हिंजवडीतील कोंडीचे सर्वेक्षण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न कायमचा मार्गी लावण्यासाठी येत्या दहा दिवसांमध्ये सविस्तर सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

पिंपरी - हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न कायमचा मार्गी लावण्यासाठी येत्या दहा दिवसांमध्ये सविस्तर सर्वेक्षण करण्यात येणार आहे. हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशन आणि वाहतूक पोलिस यांच्यातर्फे अहवाल करण्यात येणार असून, त्यानंतर या परिसरातील सुधारणांचे काम तत्काळ हाती घेण्यात येणार आहे. 

आयटी पार्कमधील वाहतूक प्रश्‍नाबाबत पिंपरी-चिंचवडचे नवनियुक्‍त पोलिस आयुक्‍त संदीप बिष्णोई यांनी असोसिएशनचे पदाधिकारी आणि आयटी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून सोमवारी (ता. ३० सप्टेंबर) आढावा घेतला. बैठकीतील सूचनेनुसार मंगळवारी (ता. १) सहायक वाहतूक पोलिस आयुक्‍त नीलिमा जाधव यांच्यासोबत चर्चा केली. हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशनचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर कर्नल चरणजितसिंग भोगल (निवृत्त), असोसिएशनच्या सुरक्षा विभागाचे प्रतिनिधी कॅप्टन मयांक गुप्ता (निवृत्त), राहुल गायकवाड, योगेश जोशी, वीरधवल शितोळे उपस्थित होते. 

भोगल म्हणाले, ‘‘वाहतूक पोलिसांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये आयटी पार्कमध्ये सहा ठिकाणी कोंडी होते. मात्र, अशी कोंडीची ठिकाणे दहा ते बारापर्यंत आहेत. त्यात ही ठिकाणे निश्‍चित करण्यात येणार आहेत. कोंडीच्या ठिकाणी पोलिस कर्मचारी आणि ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्‍ती करण्यात येणार आहे. तसेच, परिसरातील वाहतुकीत बदल केला आहे. गतिरोधकांमध्ये बदल करणे, पादचाऱ्यांसाठीचे पांढरे पट्टे मारणे, लेन क्रॉसिंग टाळण्यासाठी स्वतंत्र लेनची व्यवस्था, नो पार्किंगच्या ठिकाणी थांबविण्यात येणाऱ्या वाहनांवर कारवाई, याचा अहवालामध्ये समावेश असेल. गतिरोधकाची आवश्‍यकता असलेली ठिकाणे, नो पार्किंग फलकांची गरज याची यादी एमआयडीसीला देण्यात येणार आहे.  

वॉर्डनची संख्या वाढणार
वाहतुकीमध्ये सुरळीतपणा यावा, यासाठी परिसरात ट्रॅफिक वॉर्डनच्या संख्येमध्ये वाढ करण्यात येणार आहे. सध्या या भागासाठी दहा वॉर्डन काम करीत आहेत. त्यामध्ये लवकरच दहा नव्या वॉर्डनची भर पडणार आहे.

पोलिस आयुक्‍त करणार पत्रव्यवहार
आयटी पार्कमधील पर्यायी रस्त्यांची कामे अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. पोलिस आयुक्‍तांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये या विषयावर सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर पोलिस आयुक्‍त संदीप बिष्णोई यांनी पर्यायी रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका, एमआयडीसी, पीएमआयडीए यांच्याशी पत्रव्यवहार करणार असल्याचे सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Survey will be conducted to fix the problem of traffic congestion at Hinjewadi IT Park