''माळेगाव'' अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर

''माळेगाव'' अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर

Published on

माळेगाव, ता. १ : राज्याच्या सहकार क्षेत्रात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखाना अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी बोलाविण्यात आलेली संचालक मंडळाची महत्त्वाची बैठक रविवारी (ता. १) ऐनवेळी तहकूब करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे सभा पुढे ढकलण्यात आल्याची अधिकृत माहिती कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी दिली.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर कारखान्याच्या अध्यक्षपदाची जागा गेल्या महिन्याभरापासून रिक्त आहे. या पार्श्वभूमीवर नवीन अध्यक्ष निवडीसाठी रविवारी संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, प्रांताधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे निवडणूक प्रक्रिया कारखाना प्रशासनाला राबविता आली नाही. अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे कार्यकारी संचालक पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार या प्रथमच संस्था प्रतिनिधी ‘ब’ वर्ग मतदारसंघातून संचालिका म्हणून निवडून आल्या आहेत. सुमारे १०० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नवनिर्वाचित संचालिका म्हणून त्या रविवारच्या संचालक मंडळाच्या बैठकीस उपस्थित राहिल्या. प्रारंभी त्यांनी संचालक मंडळातील सदस्यांची ओळख करून घेत कारखान्याच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. सध्या सुरू असलेल्या गाळप हंगामाबाबत चर्चा करताना साखर कामगारांचे प्रलंबित प्रश्न, ऊस गाळप क्षमता, साखर उत्पादन व आर्थिक स्थिती यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले. कार्यकारी संचालक पाटील व संचालकांनी कारखान्याच्या सद्यःस्थितीची माहिती सादर केली. या बैठकीस उपाध्यक्षा संगीता कोकरे, ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे, तानाजी कोकरे, योगेश जगताप, नितीन सातव यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते. तसेच छत्रपती सहकारी साखर कारखाना अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व सोमेश्वर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचीही उपस्थिती होती.

सुनेत्रा पवारांकडे सूत्रे जाण्याचे संकेत
अध्यक्षपदाच्या निवडीकडे संपूर्ण सहकार क्षेत्राचे लक्ष लागले असून, पुढील बैठकीत अध्यक्षपदाची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडेच सोपविण्यात येणार असल्याचे संकेत संचालक मंडळाकडून देण्यात आले. त्यामुळे राजकीय व सहकार क्षेत्रात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com