ऊस तोडणी कामगारांना लागले घराकडे जाण्याचे वेध

राजकुमार थोरात
Sunday, 19 April 2020

- उद्यापासून परतीचा प्रवास होणार सुरु

- कामगारामध्ये आनंदाचे वातावरण

वालचंदनगर : राज्यातील ऊस तोडणी कामगारांना घरचे वेध लागले असून, उद्यापासून (सोमवार) कामगारांचा कुटुंबासहित परतीच्या प्रवास सुरु होणार असल्याने कामगारामध्ये आनंदाचे वातावरण आहे.  भवानीनगर (ता.इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना स्थळावरील ऊस तोडणी मजूरांच्या आरोग्य तपासणी आजपासून सुरवात झाली. 

राज्यासह देशामध्ये कोरोनाच्या संसर्ग वाढल्यामुळे केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर आहे. राज्यामध्ये अनेक सहकारी व खासगी कारखान्याच्या गळीत हंगाम संपल्यामुळे ऊस तोडणी कामगार कारखान्याच्या स्थळावर अडकले आहेत. जिल्हाबंदी असल्यामुळे त्यांना एका जिल्हातून दुसऱ्या जिल्हात प्रवास करता येत नव्हता. गळीत हंगाम संपून कामगारांना कुंटूबासहित दुसऱ्या गावामध्ये राहावे लागत असल्याने कामगार आक्रमक होवू लागले होते. आम्हाला धान्य नको, जनावरांना चारा नको, आमच्या गावाकडे जावू द्या, अशी मागणी करीत होते. राज्य सरकारने ऊस तोडणी कामगारांना त्यांच्या गावी जाण्यास परवानगी दिल्यामुळे कामगारामध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे.  

भवानीनगरमधील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम संपला असून, गेल्या १५ दिवसांपासून भवानीनगरमध्ये १६ जिल्हातील अडीच हजार कामगार अडकले असून, यामध्ये जळगाव  जिल्हातील चाळीसगाव तालुक्यातील ३५०, नगर जिल्हातील १६०० व बीड जिल्हातील ५५० कामगारांचा व पाच हजार जनावरांचा समावेश आहे. शनिवार (ता.१८) पासून भवानीनगरमध्ये ऊस तोडणी मजुरांची आरोग्य तपासणीस सुरवात करण्यात आली.

सर्दी, खोकला, तापाची तपासणी करण्याचे काम सुरु होते. उद्यापासून कामगारांचा परतीचा प्रवास सुरू होणार असल्याने कामगारांनी आवराआवर करण्यास सुरुवात केली आहे.  

सर्व कामगारांचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला जाणार असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर कामगारांना त्यांच्या गावी पाठविण्यात येणार असल्याचे वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sugarcane workers will returns to Their Home tomorrow