
सुप्याची वाटचाल नगर पंचायतीकडे
सुपे - सुपे (ता. बारामती) ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीमध्ये रूपांतर करू शकतो, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ते म्हणाले- ग्रामस्थांनी एकत्र येऊन नगरपंचायत करण्याविषयी निर्णय घ्यावा. नगर पंचायत करायची का नाही हे तुम्ही ठरवा. शेजारील बारा वाड्यांशी चर्चा करा. लोकांचा विरोध असेल तर नको असेही त्यांनी स्पष्ट केले. सुप्यात सुमारे ४ कोटी ९० लाख रूपये खर्चांच्या विविध विकास कामांचे भूमिपुजन व राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालय, मयुरेश्वर पतसंस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन श्री.पवार यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, हडपसर ते चौफुला मार्गे सुपे व हडपसर ते मोरगाव मार्गे सुपे अशा पीएमपीएमएल बस गाड्यांना हिरवा कंदील दाखवून श्री.पवार यांच्या हस्ते सुरू करण्यात आल्या. या वेळी श्रीशहाजीराजे मैदानावर झालेल्या कार्यक्रमात श्री. पवार बोलत होते.
कार्यकर्त्यांनी गटबाजी करू नका. मतभेद वाढवू नका. लोकांची कामे करा. दिलेल्या निधीची दर्जेदार कामे करून घ्या. अशा कानपिचक्या देत श्री.पवार पुढे म्हणाले - वीज वापरली त्याचे पैसे दिले पाहिजेत. ६५ हजार कोटींची थकबाकी आहे. रब्बीची पीके निघाल्यानंतर चालू बाकी भरा. आकडे टाकू नका. खटले भरले जातील. हायमास्टला परवानगी नाही. महिला पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी जागेची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. नाझरे धरणात ७ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे सांगून श्री.पवार म्हणाले - काही गावांच्या परिसरात उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासते. यासाठी नीरा डाव्या कालव्यावरून योजना राबवली जाणार आहे. त्यानंतर पाणी नाही, टँकर द्या अशी स्थिती राहणार नाही. अतिरिक्त ऊसाबाबत बोलताना श्री.पवार म्हणाले - पाण्याचे नियोजन करून ऊस लावा. सोमेश्वर साखर कारखान्याचे नुकतेच विस्तारीकरण झाले आहे. गाळपा अभावी ऊस शिल्लक राहणार नाही याची काळजी घेण्याच्या सुचना कारखान्यांना दिल्या आहेत.
दरम्यान, श्री.पवार यांनी विद्या प्रतिष्ठानचे शैक्षणिक संकुल, ग्रामीण रूग्णालय, मार्केट यार्ड, पोलीस ठाणे व निसर्ग परिचय केंद्राला भेट देऊन पाहणी केली. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शंभूराजे प्रतिष्ठाणने आयोजित केलेल्या बैलगाडा हिंद केसरी शर्यतीला श्री.पवार यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. प्रास्तावीक अनिल हिरवे, महेश चांदगुडे यांनी केले. माजी सभापती शौकत कोतवाल, सुयश जगताप, अशोक लोणकर यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर संभाजी होळकर, सचिन सातव, भरत खैरे, पुरूषोत्तम जगताप, सिद्धेश्वर शेळके, संदीप जगताप, पोपटराव पानसरे, नीता बारवकर, बी. के. हिरवे, संजय दरेकर, बापुराव चांदगुडे, बबनराव बोरकर, हनुमंत शेळके, हरीभाऊ भोंडवे, सुशांत जगताप, तुषार हिरवे, सरपंच स्वाती हिरवे, उपसरपंच मल्हारी खैरे, ग्रामविकास अधिकारी डी.जी.लोणकर आदींसह परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Web Title: Supes Journey To Nagar Panchayat
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..