हरितगृहातील फुलशेतीची किमया

हरितगृहातील फुलशेतीची किमया
Published on: 

स्वाती किंद्रे यांनी लग्नानंतर एमकाॅमचे शिक्षण पूर्ण केले. पदव्युत्तर शिक्षण झाल्यावर मुली नोकरी आणि व्यवसायाला प्राधान्य देतात. परंतु त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेत पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन हरितगृहात पालेभाज्या, फुलशेती करण्याचा निर्धार केला व त्यातून अधिक उत्पादन मिळवित उत्पन्नाचा आलेख उंचावण्याची किमया साधली. गेली अनेक वर्षे वेगवेगळी नगदी पिके घेऊन आजची तरुणाई शेती क्षेत्रामध्ये बदल घडवू शकते याचा आदर्श घालून दिला आहे. तसेच प्रपंच संभाळत त्यांनी ग्रामीण महिलांना आर्थिक पाठबळ दिले.
- दीपक येडवे

लग्न ठरविताना मुलींचे पालक मुलगा जास्त पगाराचा, शहरांमध्ये फ्लॅट, चारचाकी तसेच मुलगा एकटाच, गावाला शेती हवी, मुलगी शेतात कामाला जाणार नाही, अशा अपेक्षा पूर्ण होत असतील तरच मुलीचे पालक लग्न करायला धजावतात. अशा जमान्यात बालवडी (ता. भोर) येथे लग्न करून आलेल्या स्वाती अमित किंद्रे यांनी आपल्या पतीकडे मोटार, बंगला याची अपेक्षा न ठेवता लागवड योग्य शेतजमीन खरेदी करण्याचा हट्ट करीत पूर्णत्वास नेला.

उच्च शिक्षित, प्रयोगशील युवा शेतकरी स्वाती किंद्रे यांनी नाटंबी येथे सन २०१९ मध्ये ७० गुंठे जागा खरेदी करून बँक ऑफ इंडिया, भोर शाखेच्या अर्थसाहाय्याने ३० गुंठे क्षेत्रामध्ये पॉलिहाऊस उभे केले. तीन किलोमीटर अंतरावरून नीरा नदीपासून जलवाहिनीच्या साह्याने पाणी शेतावर पोहोचवले.

भाताची शेती म्हणून ख्याती असलेल्या या परिसरात रासायनिक खते, औषधे, योग्य तण नियंत्रण, पाणी व्यवस्थापन, बुरशीनाशक आणि कीड नियंत्रण, सेंद्रिय जीवाणू खताचा, उत्पादित फुलांना बाजारपेठेचे सुयोग्य नियोजन करून नैसर्गिक पद्धतीने नगदी पिकाचे भरघोस उत्पादन करून हुकमी आर्थिक उत्पन्नाचे स्रोत निर्माण केले.

समाजकार्यात अग्रेसर
गेल्या ८ वर्षांत जरबेरा, गुलछडी, रंगीत ढोबळी मिरची अशी विविध नगदी पिके आलटून पालटून घेत आहेत. बाजारपेठेत असलेली मागणी, हुकमी उत्पन्न देणारे पीक, योग्य नियोजन आणि स्वतः केलेले व्यवस्थापन यांच्यात समन्वय साधत शेती क्षेत्रामध्ये प्रगती साधली आहे. कुटुंबाची जबाबदारी, प्रपंच, शेतीबरोबरच समाजकार्यामध्ये सुद्धा त्या अग्रेसर आहेत. महिला सक्षमीकरणासाठी महिला बचत गटांमार्फत शहरी आणि ग्रामीण महिलांना आर्थिक पाठबळ देतात.

जीवामृत तयार करून कीटकनाशक फवारणी
विषमुक्त शेतीचे पुरस्कर्ते गुलाब घुले यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षभरापासून नैसर्गिक शेती त्या करू लागल्या आहेत. या शेतीमुळे औषधे, कीटकनाशक फवारणी यांची मोठ्या प्रमाणात बचत होते तसेच फुले ही टवटवीत, ताजी, आकर्षक असल्याने पुणे येथील मार्केट यार्डात चढ्या दरात विक्री होते. त्या स्वतः देशी गाई सांभाळतात. गाईचे गोमूत्र आणि शेणापासून जीवामृत तयार करून खत आणि कीटकनाशक फवारणीसाठी वापर करतात.


कमी खर्चात जास्त नफा
३० गुंठ्यातील हरितगृहाचा वापर करून स्वाती किंद्रे यांनी जरबेरा, रंगीत ढोबळी मिरची, गुलछडी ही नियंत्रित वातावरणात ठिबक सिंचनाचा वापर करून कमी जागेत जास्त उत्पादन आणि पिकांचा दर्जा टिकवून शाश्वत उत्पन्न आणि कमी खर्चात जास्त नफा मिळवित आहेत.

दरवर्षी नगदी पिकातून लाखोंची उलाढाल
दर दोन दिवसांनी फुले, मिरची तोडणी, कीडनाशकांची फवारणी, ठिबक सिंचनामधून झाडांना खते सोडणे, पाणी देणे,फुलांची तोडणी करत असताना चांगल्या दर्जानुसार फुलांचे वर्गीकरण करून रोहिडा कृषी उद्योगामार्फत बाजारपेठेत विक्रीस स्वतः पाठवतात. या नगदी पिकातून लाखो रुपयांची उलाढाल दरवर्षी त्या करीत आहेत. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून १० गुंठ्यांत १० हजार पक्ष्यांचा कुक्कुटपालनाचा व्यवसाय करतात. या व्यवसायाच्या वृद्धीसाठी वातानुकुलीत कुक्कुटपालन करण्याचा मानस आहे.

अनेक पुरस्कारांनी सन्मानित
तनिष्का महिला‌ व्यासपीठ २०२२-२३ प्रगतशील शेतकरी, उन्नती महिला प्रतिष्ठान, भोर, युवा शेतकरी पुरस्कार २०२३, सकल मराठा समाज भोर यांच्याकडून आदर्श प्रयोगशील शेतकरी सन्मान २०२३, महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ आदर्श महिला युवा पुरस्कार २०२४, साहित्य सहवास मंडळाचे वतीने प्रगतशील शेतकरी पुरस्कार २०२५ प्राप्त झाला आहे.


01018, 62872

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.