दिवाळी- विशाल देशमुख स्टोरी

दिवाळी- विशाल देशमुख स्टोरी
Published on: 

दिवाळी अंक स्टोरी
०००००००००००००००००००००००००००००००
गाईंचा गोठा नव्हे, तर ब्रीडिंग फार्म...
-----------------------------------
विशाल देशमुख, कौस्तुभ पवार हे युवा सहकारी. विशाल आयटी क्षेत्रातील तर कौस्तुभ हा एमबीए फायनान्स. दोघांचे स्वप्न होते, की स्वतःची शाश्वत शेती आणि ग्रामीण भागात अत्याधुनिक डेअरी व्यवसाय सुरू करायचा. विचार आणि आर्थिक गणित जुळले आणि अंबडवेट (ता.मुळशी, जि.पुणे) येथे ‘क्रीम ऑफ लाइफ’ या डेअरी प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली. जातिवंत जर्सी गाईंच्या संवर्धनासोबत स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण दूध, लोणी, पनीर आणि तूप निर्मितीसोबतच त्यांनी शाश्वत ग्राहकांची साखळीच तयार केली आहे.
-------------------
अमित गद्रे
--------------------
इंग्लंडच्या सरे काउंटीमधील एक निवांत सकाळ. शेती, पशुपालनाची आवड असलेले विशाल आणि दीप्ती शहरी भागातील म्युझियम फिरण्यापेक्षा सरे काउंटीच्या ग्रामीण भागातील एका परिचयातील शेतकऱ्यांच्या शेतावर भटकंतीला जातात. दिवसभर तेथील धष्टपुष्ट गाई, चराऊ कुरणे, प्रक्रिया उद्योग आणि कमी मनुष्यबळातील व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांच्या बरोबरीने चर्चा करतात. मग पुढील वर्षी नेदरलॅंडच्या पर्यटन दौऱ्यामध्ये देखील डेअरी फार्म आणि प्रक्रिया उद्योगाला भेट... अशातूनच स्वतःची शेती आणि डेअरीचे स्वप्न पुन्हा एकदा मनामध्ये जागा घेते आणि सरे काऊंटी ते अंबडवेट असा परतीच्या दिशेने प्रवास सुरू होतो.

अंबडवेट (ता.मुळशी, जि. पुणे) येथे विशाल तानाजीराव देशमुख यांची वडिलोपार्जित दहा एकर बागायती शेती, त्यामुळे लहानपणापासूनच शेतशिवार आणि जनावरांची आवड. शिक्षणामध्ये चांगली गती मिळाल्याने विशालने पुण्यामधील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पहिली चार वर्षे मुंबईमध्ये आयटी कंपनीत नोकरी केली. दरम्यान, उच्च शिक्षण आणि फिरण्याची आवड असल्याने २००६ मध्ये एमएस करण्यासाठी स्कॉटलंड गाठले. तेथील शिक्षण संपताच इंग्लंडमधील आयटी कंपनीमध्ये वेब डेव्हलपमेंटमध्ये काम सुरू झाले. दरम्यानच्या काळात लग्न झाले. पत्नी दीप्ती ही देखील एका कंपनीत नोकरी करत होती. सहा वर्षांच्या कालावधीत नोकरीमध्ये स्थिरता असल्याने छान आयुष्य सुरू होते. त्याचबरोबरीने इंग्लंडमधील ग्रामीण भाग देखील चांगल्या प्रकारे फिरता आला. कंपनीतील सहकारी कॅरोलिन लाँग हिची शेती होती. त्यामुळे विशालची तिच्यासोबत सतत शेती, पशुपालन आणि ग्रामीण भागातील परिस्थिती याबाबतच चर्चा व्हायची. ती एकदा म्हणाली, की विशाल तुला शेतीची एवढी आवड आहे, तर आमच्या घरच्या शेतीमध्ये पार्टनरशिप कर. जर्सी गाईंची डेअरीदेखील आपण चांगल्या प्रकारे विकसित करू शकतो. हा प्रस्ताव चांगलाच होता, परंतु विशालच्या मनात अंबडवेट गावामध्ये आधुनिक शेती आणि पशुपालनाचे स्वप्न होते. त्यादृष्टीने विचारचक्र सुरू झाले होते.
