कऱ्हाड सुर्लीग्रामलेखदोनफायनल

कऱ्हाड सुर्लीग्रामलेखदोनफायनल
Published on

उद्योग व्यवसायात वेगळा ठसा
---------
कऱ्हाड तालुक्याच्या पूर्व भागात वसलेले सुर्ली हे गाव निसर्गसौंदर्य, सामाजिक एकोपा आणि विकासकामांसाठी ओळखले जातेच; मात्र या गावाची खरी ओळख आहे ती कुस्तीची परंपरा आणि उद्योजकतेची ताकद यासाठी. सातारा जिल्ह्यात कुस्तीप्रेमींच्या नकाशावर मानाचे स्थान मिळवलेल्या सुर्लीने राज्यालाच नव्हे, तर देशालाही अभिमान वाटावा, अशी कामगिरी केली आहे. या गावाने सातारा जिल्ह्याला पहिला हिंदकेसरी दिला आणि त्याचबरोबर उद्योग-व्यवसाय क्षेत्रातही आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
सातारा जिल्ह्यातील कुस्तीचा वारसा अतिशय समृद्ध मानला जातो. वाई, कऱ्हाड, पाटण आणि परिसरातील अनेक गावांनी महाराष्ट्राला नामांकित पैलवान दिले आहेत. मातीशी नाळ जोडलेला कुस्ती हा खेळ येथील संस्कृतीचा अविभाज्य भाग राहिला आहे. या परंपरेत सुर्ली गावाने मिळवलेले स्थान अत्यंत अभिमानास्पद आहे. जिल्ह्याच्या इतिहासात पहिला ‘हिंदकेसरी’ किताब पटकावण्याचा मान सुर्लीचे सुपुत्र पैलवान संतोष पांडुरंग वेताळ (आबा) यांना मिळाला. संतोषआबा यांचा हिंदकेसरी पर्यंतचा प्रवास हा केवळ एका खेळाडूचा यशस्वी प्रवास नाही, तर ग्रामीण भागातील जिद्द, मेहनत आणि चिकाटीचे प्रेरणादायी उदाहरण आहे. गावातील मातीच्या आखाड्यात सुरू झालेली त्यांची कुस्तीची साधना पुढे राष्ट्रीय स्तरावर पोहोचली. त्यांनी हिंदकेसरी किताब जिंकताच केवळ सुर्ली नव्हे, तर संपूर्ण सातारा जिल्ह्याचे नाव देशभर पोहोचवले. त्यांच्या या ऐतिहासिक यशामुळे साताऱ्याच्या कुस्ती परंपरेला नवे बळ मिळाले आणि अनेक तरुणांना आखाड्याकडे वळण्याची प्रेरणा मिळाली. हिंदकेसरी किताब हा भारतीय कुस्ती क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा सन्मान मानला जातो. हा मान मिळवणारे संतोष आबा वेताळ हे जिल्ह्याचे पहिले मानकरी ठरले. त्यामुळे सुर्ली गावाला आजही ‘हिंदकेसरीची भूमी’ म्हणून ओळखले जाते. त्यांच्या कर्तृत्वामुळे गावाची ओळख महाराष्ट्रासह देशभर झाली. आजही जिल्ह्यातील विविध आखाड्यांमध्ये संतोष आबांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. त्यांच्या यशोगाथेतून अनेक युवा पैलवानांना प्रेरणा मिळत आहे.
कुस्तीबरोबरच सुर्ली गावाने उद्योग-व्यवसाय क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गावातील अनेक उद्योजकांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर राज्यासह परराज्यातही यशस्वी उद्योग उभे केले आहेत. त्यामध्ये नवनाथ बाळकृष्ण पाटील यांचे नाव विशेष उल्लेखनीय आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेला मंगलमूर्ती समूह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत असून, रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्याचप्रमाणे आनंदराव हिंदुराव ठोंबरे, योगेश राजाराम बनसोडे यांच्यासह अन्य ग्रामस्थांनीही उद्योग-व्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे. त्यांच्या उद्योगांचा विस्तार राज्याच्या सीमांपलीकडेही झालेला असून, त्यांनी आपल्या कार्यातून सुर्लीचे नाव विविध भागांत पोहोचवले आहे. व्यावसायिक दूरदृष्टी, प्रामाणिकपणा आणि कष्ट यांच्या बळावर त्यांनी यशाचे शिखर गाठले आहे. या उद्योजकांनी केवळ स्वतःची प्रगती साधली नाही, तर अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे सुर्ली गावातील नव्या पिढीसमोर उद्योग-व्यवसायाचे आदर्श निर्माण झाले आहेत. कुस्तीच्या आखाड्यात जशी जिद्द आणि मेहनत आवश्यक असते, तशीच वृत्ती उद्योगक्षेत्रातही दिसून येते आणि हेच सुर्लीच्या यशाचे वैशिष्ट्य आहे.
एका बाजूला हिंदकेसरी संतोषआबा वेताळ यांच्यासारखा राष्ट्रीय कीर्तीचा पैलवान आणि दुसऱ्या बाजूला राज्यभर यशाचा ठसा उमटवणारे उद्योजक अशी दुहेरी ओळख लाभलेले सुर्ली हे गाव आज ग्रामीण महाराष्ट्रासाठी प्रेरणास्थान ठरत आहे. परंपरा, कर्तृत्व, मेहनत आणि प्रगती यांचा सुंदर संगम असलेल्या या गावाने आपल्या कर्तृत्ववान सुपुत्रांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या वैभवात मोलाची भर घातली आहे.

PNE26W41093
सुर्लीतील फूड उद्योगात परदेशातील तज्ज्ञ येऊनही पाहणी करतात.
.................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com