढ खुंटते, फुटव्यांची संख्या कमी होते, कांड्यांची जाडी घटते आणि उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो. विविध संशोधनानुसार तणांचे वेळेवर नियंत्रण न केल्यास उस उत्पादनात ३० ते ७० टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. त्यामुळे आडसाली ऊस पिकामध्ये सुरुवातीच्या वाढीच्या काळात तणांचा प्रभावी व एकात्मिक व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
-------------------------
आडसाली उसामध्ये आढळणारी प्रमुख तणे ः
- आडसाली ऊस पिकामध्ये दीर्घ वाढीच्या कालावधीमुळे गवतवर्गीय, रुंद पानांची, लव्हाळा तसेच वेलवर्गीय तणांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळतो. गवतवर्गीय तणांमध्ये हराळी, लव्हाळा, चिमणचारा, केना ही प्रमुख तणे आहेत. ती जमिनीतील पाणी व अन्नद्रव्यांसाठी मुख्य ऊस पिकासोबत तीव्र स्पर्धा करतात.
- रुंद पानांच्या तणांमध्ये माठ, तांदुळजा, गाजरगवत, काटेमाठ, छोटी व मोठी दुधी, टारफुला, ओसाडी, चांदवळ, धोत्रा, आघाडा, रेशीमकाटा, कपाळफोडी, घोळ आणि चिघळ यांचा समावेश होतो. याशिवाय चांदवेल तणही काही भागात आढळते. हे तण उसाच्या मुळांमधून अन्नद्रव्ये व पाणी शोषून घेत असल्याने पिकाची वाढ मंदावते.
- अलीकडील काळात खांडकुळी या वेलवर्गीय तणाचा प्रादुर्भाव अनेक भागांत वाढताना दिसून येत आहे. हे तण उसाच्या बांधणीनंतर कांड्यावर चढून पानांभोवती विळखा घालते. त्यामुळे पानांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही, प्रकाशसंश्लेषणाच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. परिणामी, ऊस पिकाची वाढ खुंटते व उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो. तसेच काढणीच्या वेळी हे तण उसामध्ये गुंतल्यामुळे तोडणीच्या कामातही अडथळा निर्माण होतो.
- उसामध्ये आढळणारी ही तणे पाणी, अन्नद्रव्ये, सूर्यप्रकाश आणि जागेसाठी पिकाशी स्पर्धा करून उत्पादनात लक्षणीय घट घडवून आणतात. तसेच काही तणे विविध किडी व रोगांसाठी यजमान बनतात. त्यामुळे तणांची योग्य ओळख करून त्यांच्या प्रकारानुसार योग्य वेळी प्रभावी तण व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे.
-------------------
तण व्यवस्थापनासाठीचा महत्त्वाचा कालावधी ः
ऊस पिकामध्ये लागवडीनंतरचे पहिले ९० ते १२० दिवस (३ ते ४ महिने) हा तण नियंत्रणाच्या दृष्टीने सर्वाधिक संवेदनशील कालावधी मानला जातो. या कालावधीत उसाची वाढ तुलनेने मंद असते, तर तणे जलद गतीने वाढून पिकाशी पाणी, अन्नद्रव्य, सूर्यप्रकाश आणि जागेसाठी स्पर्धा करतात. त्यामुळे या काळात तणांचे प्रभावी व्यवस्थापन केल्यास उत्पादनात होणारी घट मोठ्या प्रमाणात टाळता येते. यासाठी योग्य तणनाशकाची निवड, शिफारशीनुसार मात्रा योग्य वेळी फवारणी तसेच वेळेवर खुरपणी, आंतरमशागत आणि योग्य सिंचन व्यवस्थापन यांचा समन्वय साधणे आवश्यक आहे.