सरे काउंटी ते अंबडवेटच्या प्रवासाबद्दल विशाल म्हणाला, की मी इंग्लंडमध्ये २००६ मध्ये आलो. पुढे सहा वर्षे नोकरीचा कालावधी झाला होता. अजून एक वर्षे राहिला असतो, तर कायमस्वरूपी ‘युनायटेड किंग्डम’चा पासपोर्ट मिळाला असता. याच दरम्यान माझ्या वाचनात रॉबिन शर्माचे ‘द माँक हू सोल्ड हिज फेरारी’ हे पुस्तक वाचनात आले आणि माझा निर्णय आणखीनच पक्का झाला. हे पुस्तक वाचल्यानंतर मी स्वतःला प्रश्न विचारू लागलो, की आपली गावी चांगली शेती आणि पुण्यामध्ये आयटी क्षेत्रामध्ये व्यावसायिक संधी असताना मी परदेशात काय करतोय? तो माझ्यासाठी ‘टर्निंग पॉइंट’ होता. आयटी क्षेत्रात चांगली नोकरी असली तरी आपण दुसऱ्यासाठी काम करतोय, ते आपल्यासाठी करूयात, असे विचार मनात येऊ लागले. एकेदिवशी भविष्याचा ठाम विचार करून मी आणि दीप्तीने २०१२ मध्ये भारतात परतण्याचा निर्णय घेतला. परंतु मित्र, आई- वडील म्हणाले, की चांगले आयुष्य आणि नोकरी सोडून कशाला इकडे परत येतोस. भारतात परत येणे म्हणजे शून्यातून सुरुवात. इंग्लंड आणि भारतातील परिस्थिती वेगवेगळी. पण आमचा निर्णय ठाम असल्याने पुण्यात परतलो.

शेती नियोजनाला सुरुवात...
पुण्यापासून २५ किलोमीटर अंतरावरील अंबडवेट येथे विशालची वडिलोपार्जित दहा एकर बागायती शेती आहे. वडील तानाजीराव आणि आई लीलावती हे पारंपरिक पद्धतीने ऊस, भात, बटाटा तसेच विविध हंगामी भाजीपाला पिकांची लागवड करायचे. परंतु या शेतीचे म्हणावे तसे अर्थकारण बसले नव्हते. अशा परिस्थितीमध्ये विशाल यांनी २०१२ मध्ये आई-वडिलांच्या सोबत पीक नियोजनाची व्यवस्थित आखणी सुरू केली. याबाबत विशाल म्हणाला, की पुण्यात आल्यावर कुटुंबाचे आर्थिक गणित व्यवस्थित होण्यासाठी वर्षभर परदेशातील एका आयटी परदेशी कंपनीचे फ्री लान्स काम सुरू केले. सोबतच शेतीचे शिक्षण सुरू होते.२०१४ पासून मी खऱ्या अर्थाने शेतीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. निव्वळ शेतीवर कुटुंबाचे अर्थकारण चांगल्या पद्धतीने चालणे शक्य नसल्याने मी पूरक उद्योगाच्या दृष्टीने शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, फलोत्पादन, भाजीपाला लागवड, पॉलिहाउसमधील शेतीचे प्रशिक्षण घेतले. कारण माझे शिक्षण आयटी क्षेत्रातील, त्यामुळे शेतीमधील प्राथमिक बारकावे, तंत्रज्ञान समजावून घेणे मला आवश्यक होते. त्याकाळी पुणे परिसरात पॉलिहाउसमधील शेतीची चांगली सुरुवात झाली होती. त्यामुळे मी देखील प्रशिक्षणानंतर पारंपरिक शेती करण्यापेक्षा पॉलिहाउसमध्ये शेती करायचे ठरवले. केवळ १०-२० गुंठे पॉलिहाऊस करण्यापेक्षा थेट एक एकर पॉलिहाउस उभारले. त्यामागे असा विचार होता, की मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले तर बाजारपेठेत चांगल्या पद्धतीने शेतीमाल विकता येईल. त्यानुसार मी आठ वर्ष पॉलिहाउसमधील शेती केली. विविध भाजीपाला, फुलांचे ‘रेसिड्यू फ्री’ पद्धतीने दर्जेदार उत्पादन घेतले. पण बाजारपेठेतील अर्थकारणाचा फटका बसलाच. पुणे, मुंबई, हैदराबादमध्ये रंगीत ढोबळी मिरचीचा दर २०० रुपये किलो दर असताना मला मात्र व्यापारी ४०-५० रुपये प्रति किलो दर द्यायचा. या विक्रीची रक्कम दलालांकडून वेळवर मिळायची नाही, काही वेळा पैसे बुडाले. ढोबळी मिरचीनंतर मी गुलाब, जरबेराकडे वळलो. फुलांच्या शेतीतही सणासुदीच्या काळातही दर पडल्याचा फटका सोसला. पुणे बाजार समितीतील फुलबाजारात पहाटे चार वाजता मी गुलाब, जरबेरा फुले विकायला जायचो, व्यापारीच दर ठरवायचे. मला दराचा अंदाजच कळायचा नाही. त्यामुळे कधी फायदा तर कधी नुकसान वाट्याला आले. पण या सगळ्या प्रयोगात एकच लक्षात आले, की आपले उत्पादन आपणच थेट ग्राहकाला विकले, तरच चार पैसे हाती लागतील.
