शपथविधीबाबतचा निर्णय सुनेत्रा पवारांचा प्रफुल्ल पटेल यांचे स्पष्टीकरण, उलटसुलट चर्चा नाकारल्या
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. ३ : ‘‘उपमुख्यमंत्रिपदाची शपथ केव्हा घ्यावी हा निर्णय सुनेत्रा पवार यांचा होता. पवार कुटुंबात तीन दिवसांचा दुखवटा पाळला जातो, असे सुनेत्रा पवार यांनीच सांगितले होते,’’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आज दिल्लीत स्पष्ट केले. अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीवरून सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांना पूर्णविराम देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यासोबतच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड होण्याचे सूतोवाचही त्यांनी केले.
दिवंगत नेते अजित पवार यांना दिल्लीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी, उपमुख्यमंत्रिपद व पक्षाध्यक्षपद निवडीचा मुद्दा हा पक्षाचा अंतर्गत विषय असताना बाहेरचेच लोक उलटसुलट बोलत असल्याची नाराजी व्यक्त केली. श्रद्धांजली कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना पटेल म्हणाले,‘‘अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाला दिशा देण्यासाठी सर्वप्रथम रिक्त झालेले उपमुख्यमंत्रिपद भरण्याचा निर्णय घेतला. पक्षातील सर्वांची एकमताने इच्छा होती की हे अजित पवारांसोबत वर्षानुवर्षे काम करणाऱ्या सुनेत्रा पवारांनाच हे पद दिले जावे. राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया येत्या काही दिवसांत पूर्ण केली जाईल. कार्यकारी अध्यक्ष या नात्याने आपल्याला ही प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. हा निर्णय जनतेच्या आणि पक्षाच्या भावनेला अनुकूल अशाच पद्धतीने होईल.’’
शपथविधीपासून ते पक्षाध्यक्ष पदावरून सुरू असलेल्या वादावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करताना प्रफुल्ल पटेल यांनी नामोल्लेख टाळून खरमरीत टिका केली. ते म्हणाले,‘‘शपथविधीची घाई झाल्याच्या प्रतिक्रिया काही जणांकडून देण्यात आल्या आहेत. दुर्घटनेनंतर कोणी किती काळ दुखवटा पाळावा हा त्या त्या कुटुंबाचा वैयक्तिक विषय असतो. अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर आपण स्वतः, सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील या नेत्यांसमवेत पवार कुटुंबीयांशी चर्चा केली आणि सुनेत्रा पवार यांनीच उपमुख्यमंत्रीत्रिपद स्वीकारावे, हीच अजित पवारांना श्रद्धांजली असेल, अशी पक्षातील आमदारांची, कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे सांगितले. यानंतर सुनेत्रा पवारांनी सांगितले की पवार कुटुंबीयांमध्ये तीन दिवसांचा दुखवटा पाळला जातो. त्यामुळे पुढील प्रक्रिया सुरू करण्याबाबतचा निर्णय त्यांचाच होता.’’ यावर टिका करणाऱ्यांना सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री होणे आवडलेले नाही की शपथविधीची वेळ आवडलेली नाही, असा खोचक सवाल प्रफुल्ल पटेल यांनी केला.
विलीनीकरणावर चर्चेची गरज नाही
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबतच्या चर्चेचा प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट शब्दांत इन्कार केला. ते म्हणाले,‘‘पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच पुणे जिल्ह्यात मतविभाजन टाळण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनी एकत्र लढावे असे अजित पवारांना वाटले होते. त्यामुळे या निवडणुकीपुरता एकत्र येण्याचा निर्णय झाला. त्यासाठी अजित पवार यांनी जयंत पाटील, शशिकांत शिंदे, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्याशी चर्चा केली होती. केवळ त्याआधारे आता सर्वजण विलीनीकरणाचा निर्णय झाल्याचे बोलत आहेत. प्रत्यक्षात आम्हाला अजित पवारांकडून कोणत्याही प्रकारे स्पष्टपणे सांगण्यात आले नव्हते. जाहीर मुलाखतीमध्येही अजित पवार यांनी रोखठोकपणे हे ऐक्य निवडणुकीपुरते असल्याचे म्हटले होते. विलीनीकरणावर अंतिम निर्णय घेण्याआधी त्यांनी कार्यकारी अध्यक्ष म्हणून माझ्याशी नक्कीच चर्चा केली असती. त्यामुळे यावर (विलीनीकरणावर) आता काहीही चर्चा करण्याची गरज नाही.’’
वस्तुस्थिती समोर येईलच
अजित पवार यांच्या विमान अपघातावर संशय व्यक्त केला जात असल्याच्या घटनाक्रमावर प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले, की विमान अपघात चौकशी विभागाद्वारे (एएआयबी) चौकशी केली जात आहे. अजित पवार यांचे विमान हवेतच डावीकडे कलले आणि खाली कोसळले. व्हिडिओ फुटेज पाहून तांत्रिक चूक असल्याचे वाटते. वैमानिकानेही धावपट्टी दिसत असल्याचे म्हटले होते. अपघातग्रस्त
विमानाचा ब्लॅकबॉक्स सापडला असून त्यातील संदेशांची उकल झाल्यानंतर यात वैमानिकाची चूक होती की तांत्रिक चूक होती ही वस्तुस्थिती समोर येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