-----------------
तण व्यवस्थापनाचे प्रमुख प्रकार ः
१) प्रतिबंधात्मक उपाय ः
या पद्धतीचा मुख्य उद्देश तणांचा प्रादुर्भाव होण्यापूर्वीच त्यांची वाढ व प्रसार रोखणे हा असतो. यामध्ये प्रमाणित व तणविरहित बियाण्याचा वापर करणे, लागवडीपूर्वी शेतातील तणांचा नायनाट करणे, पूर्णपणे कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खताचा वापर, जमिनीची योग्य पूर्वमशागत व तसेच शेताचा बांध, पाण्याच्या चाऱ्या, पाट आणि शेतातील रस्ते तणविरहित ठेवणे आवश्यक आहे. याशिवाय कृषी अवजारे व यंत्रे स्वच्छ ठेवणे, सिंचनाच्या पाण्याद्वारे किंवा जनावरांच्या शेणाद्वारे तणांच्या बियांचा प्रसार होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. अशा उपायांमुळे भविष्यातील होणारा तणांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कमी करता येतो.
२) निवारणात्मक उपाय ः
तणांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याची तीव्रता कमी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व उपायांचा यात समावेश होतो. यामध्ये भौतिक, जैविक आणि रासायनिक या प्रमुख पद्धतींचा समावेश होतो.
अ) भौतिक व यांत्रिक पद्धती ः
या पद्धतीमध्ये तण उपटणे, खुरपणी, कोळपणी, खांदणी, आंतरमशागत तसेच सेंद्रिय किंवा कृत्रिम आच्छादन करून तणांची वाढ नियंत्रित केली जाते. ऊस पिकामध्ये सुरुवातीच्या ९०-१२० दिवसांत वेळेवर केलेली आंतरमशागत तण नियंत्रणासाठी अत्यंत प्रभावी ठरते. या पद्धतीच्या योग्य वापरामुळे तणनाशकाचा वापर कमी करण्यास मदत होते.
ब) पारंपरिक पद्धती ः
या पद्धतीमध्ये पीक फेरपालट, शिफारशीनुसार लागवडीचे अंतर, योग्य रोपसंख्या, संतुलित खत व्यवस्थापन, वेळेवर सिंचन, आंतरपीक पद्धतीचा अवलंब तसेच जलद वाढणारी हिरवळीची पिके (ताग, धैंचा) यांचा वापर केला जातो. ठिबक सिंचनासारख्या सुधारित सिंचन पद्धतीमुळे तणांची वाढ मर्यादित राहते आणि पाण्याचाही कार्यक्षम वापर होण्यास मदत होते.
क) जैविक पद्धती ः
या पद्धतीमध्ये उपयुक्त कीटक, बुरशी किंवा इतर जैविक घटकांच्या साह्याने तणांचे नियंत्रण केले जाते. ही पर्यावरणपूरक पद्धत असून, रासायनिक तणनाशकावरील अवलंबित्व कमी करण्यास मदत करते. उदाहरणार्थ, गाजर गवत नियंत्रणासाठी मॅक्सिकन भुंगा या जैविक नियंत्रण घटकाचा यशस्वी वापर करण्यात आला आहे.
ड) रासायनिक पद्धती ः
रासायनिक तण नियंत्रणामध्ये विविध प्रकारच्या तणनाशकांचा वापर करून तणांचे प्रभावी व्यवस्थापन केले जाते. तणांच्या प्रकारानुसार स्पर्शजन्य, आंतरप्रवाही, निवडक आणि अनिवडक तसेच उगवणपूर्व व उगवणपश्चात तणनाशकांचा वापर केला जातो. तसेच गवतवर्गीय, रुंद पानांच्या प्रकारातील तणांसाठी स्वतंत्र तणनाशके उपलब्ध आहेत. योग्य तणनाशकाची निवड करून शिफारशीनुसार त्याचा वापर केल्यास तणांचे प्रभावी नियंत्रण साध्य करता येत.
