शहरात स्वाईन फ्लूचे १९ रुग्ण; महापालिका रुग्णालयांत औषधसाठा सज्ज

शहरात स्वाईन फ्लूचे १९ रुग्ण; 
महापालिका रुग्णालयांत औषधसाठा सज्ज
Published on

पिंपरी, ता. २५ : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून, पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातही जानेवारीपासून स्वाईन फ्लूचे १९ रुग्ण आढळले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये या आजारावरील आवश्यक औषधोपचार व सुविधा उपलब्ध ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी आजाराच्या लक्षणांबाबत घाबरून न जाता वेळेत वैद्यकीय तपासणी करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत, असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केले आहे.

स्वाईन फ्लू हा श्वसनमार्गाशी संबंधित संसर्गजन्य आजार असून, इन्फ्लूएन्झा ‘टाइप-ए’च्या ‘एच१एन१’ विषाणूमुळे त्याची लागण होते. सामान्य फ्लूसारखीच या आजाराची लक्षणे असल्याने ताप, सर्दी, खोकला आणि घसादुखी यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, असे वैद्यकीय विभागाने स्पष्ट केले आहे.
एच१एन१ विषाणू शरीरात प्रवेश केल्यानंतर एक ते सात दिवसांच्या कालावधीत संसर्गाची लक्षणे दिसून येऊ शकतात. लक्षणे दिसू लागल्यानंतर पुढील काही दिवस संबंधित व्यक्तीकडून संसर्ग पसरण्याची शक्यता असते. विशेषतः लहान मुलांमध्ये संसर्गाचा कालावधी अधिक असू शकतो.
स्वाईन फ्लूची लागण झालेल्या काही रुग्णांमध्ये न्यूमोनिया, बॅक्टेरियल न्यूमोनिया आणि ब्रॉन्कायटिससारख्या गुंतागुंती निर्माण होण्याची शक्यता असते. मधुमेह, हृदयरोग यांसारख्या सहव्याधी असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे वैद्यकीय विभागाने म्हटले आहे. ताप, सर्दी, खोकला अथवा घसादुखी यांसारखी लक्षणे जाणवल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने जवळच्या महापालिका दवाखाना किंवा रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन वैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे.

स्वाईन फ्लूची प्रमुख लक्षणे
- १०२ ते १०३ अंशांपर्यंत ताप
- थंडी वाजणे, कफ आणि घसादुखी
- अंगदुखी व डोकेदुखी
- अतिशय थकवा जाणवणे
- जुलाब किंवा उलट्या होणे

ही काळजी घ्या
- सर्दी, खोकला, घसादुखी, ताप इत्यादी लक्षणे आढळल्यास तातडीने नजीकच्या महापालिका दवाखाना किंवा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा
- वारंवार साबण आणि स्वच्छ पाण्याने हात धुवावेत
- पोषक व संतुलित आहार घ्यावा
- धूम्रपान टाळावे
- पुरेशी झोप व विश्रांती घ्यावी
- शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी भरपूर पाणी प्यावे
- आहारात लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री तसेच हिरव्या पालेभाज्यांसारख्या आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करावा
- गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे
- आवश्यकता भासल्यास मास्कचा वापर करावा
- खोकताना किंवा शिंकताना नाक व तोंड रुमालाने अथवा टिश्यूने झाकावे आणि त्यानंतर हातांची स्वच्छता राखावी
- वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसारच औषधांचा वापर करावा
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com