या पॉलिहाउस शेतीतून बाहेर पडण्यासाठी मी पशुपालनाचा मार्ग स्वीकारला. सात वर्षांपूर्वी गीर गाईंच्या संगोपनाची मोठी चर्चा सुरू झाली होती. बागायती शेती असल्याने चाऱ्याची अडचण नव्हती, पुणे शहर २५ किलोमीटरवर असल्याने दूध विक्रीचा देखील प्रश्न नव्हता. त्या वेळी आमच्या गोठ्यात पाच संकरित गाई होत्या, वडील गाईंचे संगोपन करायचे. घरामध्ये चर्चा सुरू असताना शेजारच्या गावात शेतकऱ्याकडे एक दुधाळ गीर गाय विकायची आहे, असे समजले. मी आणि वडील ती गाय खरेदी करून घरी घेऊन आलो. ही गाय प्रति दिन सहा लिटर दूध देत असल्याने घरी वापरून सुद्धा दूध शिल्लक रहायचे. म्हणून एका मित्राला दुधाचा रतीब सुरू केला. त्याने आणखी चार मित्रांना सांगितले. असे करत देशी गाईंच्या दुधाची मागणी वाढत गेल्याने टप्प्याटप्प्याने मी गीर गाईंची खरेदी सुरू केली. व्यावसायिक पद्धतीने गीर गाईंचे संगोपन करायचे ठरल्यावर मी थेट गुजरात गाठले. तेथे एका फार्मवर आठवडाभर प्रशिक्षण घेतले. त्यामुळे थोडा अंदाज आला. शेतावरच नवीन गोठा बांधला. पुढे चार वर्षांत गोठ्यात सत्तर गीर गाई झाल्या. सुरुवातीला मी प्रति लिटर सत्तर रुपये दराने पुणे शहरात दुधाची विक्री सुरू केली. पुढे सात, आठ महिन्यांत लक्षात आले, की सत्तर रुपये हा दर देखील आपल्या अर्थकारणाला परवडत नाही. कारण चारा, पाणी, औषधोपचार, मजूर, वाहतूक खर्च वाढतच चालले, त्यामुळे अर्थकारणाचे गणित बसेना. मग १०० रुपये प्रति लिटर दराने दूध विक्री सुरू केली. गुणवत्तापूर्ण दूध असल्याने ग्राहकांना माझ्यावर विश्वास होता, त्यामुळे दरवाढीचा ग्राहकांच्या संख्येमध्ये फारसा फरक पडला नाही. दुधाच्या बरोबरीने लोणी, तूप, जिवामृत निर्मिती देखील सुरू केली होती. पुण्यातील ग्राहकांना ३००० रुपये किलो दराने तूप आणि २६०० रुपये किलो दराने लोण्याची विक्री सुरू झाली. यास ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने हुरूप वाढला. दूध प्रक्रिया तसेच आर्थिक व्यवहाराची जबाबदारी दीप्तीकडे होती. मी गोपालन आणि दैनंदिन व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केले.