तक्ता ः
तणनाशकाचे नाव---वापरण्याचा कालावधी---व्यापारी प्रमाण (लिटर/किलो/हेक्टर)---तण नियंत्रणाचा प्रकार
१. ॲट्राझिन (५० टक्के डब्ल्यू.पी.)---तण उगवण्यापूर्वी---१ ते ४ कि./हेक्टर---रुंद पानांचे तण
२. क्लोमॅझोन (५० टक्के ई.सी.)---तण उगवण्यापूर्वी---१.५ ते २ लि./हेक्टर---गवतवर्गीय तणे
३. २-४ डी. (५८ टक्के एस.एल)---उगवणपश्चात---६.३ लि./हेक्टर---रुंद पानांचे तण, लव्हाळा
४. हॅलोसल्फ्युरॉन मिथाइल (७५ टक्के डब्ल्यू.जी.)---उगवणपश्चात---९० ग्रॅम/हेक्टर---लव्हाळा
५. मेट्रिब्युझिन (७० टक्के डब्ल्यू.पी.)---उगवण्यापूर्वी व उगवणपश्चात---१.५ ते २ कि./हेक्टर १.५-३.० कि./हेक्टर---गवतवर्गीय, रुंद पानांचे तण व लव्हाळा
६. मेटसल्फ्युरॉन मिथाइल (२० टक्के डब्ल्यू.पी.)---उगवणपश्चात---३० ग्रॅम/हेक्टर---रुंद पानांचे तण व लव्हाळा
७. सल्फेनट्रॅझोन (३९.६ टक्के एस. सी.)---उगवण्यापूर्वी---१.५ लि./हेक्टर---रुंद पानांचे तण व लव्हाळा
८. क्लोमॅझोन (२२.५ टक्के) अधिक मेट्रिब्युझोन (२१ टक्के डब्ल्यू.पी)---उगवण्यापूर्वी व उगवणपश्चात---२.५ कि./हेक्टर---गवतवर्गीय, रुंद पानांचे तण
९. हॅलोसल्फ्युरॉन मिथाइल (६ टक्के डब्ल्यू. जी.) अधिक मेट्रिब्युझोन (५० टक्के डब्ल्यू.जी.)---उगवणपश्चात---१.१ कि./हेक्टर---गवतवर्गीय, रुंद पानांचे तण
१०. मेसोट्रियॉन (२.२७ टक्क) अधिक ॲट्राझिन (२२.७ टक्के एस.सी.)---उगवण्यापूर्वी व उगवणपश्चात---३.५ लि./हेक्टर---गवतवर्गीय, रुंद पानांचे तण व लव्हाळा
(टीप ः फवारणीसाठी ५०० लि. प्रति हेक्टर पाण्याचा वापर करावा.)
(लेबल क्लेम आहेत)
-----------------------
तणनाशक वापरताना घ्यावयाची काळजी ः
- ऊस पिकामध्ये तणनाशकाचा वापर शिफारशीनुसार आणि योग्य वेळी करणे अत्यंत आवश्यक आहे.
- तणनाशकाचा वापर नेहमी शिफारस केलेल्या मात्रेतच करावा.
- फवारणीच्या वेळी जमिनीत पुरेसा ओलावा असावा.
- तणनाशक फवारणीकरिता फ्लॅटफॅन नोजलचा वापर करावा.
- शिफारशीनुसार पाण्याचे प्रमाण राखणे आणि तणनाशकाची अचूक मात्रा वापरणे आवश्यक आहे. यामुळे तण नियंत्रण अधिक प्रभावी होते आणि पिकावर विपरीत परिणाम होत नाही.
तणनाशकाचा अतिवापरामुळे होणारे परिणाम ः
- मातीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांचे नुकसान होऊ शकते.
- तणनाशकाचे अवशेष जलप्रदूषणास कारणीभूत ठरू शकतात.
- अयोग्य वापरामुळे पिकामध्ये पाने जळणे, वाढ खुंटणे आणि उत्पादनात घट होण्याची शक्यता असते.
- एकाच तणनाशकाचा वारंवार वापर केल्यास तणांमध्ये तणनाशक प्रतिकारशक्ती विकसित होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे तणनाशकांची फेरपालट आणि योग्य मिश्रणाचा वापर करणे आवश्यक आहे.
००००००००००००००००००००
- डॉ. अभिनंदन पाटील, ९७३७२ ७५८२१
(वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे)
फोटो ः
आडसाली ऊस पिकामध्ये प्रभावी तण व्यवस्थापनासाठी एकात्मिक पद्धतींचा अवलंब करावा. PNE26W44431
----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.