उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात, रस्ते अडवणाऱ्यांची... 

da.jpg
da.jpg

वडगाव शेरी : रस्ते करताना खासगी मिळकती, अतिक्रमणे यांचा अडथळा असतो. त्यात माझ्या जवळचा कार्यकर्ता मध्ये आला तरी त्याची गय करू नका. माझ्या आदेशाची वाट पाहू नका. बिल्डर रस्ता होऊ देत नसेल तर त्याचे काम थांबवा. कोणत्याही परिस्थितीत विकास थांबता कामा नये, अशा स्पष्ट सूचना आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. तसेच संरक्षण खात्याच्या हरकतींमुळे रखडलेल्या वडगाव शेरीतील रस्त्यांबाबत केंद्रीय संरक्षण समिती सदस्य व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढाकाराने दिल्लीत बैठक घेण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करीन, असेही पवार यांनी आज सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वडगाव शेरी मतदार संघातील रखडलेल्या वीसहून अधिक महत्वाच्या रस्त्यांबाबत निर्णय घेण्यासाठी आमदार सुनिल टिंगरे यांच्या मागणीवरून उपमुख्यमंत्री पवार यांनी पुण्यातील कौन्सिल हॉलमध्ये बैठक घेतली. यावेळी आमदार सुनिल टिंगरे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पालिका आयुक्त विक्रम कुमार, उपवनसंरक्षक रमेश कुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता सदाशिव साळुंके, पालिकेचे पथविभागप्रमुख व्ही. जी. कुलकर्णी, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, महसुल विभागाचे भुसंपादन अधिकारी आदी उपस्थित होते.

नगर रस्त्यावरील वाहतूकीचा ताण कमी करणाऱ्या खऱाडी शिवणे रस्त्याच्या कामात ज्या मिळकतधारकांमुळे अडथळे येत आहेत त्यांची यादीच यावेळी अजित पवारांसमोर ठेवण्यात आली. त्या यादीत राष्ट्रवादीसहीत विविध पक्षांशी संबंधीत व्यक्ती व बिल्डरांची नावे पवार यांना दिसली. रस्त्याच्या विकासात अडथळा ठरणारी कितीही मोठी नावे असली तरी त्यांची गय न करता नियमाप्रमाणे कार्यवाही करा, माझ्या होकाराची वाट पाहू नका, या शब्दात पवारांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना सुनावले. 

मांजरी, धानोरी, निरगुडी, खराडी, वडगाव शिंदे, वडगाव शेरी भागातील जे रस्ते वनखात्यामुळे रखडले आहेत, त्यांचे प्रस्ताव तातडीने पाठवून, त्यांना मंजुरी घ्या, अशा सुचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. येरवड्यातील अग्रसेन शाळेला राज्य शासनाने जागा दिली आहे. ती जागा पुन्हा रस्त्यासाठी हवी असेल तर जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकार वापरून रस्त्यासाठी आवश्यक जागा ताब्यात घ्यावी व रस्ता करावा, असे आदेशही त्यांनी दिले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 विमाननगर भागातील एचसीएमटीआर रस्ता, कोनार्क नगर समोरील रस्ता आणि सीसीडी चौक ते वेकफिल्ड रस्ता एका बांधकाम व्यावसायिकामुळे रखडला असल्याचे आमदार टिंगरे यांनी पवारांच्या लक्षात आणून दिले. त्यावर त्यांनी पालिकेच्या भुसंपादन अधिकाऱ्यांना आज सायंकाळपर्यंत कार्यवाही करा. बिल्डरची ना हरकत घ्या, असे आदेश दिले. 

लोहगाव, धानोरी, बर्माशेल, फाईव्ह नाईन चौक येथील काही रस्ते संरक्षण खात्याच्या हरकतींमुळे रखडले आहेत. या रस्त्यांबाबत मार्ग काढण्यासाठी नुकतिच संरक्षण समितीवर निवड झालेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढाकाराने दिल्लीत बैठकीसाठी प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. 

याविषयी टिंगरे म्हणाले, ''नगर रस्ता भागातील वाहतुक समस्या सोडवण्यासाठी विकास आराखड्यातील रस्त्यांचा तातडीने विकास होणे गरजेचे आहे. यापुर्वी पाठपुरावा न झाल्याने हे रस्ते रखडले होते. आता उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याप्रमाणे अधिकाऱ्यांना कार्यवाही करावी लागेल. यासोबत उड्डाणपुल व ग्रेड सेपरेटरसाठीही निविदा काढण्याच्या सुचना दादांनी दिल्या आहेत.''  

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com