सुमन काळे प्रकरणी एसआयटी

सुमन काळे प्रकरणी एसआयटी
Published on

सुमन काळे मृत्यूप्रकरणी एसआयटी

अहिल्यानगर, ता. १४ ः जिल्ह्यातील पारधी समाजातील समाजसेविका सुमन काळे यांच्या पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणाच्या फेरतपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. पुणे आयुक्तालयातील पश्चिम विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ एसआयटी प्रमुख असतील. तीन महिन्यांत तपास पूर्ण करून राज्य शासनाला अहवाल सादर करायचा आहे.

काळे या जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरात बेशुद्ध आढळून आल्या होत्या. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा साहेबा काळे आणि भाऊ गिरीश जाधव यांनी पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला. तत्कालीन उपविभागीय दंडाधिकारी विकास पानसरे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर केला. ज्यामध्ये सुमन यांचा पोलिसांच्या मारहाणीतच मृत्यू झाला, असे अहवालात म्हटले.

काळे यांचा मृत्यू पोलिस कोठडीत झाल्याने या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) कडे वर्ग करण्यात आला. पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह डॉक्टरांवरही आत्महत्येस प्रवृत्त करणे, पुराव्यात फेरफार करणे, मारहाण करणे आदी कलमान्वये भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपींनी वेळोवेळी गुन्ह्यातून वगळण्यासाठी जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत याचिका दाखल केल्या. त्यामुळे खटल्याचे कामकाज लांबणीवर पडले. सीआयडीने तपासात अनेक त्रुटी ठेवल्याच्या मुद्यावर सुमनचा भाऊ गिरीश जाधव यांनी ९ जून २०२६ रोजी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर राज्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक लखमी गौतम यांनी एसआयटी स्थापन केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com