देशांतर्गत बाजारपेठेत द्राक्षाला चांगला दर . . . !
ROP26B02619
सुस्ते (ता. पंढरपूर) : येथे बागेतील द्राक्ष काढणी सुरू असून, वजन करून बॉक्स पॅक करताना शेतकऱ्यांचे टिपलेले छायाचित्र.
- -
देशांतर्गत बाजारपेठेत द्राक्षाला समाधानकारक दर
सुस्तेतील शेतकरी अमोल सालविठ्ठल यांच्या ‘सुपर सोनाका’ला मिळाले प्रतिकिलो ७७.५० रुपये
मोहन काळे : सकाळ वृत्तसेवा
रोपळे बुद्रूक, ता. १६ : युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक बाजारपेठेत काही प्रमाणात अनिश्चितता निर्माण झाली असली तरी, देशांतर्गत बाजारपेठेत द्राक्षाला चांगला दर मिळत असल्याचे सकारात्मक चित्र दिसत आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत आहे. पंढरपूर परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. सुस्ते (ता. पंढरपूर) येथील शेतकरी अमोल सालविठ्ठल यांनी यंदा उत्कृष्ट प्रतीच्या ‘सुपर सोनाका’ द्राक्षांची विक्री करून प्रतिकिलो ७७.५० रुपये असा समाधानकारक दर मिळवला आहे.
सालविठ्ठल हे पंढरपूर येथील बायोस्पीयर फेड फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे संचालक आहेत. ही कंपनी केंद्र शासनाच्या १० हजार एफपीओ (फार्मर प्रोड्यूसर ऑर्गनायझेशन) उभारणीच्या उपक्रमांतर्गत स्थापन झालेल्या संस्थांपैकी एक आहे. नाफेडच्या मार्गदर्शनाखाली आणि सीबीबीओ म्हणून सिमॅसिस लर्निंग एलएलपी, पुणे यांच्या अंतर्गत ही कंपनी कार्यरत आहे.
द्राक्षबागेचे शास्त्रोक्त व्यवस्थापन, योग्य छाटणी, पोषण व्यवस्थापन आणि दर्जेदार उत्पादन यामुळे अमोल सालविठ्ठल यांच्या बागेतील द्राक्षांना बाजारपेठेत चांगली मागणी आहे. सध्या निर्यात बाजारपेठेवर जागतिक परिस्थितीचा काही प्रमाणात परिणाम जाणवत असला तरी देशांतर्गत बाजारपेठेत गुणवत्तापूर्ण द्राक्षांना चांगला दर मिळत आहे. सुपर सोनाका, एसएस, अनुष्का आदी वाणांच्या द्राक्षांना प्रतिकिलो सुमारे ७० ते ७५ रुपये दर मिळत आहे.
गेल्या वर्षी या एफपीओच्या माध्यमातून द्राक्ष विक्री करत सुमारे एक कोटी रुपयांची उलाढाल करण्यात आली होती. संघटित विक्री पद्धती आणि दर्जेदार उत्पादनामुळे यंदा या व्यवसायातून कंपनी दोन कोटी रुपयांपर्यंत उलाढाल करेल, अशी अपेक्षा कंपनीचे अध्यक्ष अमोल सालविठ्ठल यांनी व्यक्त केली.
दरम्यान, बायोस्पीयर फेड फार्मर प्रोड्यूसर कंपनीने वार्षिक उलाढालीत तीन कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. यासाठी सिमॅसिस लर्निंग एलएलपीचे प्रोजेक्ट हेड जयप्रकाश कुलकर्णी व जिल्हा समन्वयक मोहन काळे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
---
कोट :
शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एफपीओच्या माध्यमातून संघटित पद्धतीने बाजारपेठ गाठली आणि दर्जेदार उत्पादनावर भर दिला, तर शेती व्यवसाय अधिक सक्षम व फायदेशीर होऊ शकतो. युद्धजन्य परिस्थितीतही द्राक्षाला समाधानकारक दर मिळत आहे.
- अमोल सालविठ्ठल, अध्यक्ष, बायोस्पीयर फेड फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि., पंढरपूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

