सर्वोच्च न्यायालयाचा निका धक्कादायक

सर्वोच्च न्यायालयाचा निका धक्कादायक
Published on: 

नवी दिल्ली, ता. १७ (पीटीआय) : गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या दंगलीदरम्यान सामूहिक बलात्कार आणि कुटुंबातील सात सदस्यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेल्या दोघांची जन्मठेपेची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने स्थगित करून त्यांना जामीन मंजूर केला आहे. हा निर्णय धक्कादायक असून माझा विश्‍वासच बसत नाहीये अशी प्रतिक्रिया या प्रकरणातील पीडिता बिल्किस बानो यांनी दिली आहे.
‘‘सर्वोच्च न्यायालयाने माझे म्हणणे ऐकून न घेताच हा आदेश दिला असून, दोन्ही दोषींची जन्मठेपेची शिक्षा स्थगित करून त्यांना जामीन मंजूर केल्याची माहिती मला प्रसारमाध्यमांतूनच मिळाली,’’ असे बानो यांनी माध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ‘‘मला याबाबत वेदना होत असून हा निकाल ऐकून धक्का बसला आहे, माझ्या कानांवर माझा विश्वासच बसत नाहीये, डोळ्यांमधून अश्रू वाहत असून तोंडून एक शब्दही बाहेर पडणे अवघड असताना मी हे निवेदन देत आहे. सर्वोच्च न्यायालयाने दुसऱ्यांदा माझ्याशी संपर्क न साधता आणि माझे म्हणणे न ऐकताच आदेश दिला आहे,’’ असे बानो म्हटले.
न्यायाधीश एम. एम. सुंदरेश आणि न्यायाधीश पी. बी. वराळे यांच्या खंडपीठाने बिपिनचंद्र जोशी आणि प्रदीप मोरधिया या दोघांना जामीन मंजूर केला. या दोघांनी १७ वर्षांहून अधिक काळ तुरुंगवास भोगल्याची बाब न्यायालयाने विचारात घेतली. उपलब्ध झालेल्या आदेशात न्यायालयाने म्हटले आहे की, ‘‘दोन्ही याचिकाकर्ते १७ वर्षांहून अधिक काळ तुरुंगात आहेत. त्यापैकी एकाला गंभीर शारीरिक अपंगत्व आहे. या अपीलामध्ये तथ्य आणि कायद्याच्या दृष्टीने काही मुद्द्यांवर निर्णय होणे बाकी आहे. या बाबींचा आणि अपीलमधील मुद्द्यांचा विचार करून दोन्ही दोषींची शिक्षा स्थगित करण्यात येत असून, संबंधित खटल्याच्या न्यायालयाने घालून दिलेल्या अटी व शर्तींनुसार त्यांना जामीन मंजूर करण्यात येत असल्याचे खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले.

‘म्हणणे ऐकले नाही’
आपले म्हणणे ऐकून न घेताच सर्वोच्च न्यायालयाने दोघांची शिक्षा स्थगित कशी केली, असा सवालही बानो यांनी उपस्थित केला. माझ्यावर अत्याचार करणाऱ्या पुरुषांची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने स्थगित कशी केली? मला साधी माहितीही का दिली नाही? न्यायालयात माझे म्हणणे ऐकून घेतले जाईल, याची काळजीही का घेतली नाही?’’ असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. या आदेशाविरोधात आपण लढा देणार असल्याचे बानो यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.