जादा पाणी मिळेपर्यंत दिवसाआडच पुरवठा - हर्डीकर

PCMC
PCMC

पिंपरी - रावेत अशुद्ध जलउपसा व निगडीतील जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढवून शंभर, वाघोली योजनेचे ३५, आंद्रा योजनेचे देहू बंधाऱ्यातून शंभर आणि भामा-आसखेड योजनेचे १६७ असे ४०२ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी शहरासाठी उपलब्ध होणार आहे. यातील किमान शंभर एमएलडी पाणी उपलब्ध होत नाही, तोपर्यंत ५१० एमएलडीवरच शहराची तहान भागवावी लागणार आहे. त्यामुळे जादा पाणी उपलब्ध होईपर्यंत समन्याय वितरण धोरणानुसार दिवसाआडच पाणीपुरवठा करावा लागेल, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकारांना सांगितले.

शहरात २५ नोव्हेंबरपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. तेव्हापासून नागरिकांच्या तक्रारी ९० टक्‍क्‍यांनी घटल्याचा दावा प्रशासन करीत आहे. मात्र, दिवसाआड पाणीपुरवठ्यावर तोडगा काढण्यासाठी त्यांचे प्रयत्नही सुरू आहेत. त्यासाठी रावेत बंधाऱ्यावरील अशुद्धा जलउपसा केंद्रातून १९ पंपांद्वारे २४ तास जलउपसा सुरू आहे. मात्र, जादा पाणी उचलून ते शुद्ध करण्याची क्षमता सध्या नाही. त्यामुळे पाणीपुरवठ्यास मर्यादा येत आहेत. 
असे मिळेल ४०२ एमएलडी
- रावेत अशुद्ध जलउपसा केंद्राची क्षमता वाढविण्यासाठी नवीन पंप घेण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे प्रतिदिन शंभर एमएलडी जादा पाणी उचलता येईल. त्यासाठी निगडी-प्राधिकरण सेक्‍टर २३ मधील जलशुद्धीकरण केंद्राची क्षमताही १०० एमएलडीने वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- पुणे महापालिका भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. ते मेपर्यंत पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर पवना नदीवरील पुण्याची वाघोली पाणीपुरवठा योजना पिंपरी-चिंचवडकडे हस्तांतरित केली जाईल. त्यातून ३५ एमएलडी पाणी उपलब्ध होईल. 
- आंद्रा धरणातून शंभर एमएलडी पाणी घेण्यास मंजुरी मिळालेली आहे. त्यासाठी धरणातून इंद्रायणी नदीत पाणी सोडले जाईल. देहू येथील बंधाऱ्यातून पाणी उचलले जाईल. 
- भामा-आसखेड योजनेतून शहरासाठी १६७ एमएलडी पाणी मंजूर आहे. पाइपद्वारे ते चिखली जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाईल. 

सद्यस्थिती
रावेत, वाघोली, आंद्रा व भामा-आसखेड योजनेतून साधारणतः ४०३ एमएलडी जादा पाणी शहरासाठी दृष्टिक्षेपात आहे. मात्र, रावेत बंधाऱ्यातून मंजूर ४२० व दंड भरून ६० असे ४८० एमएलडी पाणी प्रतिदिन उचलले जात आहे. ‘एमआयडीसी’कडून तीस एमएलडी पाणी विकत घेतले जात आहे. अशा ५१० एमएलडीवरच शहराची तहान भागवली जात आहे. यात गळती व चोरीचे अर्थात बेहिशेबी पाण्याचे प्रमाण चाळीस टक्के आहे. त्यामुळे अनियमित, कमी दाबाने व अपुरे पाणी मिळत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहे. त्यावर उपाय म्हणून समन्याय पद्धतीने वितरण करण्यासाठी दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com