शेतीमध्ये पारंपरिक पिकांच्या ऐवजी चारा पिकांवर भर दिला. तसेच बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन तीन एकर क्षेत्रावर इंद्रायणी भात लागवडीवर लक्ष केंद्रित केले. मी सेंद्रिय पद्धतीने भात उत्पादनास सुरुवात केली. त्याचे प्रमाणपत्र घेतले. दूध विक्रीमुळे माझे ग्राहक तयार झाले होते. त्यामुळे तांदूळ विक्रीला अडचण आली नाही. ८० रुपये किलो दराने मी इंद्रायणी तांदूळ विकण्यास सुरुवात केली. यातून माझे कायम स्वरूपी २०० ग्राहक जोडले गेले.

पशुपालनातील बदल ः
गीर गाईंच्या संगोपनातून एक गोष्ट लक्षात आली, की कष्टाच्या मानाने यात मला म्हणावी तशी गती मिळत नाही. गीर गाय गाभण राहण्यास अडचणी येऊ लागल्या. त्याचा दूध उत्पादन चक्रावर परिणाम झाला. त्यामुळे मला गीर गाईंकडे लक्ष देण्यासाठी जास्तीचे पैसे देऊन भैया ठेवावा लागला. दुसरी गोष्ट अशी झाली, की जशी दुधाची मागणी वाढली, त्यानुसार मी मिळेल ती गाय खरेदी करत गेलो. यात माझी चूक झाली, ती म्हणजे मी गाईंची पेडिग्री तपासली नाही, त्यामुळे गोठ्यात जातिवंत दुधाळ गाईंची संख्या मर्यादित राहिली. गाईंची संख्या वाढल्याने मी दूध काढणी यंत्राचा वापर करायचा ठरविले. परंतु गीर गाईंचे यंत्राने दूध काढणे अवघड झाले. मजूर परवडेनासे झाले. यातून एक लक्षात आले, की छोट्या प्रमाणात दूध उत्पादन किंवा तूप, दही, लोणी प्रक्रियेसाठी गीर गोपालन ठीक आहे. घरचा चारा आणि वाहतूक व्यवस्था असल्याने आर्थिक ताण सहन केला. परंतु मला व्यावसायिक पद्धतीने पशुपालन करायचे असल्याने माझ्या गणिताप्रमाणे उत्पन्न मिळत नव्हते. माझ्या समोर दोन पर्याय उभे राहिले, की पशुपालन बंद करणे किंवा नव्याने बदल करत जातिवंत दुधाळ अधिक दूध उत्पादन देणाऱ्या गाईंची संख्या वाढवायची.

व्यावसायिक डेअरीला सुरुवात ः
विशाल यांनी व्यावसायिक दूध उत्पादन आणि प्रक्रिया उद्योगाला गती देण्यासाठी २०२४ मध्ये एचएफ जातीच्या सहा गाई आणल्या. याच दरम्यान जर्सी गाईंच्या खरेदीवर लक्ष केंद्रित केले. या बदलाबाबत विशाल म्हणाले, की एचएफ गाईंपेक्षा जर्सी गाईंचे दूध उत्पादनात सातत्य आहे. ५.५ फॅट, एसएनएफ ८.५ ते ९ आहे. ही गाय व्यवस्थापनाला सोपी आहे. पंजाबमध्ये जाऊन विशालने टप्प्याटप्प्याने पहिल्या आणि दुसऱ्या वेताच्या २५ गाभण ब्राऊन जर्सी गाई आणल्या. त्यांची पेडिग्री तपासली, रेतनासाठी कोणते सीमेन वापरले आहे हे पाहिले. त्यांची पशुवैद्यकाकडून आरोग्याची तपासणी करून प्रमाणीकरण देखील केले.
पुन्हा नव्याने दीड एकर क्षेत्रामध्ये मुक्त संचार गोठा बांधला. गोठा बांधण्यापूर्वी मी आणि कौस्तुभने राज्यातील विविध गोठ्यांना भेटी दिल्या. तज्ज्ञांशी बोललो. आंतराराष्ट्रीय पातळीवर संरचनांचा अभ्यास केला. या सर्व अभ्यासातून आमच्या गरजेनुसार शास्त्रीय पद्धतीने मुक्त संचार गोठा बांधला. यामध्ये गाई फक्त खाद्य खाण्यासाठी शेडमध्ये येतात. दूध काढणीसाठी मिल्किंग पार्लरमध्ये जातात. इतर वेळी मुक्त संचार गोठ्यात फिरत असतात. या गोठ्यामध्ये गाभण गाई, भाकड गाई, दुधातील गाई, कालवडी आणि वासरे असे वेगवेगळे कप्पे आहेत. त्यामुळे गाई ताणरहित असतात. दूध उत्पादनात सातत्य आणि गुणवत्ता चांगली राहते. गोठ्यात उन्हाळ्यामध्ये फॉगर्स तसेच २४ तास स्वच्छ पाण्याची व्यवस्था आहे.
