‘सुपे घाटातील वळणांचा प्रस्ताव सादर करणार’

‘सुपे घाटातील वळणांचा प्रस्ताव सादर करणार’
Published on

केडगाव/वरवंड, ता. १९ : सुपे घाटातील अवघड वळणांचे सर्वेक्षण करून तातडीने करावयाच्या उपाययोजना व कायमस्वरूपी करावयाच्या उपाययोजना, असे दोन प्रस्ताव शासनाकडे सादर करणार आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत पंडित यांनी शनिवारी (ता. १९) दिली.

सुपे घाटातील बस अपघात ठिकाणाची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभागाने केली. यावेळी प्रशांत पंडित, उपअभियंता एन. पी. जाधव, देऊळगाव गाडाचे सरपंच राजवर्धन जगताप, सुरेश शितोळे, राजेंद्र शितोळे, भाऊसाहेब सोनवणे, संतोष जगताप, संतोष मोरे आदी उपस्थित होते.
पडवी (ता. दौंड) हद्दीत असलेल्या सुपे घाटात बुधवारी (ता. १६) सकाळी ४५ विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बारामती आगाराची बस घाटातील मोठ्या खड्ड्यात उलटली. यात आठ विद्यार्थी जखमी झाले. दोन विद्यार्थी गंभीर जखमी आहेत. सुपे घाटात अवघड वळण व तीव्र चढण असल्याने वाहनांची ताकद खंडित होते. त्यामुळे घाटात वाहने मागे सरकत अनेक अपघात होत असतात. सर्वच अपघातांची नोंद पोलिस ठाण्यात होत नसते. हे अवघड वळण काढण्याची ग्रामस्थांची अनेक वर्षांपूर्वीची मागणी आहे. मात्र त्याकडे संबंधितांकडून दुर्लक्ष होत आले आहे. दरम्यान, बुधवारी झालेल्या बस अपघातानंतर घाटातील अवघड वळणांची चर्चा तीव्रतेने होऊ लागली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष वैशाली नागवडे यांनी अपघाताच्या कारणांची माहिती घेतली आहे. आमदार राहुल कुल यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी घाटातील समस्यांबाबत चर्चा केली आहे. मंत्री भोसले यांनी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना यातून मार्ग काढण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार आज कार्यकारी अभियंता प्रशांत पंडित व त्यांच्या सहकाऱ्यांनी घाटातील अवघड वळणांची पाहणी केली.

यावेळी पंडित म्हणाले, बस अपघाताच्या ठिकाणी ९० अंशाच्या कोनातील वळण आहे. असे वळण ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखले जाते. अवघड वळण सरळ करणे, चढण चढताना एकेरी रस्ता करणे किंवा चढ कमी करणे आदी बाबी प्रस्तावात असतील. तातडीच्या उपाययोजनांची कामे एक महिन्यात सुरू होतील. उपअभियंता एन. पी. जाधव म्हणाले, अवघड वळण काढण्यासंदर्भात दोन वर्षांपूर्वी प्रस्ताव दिला होता. याशिवाय स्पीड गन लावण्याबाबत परिवहन विभागाला पत्र देण्यात आले आहे, पण त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com