पीक कर्ज वाटपासंदर्भात सहकार मंत्र्यानी दिला 'हा' आदेश

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 6 August 2020

-पीक कर्ज वाटपात हलगर्जीपणा करणाऱ्या बँकांवर कारवाई करा
- सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे निर्देश
- राज्यातील खरीप पीक कर्जवाटपाचा सहकारमंत्र्यांकडून आढावा

पुणे : महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्यात आलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्याने पीककर्ज वाटप करण्यात यावे. कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपात हलगर्जीपणा करणाऱ्या आणि मंजूर पीक कर्ज कमी प्रमाणात वाटप करणाऱ्या बँकांवर कारवाई करा, असे निर्देश सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

राज्यात सरासरी (51टक्के) पेक्षा कमी खरीप पीक कर्ज वाटप असलेल्या राज्यातील 12 जिल्ह्यांची सहकारमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेण्यात आली. सहकार आयुक्त अनिल कवडे, अतिरिक्त आयुक्त डॉ. आनंद जोगदंड, राज्यस्तरीय बँकर्स समितीचे समन्वयक बाळासाहेब तावरे, सहकार विभाग आणि बँकांचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. या बैठकीत नांदेड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, अमरावती, बुलढाणा, वाशिम आणि वर्धा या कमी कर्जवाटप झालेल्या जिल्ह्यांच्या खरीप पीक कर्ज वाटपाचा आढावा घेण्यात आला.

सहकारमंत्री पाटील म्हणाले, सरासरीपेक्षा कमी पीक कर्ज वाटप झालेल्या जिल्ह्यांमध्ये  जिल्हाधिकारी यांनी बँकांचा गावनिहाय व बँक शाखानिहाय आढावा घेऊन पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट वेळेत साध्य करावे. पीक कर्ज वाटपाची गावनिहाय वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करुन कामकाजाचा अहवाल सहकार विभागाला सादर करावा. पीक कर्ज घेण्यास इच्छुक पात्र शेतकरी तसेच कर्जमाफी योजनेचे लाभार्थी शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.

कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांकडून व्याज वसुली नको :
कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांकडून बँकांनी ऑक्टोबर 2019 पासून कर्जमाफीची रक्कम मिळालेल्या तारखेपर्यंत व्याजाची रक्कम वसूल करु नये, यासाठी सहकार विभागाने बँकांना स्पष्ट निर्देश द्यावेत, अशा सूचना सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिल्या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

जुलैअखेर 23 हजार 466 कोटींचे पीक कर्ज वाटप :
यंदाच्या 2020-21 च्या खरीप हंगामात पीक कर्ज वाटपासाठी 62 हजार 459 कोटी रुपयाचे उद्दिष्ट असून, यापैकी खरीप पीक कर्ज वाटपासाठी 45 हजार 786 कोटी रकमेचे उद्दिष्ट आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना 13 हजार 261 कोटी रुपयांचे तर, व्यापारी बँकांना 35 हजार 525 कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जुलै 2020 अखेर एकूण 23 हजार 466 कोटी (51.25 टक्के) पीक कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी दिली. 

(Edited by : Sagar Diliprao Shelar)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Take action against banks that are negligent in allocating crop loans says balasaheb patil