सध्या गोठ्यामध्ये ३० जर्सी गाई असून, दुधात १२ गाई आहेत. एक गाय सरासरी प्रति दिन २० लिटर दूध देते. गाईंना टीएमआर पद्धतीने खाद्य नियोजन, वनौषधींचा वापर तसेच लसीकरण केले जाते. केवळ दोन गडी सर्व गोठा सांभाळतात. येत्या काळात प्रति दिन २५ ते ३० लिटर दूध उत्पादन देणारी गाय गोठ्यात तयार करत आहोत. यासाठी योग्य गुणवत्तेचे सेक्स सॉर्टेड सीमेन वापरले जाते. गाईंना सेन्सर बेल्ट लावल्यामुळे दैनंदिन आरोग्याबाबत मोबाइलवर मेसेज येतो. जैव सुरक्षेवर भर दिला असल्याने आगन्तुक लोकांना गोठ्यात येण्यास बंदी आहे. केवळ गाईंचा गोठा नाही तर ब्रीडिंग फार्मसारखे आमचे व्यवस्थापन आहे. येत्या काळात जातिवंत कालवडी तयार करून शेतकऱ्यांना विक्रीचे नियोजन आहे. गरजेनुसार पशुसंवर्धन विभागातील पशुतज्ज्ञांचा सल्ला घेतला जातो.
आमच्या सगळ्या प्रकल्पाला सुमारे एक कोटींपर्यंत खर्च आला. यामध्ये गोठा बांधकाम, शेतीला कुंपण, पाइपलाइन, शेततळे, गाईंची खरेदी, मिल्किंग पार्लर, दूध प्रक्रिया युनिट बांधकाम, विविध यंत्रसामग्री, वाहतुकीसाठी गाडी, चारा नियोजनाचा समावेश आहे. आम्ही बंद पडलेल्या गोठ्यातील चांगल्या गुणवत्तेचे मिल्किंग पार्लर तसेच पॅकेजिंग यंत्रणा, प्रक्रिया यंत्रांची खरेदी केली. त्यामध्ये बऱ्यापैकी पैसे वाचवले. मात्र गाईंच्या खरेदीत तडजोड केली नाही. जातिवंत दुधाळ गाईंची निवड केल्याने दूध उत्पादनात सातत्य राहिले आहे.

मिळाली मित्राची साथ...
कोणताही व्यवसाय शाश्वत पद्धतीने चालवायचा असेल तर त्याचे ‘सॉर्ट ॲनालिलिस’ महत्त्वाचे ठरते. विशाल यांना कौस्तुभ पवार यांची मोलाची साथ मिळाली. मुंबईमध्ये नोकरी करणारा कौस्तुभ हा बी.टेक. मेकॅनिक तसेच एमबीए फायनान्समधील पदवीधर आहे. त्याचे मूळ गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कसाल. परंतु शिक्षण आणि नोकरीच्या दृष्टीने मुंबईमध्ये त्याचे वास्तव्य होते. कोविड नंतर नोकरीच्या दृष्टीने तो कुटुंबासह पुण्यात विशाल यांच्याच बिल्डिंगमध्ये राहण्यास आला. त्याने विशालकडेच दुधाचे रतीब लावले होते. त्यामुळे दोघांमध्ये शेती आणि पशुपालनाबाबत चर्चा व्हायची. दोघांचे स्वप्न आणि विचार पटल्याने त्यांनी ‘दिशा ॲग्रो एलएलपी’ ही कंपनी स्थापन केली. यामध्ये बॅंकेचे कर्ज आणि स्वतःकडील बचतीची शिल्लक रक्कम भांडवल म्हणून उभी केली. दीप्ती देशमुख, शामोली पवार अशी दोघांच्या पत्नीची नावे एकत्र करून ‘दिशा’ हे कंपनीचे नाव ठरले. ग्राहकांमध्ये गुणवत्तापूर्ण स्वच्छ दुधाची ओळख होण्यासाठी ‘क्रीम ऑफ लाइफ हा ब्रॅण्ड नोंदणीकृत केला. आज हा ब्रॅण्ड पुण्यातील दोनशे लोकांपर्यंत पोहोचला आहे.
