business
business

पुण्यात उद्योगचक्राला गती; उत्पादनक्षमता आता ७२ टक्के 

Published on

पुणे - लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येऊ लागल्यामुळे उद्योगचक्रही आता स्थिरावू लागले आहे. गेल्या वर्षीच्या ऑक्‍टोबर महिन्याच्या तुलनेत पुणे जिल्ह्यातल उत्पादनक्षमता आता  ७२ टक्के झाली असून, मनुष्यबळाची उपस्थितीही ७७ टक्‍क्‍यांवर पोचली असल्याचे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरच्या (एमसीसीआयए) सर्वेक्षणातून मंगळवारी उघड झाले.     

‘एमसीसीआयए’ने शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवडमधील १७५ सूक्ष्म, लघु, मध्यम आणि मोठ्या उद्योगांच्या प्रतिनिधींशी बोलून हे सर्वेक्षण केले आहे. त्यात २७ टक्के सूक्ष्म, ३३ टक्के लघु, १७ टक्के मध्यम आणि २२ टक्के मोठ्या उद्योगांचा समावेश आहे. 

सर्वेक्षणातील एकूण उद्योगांपैकी ६६ टक्के उद्योग हे उत्पादन क्षेत्रातील असून, १६ टक्के उद्योग हे सेवा क्षेत्रातील आहेत. उर्वरित १८ टक्के उद्योग हे दोन्ही क्षेत्रांतील आहेत. लॉकडाउनच्या काळापासूनचे ‘एमसीसीआयए’चे हे सातवे सर्वेक्षण आहे. त्यात सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्‍टोबरमध्ये उद्योगांची परिस्थिती सुधारल्याचे दिसून आले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनापूर्वीच्या काळात उद्योगांची स्थिती ज्याप्रमाणे होती, तशी होण्यासाठी किती कालावधी लागेल, असाही प्रश्‍न सर्वेक्षणात होता. त्याबद्दल ३० टक्के कंपन्यांच्या प्रतिनिधींनी उद्योग पूर्ववत झाले आहेत, असे मत व्यक्त केलेे, तर ११ टक्के उद्योगांनी तीन महिन्यांत उद्योग पूर्ववत होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली असून किमान ६ महिने लागतील, असे मत २८ टक्के उद्योगांनी तर ९ महिने लागतील, असे १६ टक्के उद्योगांनी म्हटले आहे. ९ महिन्यांपेक्षा जास्त वेळ लागेल, असे ३ टक्के उद्योगांचे म्हणणे आहे तर ११ टक्के उद्योगांनी अनिश्‍चितता असल्याचे सांगितले.

प्रोत्साहनाची गरज 
सूक्ष्म उद्योगांची गेल्या वर्षीच्या ऑक्‍टोबर महिन्याच्या तुलनेत उत्पादनक्षमता ५६ टक्के झाली असून, मनुष्यबळ उपस्थित राहण्याचे प्रमाणही ६२ टक्के झाले आहे, असे सर्वेक्षणात आढळले आहे. गृहोद्योग, कुटीरोद्योग, किरकोळ स्वरूपात उत्पादन आणि विक्री करणाऱ्यांचा त्यात समावेश होतो. या उद्योगांना अजून पुरेसे पाठबळ मिळालेले नाही. त्यामुळे त्यांची परिस्थिती धीम्या गतीने सुधारत आहे, असेही सर्वेक्षणातून आढळले आहे. 

कोरोनाची हिवाळ्यात दुसरी लाट येण्यापूर्वी उद्योगांनी त्यांची परिस्थिती सक्षम करणे गरजेचे आहे. म्हणजे, त्यातून अनिश्‍चिततेवर मात करता येईल. याबरोबरच काही क्षेत्रांतील उद्योग आणि कामगारांना कोरोनाचा फटका बसला आहे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
- सुधीर मेहता, अध्यक्ष, एमसीसीआयए

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com