‘प्रगती’सह १८ रेल्वे गाड्यांचा ‘सुपरफास्ट’ दर्जा काढला

‘प्रगती’सह १८ रेल्वे गाड्यांचा ‘सुपरफास्ट’ दर्जा काढला
Published on: 

पुणे, ता. १ : मध्य रेल्वे प्रशासनाने १८ रेल्वेगाड्यांचा ‘सुपरफास्ट’ दर्जा काढून त्यांना साधारण एक्स्प्रेसचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामध्ये पुणे-मुंबई मार्गावर धावणाऱ्या प्रगती एक्स्प्रेसचाही समावेश केला आहे. रेल्वे बोर्डाच्या निकषांनुसार या गाड्यांचा सरासरी वेग ५५ किलोमीटर प्रतितासापेक्षा कमी असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. हे सर्व बदल एक जानेवारी २०२७ पासून लागू होणार आहेत.

रेल्वे बोर्डाच्या नियमांनुसार, ‘सुपरफास्ट’ दर्जासाठी गाडीचा सुरुवातीच्या स्थानकापासून ते अंतिम स्थानकापर्यंतचा सरासरी वेग किमान ५५ किमी प्रतितास असणे अनिवार्य असते. मात्र, प्रगती एक्स्प्रेस, पुणे-काझीपेठ आणि जनशताब्दीसह १८ गाड्यांचा वेग या निकषात बसत नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांचा ‘सुपरफास्ट’ दर्जा काढून घेण्यात आला आहे. यामुळे या सर्व गाड्यांचे क्रमांकही बदलण्यात आले आहेत.

या गाड्यांचा दर्जा काढला
१. सीएसएमटी-हिंगोली जनशताब्दी
२. हिंगोली-सीएसएमटी जनशताब्दी
३. सीएसएमटी-पुणे प्रगती एक्स्प्रेस
४. पुणे-सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस
५. एलटीटी-कोचूवेली/त्रिवेंद्रम सुपरफास्ट
६. त्रिवेंद्रम-एलटीटी सुपरफास्ट
७. एलटीटी-करमाळी एसी सुपरफास्ट
८. करमाळी-एलटीटी एसी सुपरफास्ट
९. सीएसएमटी-बनारस महानगरी एक्स्प्रेस
१०. बनारस-सीएसएमटी महानगरी एक्स्प्रेस
११. एलटीटी-अयोध्या कँट तुलसी एक्स्प्रेस
१२. अयोध्या कँट-एलटीटी तुलसी एक्स्प्रेस
१३. सीएसएमटी-चेन्नई एग्मोर सुपरफास्ट
१४. चेन्नई एग्मोर-सीएसएमटी सुपरफास्ट
१५. एलटीटी-बनारस सुपरफास्ट
१६. बनारस-एलटीटी सुपरफास्ट
१७. पुणे-काझीपेठ सुपरफास्ट
१८. काझीपेठ-पुणे सुपरफास्ट

गाड्यांना दर्जा कसा मिळतो
- एक्स्प्रेस : या गाड्यांचा सरासरी वेग साधारणपणे ४० ते ५० किमी प्रतितास असतो. मात्र, प्रवासादरम्यान या गाड्यांचा कमाल वेग ११० ते १३० किमीपर्यंत जातो.
- सुपरफास्ट : कोणत्याही एक्स्प्रेस गाडीला ‘सुपरफास्ट’ दर्जा मिळवण्यासाठी तिचा संपूर्ण प्रवासातील सरासरी वेग किमान ५५ किमी प्रतितास असणे अनिवार्य आहे.
- प्रीमियम गाड्या (राजधानी, शताब्दी, दुरांतो) : या गाड्यांना मार्गावर विशेष प्राधान्य दिले जाते. यांचा सरासरी वेग ७० ते ९० किमी प्रतितास आणि कमाल वेग १३० किमी प्रतितासापर्यंत असतो.
- वंदे भारत एक्स्प्रेस : ही सेमी-हायस्पीड गाडी असून तिचा कमाल वेग १६० किमी प्रतितास आहे. सध्या देशातील बहुतांश मार्गांवर ती १३० किमी प्रतितास या कमाल वेगाने धावते आणि तिचा सरासरी वेग साधारणपणे ७५ ते ८५ किमी प्रतितास असतो.

‘सुपरफास्ट’ दर्जा काढल्याने हे होणार
- ‘सुपरफास्ट’ दर्जा असलेल्या गाड्यांसाठी रेल्वेकडून तिकिटात ‘सुपरफास्ट सरचार्ज’ (अतिरिक्त शुल्क) आकारला जातो. आता हा दर्जा काढल्यामुळे प्रवाशांना हा सरचार्ज द्यावा लागणार नाही, परिणामी प्रवासभाडे थोडे कमी होईल.
- ‘सुपरफास्ट’ गाड्यांचे क्रमांक साधारणतः ‘१२’ किंवा ‘२२’ ने सुरू होतात. आता हे क्रमांक बदलून ‘११’ ने सुरू होतील.
- रेल्वे धावताना ‘सुपरफास्ट’ गाड्यांना इतर गाड्यांच्या तुलनेत विशेष प्राधान्य दिले जाते. आता या गाड्यांना प्राधान्य दिले जाणार नाही. परिणामी गाड्यांना उशीर होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.