या नव्या प्रवासाबद्दल कौस्तुभ म्हणाला, की आम्ही गुणवत्ता जपण्यासाठी दुधाळ गाईंचे संगोपन, दूध संकलन, प्रक्रिया आणि पिशवी पॅकिंग हे ‘सिंगल सोर्स’ ठेवले आहे. ही संपूर्ण चेन एकाच ठिकाणी आहे. त्यामुळे ग्राहकांचा आमच्या उत्पादनावर विश्वास बसणे सोपे झाले. आम्ही प्रती दिन १५० ते २०० लिटर फूल क्रिम दुधाची पिशवी पॅकिंगमध्ये १२० रुपये प्रति लिटर दराने विक्री करतो. दूध काढणीपासून ते पिशवी पॅकिंगपर्यंत कोठेही मानवी हाताळणी नाही. त्यामुळे गुणवत्तापूर्ण स्वच्छ दूध निर्मिती होते. फॅट आणि एसएनएफ चांगले आहे. पुण्यात दररोज ग्राहकांना थेट घरपोच वितरणाची साखळी असल्याने दराबद्दल कोणाची तक्रार नाही. दूध वितरणासाठी ॲप तयार केल्याने ग्राहक पोस्ट पेड, प्री पेड मागणी नोंदवितात. त्यामुळे वितरण सोपे झाले.
नवीन ग्राहकांचा दुधासाठी फोन आला, की आम्ही पहिल्यांदा गोठा, गाई तसेच पॅकेजिंग युनिट पाहायल बोलवतो. आम्ही कशा पद्धतीने काम करतो, हे समजावून सांगतो. पुण्यापासून २५ किलोमीटर अंतरावर असल्याने ग्राहक आमची वेळ घेऊन शनिवार, रविवार गोठ्यावर येतात. ग्राहकांना आम्ही गोठ्यातील व्हिडिओ पाठवत असतो. वयस्क ग्राहकांना आमच्या गाडीने फार्मवर घेऊन येतो. फार्म फिरून झाला, की परत घरी नेऊन सोडतो. त्यामुळे ग्राहक हे नाते घरच्या मंडळींसारखे झाले आहे. येत्या काळात पुणे शहरातील शाळांच्या शैक्षणिक सहली आम्ही आयोजित करणार आहोत. त्यामुळे शहरातील मुलांना शेतकऱ्यांचे जीवन आणि स्वच्छ दूध निर्मिती प्रक्रिया समजेल.
दूध विक्रीसोबतच आम्ही प्रक्रिया उद्योगाला गती दिली आहे. सध्या तूप ३००० रुपये किलो, पनीर ७५० रुपये किलो, लोणी २६०० रुपये किलो आणि खरवस दुधाची ५०० रुपये लिटर दराने विक्री होते. परिसरातील शेतकऱ्यांना मागणीनुसार गोखूर खत पुरविले जाते. सध्या प्रति महिना तीन लाख रुपयांची उलाढाल होत आहे. येत्या काळात १०० गाईंच्या संगोपनाचे उद्दिष्ट असून दैनंदिन ५०० लिटर दूध थेट ग्राहकांना विक्रीचे नियोजन आहे. याबरोबरीने दही, चीज, खवा, पेढे, लस्सी, कुल्फी, आइस्क्रीम निर्मितीच्या दृष्टीने आम्ही पावले टाकली आहेत. भविष्यात सौर ऊर्जेवर हा प्रकल्प चालविण्याचे नियोजन आहे. योग्य व्यवस्थापन, आई-वडिलांची साथ आणि ग्राहकांच्या विश्वासावर आमचे स्वप्न सत्यात उतरवले आहे.
----------------------------
संपर्क ः विशाल देशमुख, ९५५२६६४८००
----------------------
अमित गद्रे, ९८८१०९८२०१
( लेखक दै. ‘ॲग्रोवन’चे सहायक संपादक आहेत.)
००००००००००००००००००००००००००००००००००००००००००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com